मित्रांनो, ‘‘नाच रे मोरा, आंब्याच्या वनात..’’ हे गाणं तुम्ही सगळ्यांनी ऐकलंच असेल. निसर्गसौंदर्याने प्रेरित होऊन अप्रतिम लेख, चित्रं, छायाचित्रं, शिल्पं किंवा कविता स्फुरल्याच्या असंख्य घटना आहेत. निसर्ग आणि कलेचं एक अतूट नातं असतं. संस्कृतमधील महाकवी कालिदास, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, ब्रिटिश कवी विलियम वर्डस्वर्थ, अमेरिकन कवी रॉबर्ट फ्रॉस्ट व रवींद्रनाथ टागोर यांच्यासारख्या असंख्य काव्य रचनाकारांना निसर्गाने मोहवून टाकलं होतं.
कालिदास जेव्हा त्याच्या काव्यात सारस पक्षी, हरणं, फुलोऱ्याने नटलेलं रान व सुखावणाऱ्या वर्षांऋतूचं वर्णन करतो; तेव्हा सृष्टीची ही समृद्ध रूपं आपल्या डोळ्यांसमोर उभी राहतात! आपण आज वन्यजीव रक्षणाचं महत्त्व जाणतो. सहाशे वर्षांपूर्वी ज्ञानेश्वरांनी ‘‘भूतां परस्परे पडो, मत्र जिवांचे’’, म्हणजे ‘‘सर्व प्राणिमात्र व मानवाने मत्रीने पृथ्वीवर एकत्र राहावे’’ अशा सुंदर शब्दांत ते सांगितलं होतं. रॉबर्ट फ्रॉस्ट जेव्हा ‘‘वूड्स आर लवली, डार्क अँड डीप’’, असं म्हणतो तेव्हा एक घनदाट हिरवंगार जंगल आपल्याला खरोखरच खुणावत आहे असं वाटतं. रवींद्रनाथ टागोरांच्या लिखाणाची प्रेरणाही शांतीनिकेतनमधील वृक्ष, वेली, फुलं व पक्ष्यांकडूनच आली असावी.
तुमच्यापकी अनेकांना निसर्गाच्या सान्निध्यात खूप आनंदी, उत्साही व काहीतरी नवीन करावं असं वाटलं असेल. उन्हाळ्याच्या सुट्टीत घाट रस्त्याने फिरायला जाताना, बाल्कनीतून फुललेला गुलमोहर बघताना, दयाळ पक्ष्याची मधुर शिळ ऐकताना, समुद्रावरचा भन्नाट वारा अंगावर घेताना, पावसाळ्यापूर्वीचा लालसर संधिप्रकाश पाहताना किंवा पहिल्या पावसानंतर मातीचा सुगंध अनुभवताना हे सगळं छान प्रकारे लिहून व्यक्त करावं, असं कधीतरी वाटलं असेल.
या सुट्टीतही तुम्ही निसर्गाची विविध रूपं पाहिली असतील. तेव्हा आता एक वही व पेन घ्या आणि आपले अनुभव लिहायला सुरुवात करा. त्यातून लेख किंवा कविता काहीही तयार झालं तरी हरकत नाही. त्याची कोणाशीही तुलना करू नका. ते आई-बाबांना ऐकवा. शाळा सुरू झाल्यावर वर्गात वाचून दाखवा. कदाचित सर्वाना तुमचं लिखाण आवडेलसुद्धा.
आणि हो, ते मला पाठवायला विसरू नका. निसर्गातून स्फुरलेलं तुमचं काव्य वाचायला मला नक्कीच आवडेल. थंडी संपून झाडांवर सुंदर फुलं डोलू लागल्यावर काही दिवसांपूर्वी मीही एक कविता लिहिली आहे, खास तुमच्याकरिता.
पोपटी पालवी पिंपळाची,
नाजूक पाने सोनमोहराची.
आंब्याची दाट छाया,
सावरीची तेजस्वी काया.
देशी बदामचा पर्णसंभार,
विलायती शिरीष डेरेदार.
वसंत ग्रीष्मातील सृष्टी,
पाहून सुखावते दृष्टी.