सो फ्रेंड्स, सुट्टी सुरू झाल्यापासून आपण ठरवलं होतं की पाटी-पुस्तक, वही-पेन साऱ्या साऱ्यालाही सुट्टी द्यायची. पण त्यांना सुट्टी देऊन आपण काही गप्प बसलो नव्हतो, की नवीन काही शिकायचं थांबलो नव्हतो. आपलं आगे बढो सुरूच होतं की! म्हणजे आपल्याही नकळत आपण आपला अभ्यास चालू ठेवला होता. कधी आपण दुसऱ्याच्या स्वभावांचा अभ्यास केला, तर कधी स्वत:चाच अभ्यास केला. कधी रंगांचा, आकारांचा, पदार्थाचा अभ्यास केला. पण त्या सगळ्याला आपण अभ्यास असं म्हटलं नाही. त्यासाठी वेगळा वेळ काढून आपण जुंपून घेतलं नाही आणि बरोबर इतरांनाही जुंपलं नाही. या सुट्टीत आम्हाला एव्हढंच दाखवायचं होतं तुम्हाला, की अभ्यास म्हणजे फक्त लेखन, वाचन एवढंच नाहीए; तर त्यापेक्षाही खूप काही आहे. निरीक्षण हा अभ्यासाचा मुख्य भाग आहे. फक्त निरीक्षण कसलं करायचं, कसं करायचं, त्यातलं काय टिपायचं, काय सोडून द्यायचं, हे सारं ठरवण्यासाठी मोठे मदतीला लागतातच. तेव्हा आता शाळा सुरू झाली की अभ्यास म्हणजे फक्त वह्य़ांची पानं भरणं किंवा पुस्तकांची पानं समोर ठेवून शून्यात नजर लावणं, असं काही करू नका बरं का! अभ्यास म्हणजे पुस्तकात नसलेल्या गोष्टींचंही निरीक्षण. तुमच्या आजूबाजूला पाहा, त्या अनुभवा, त्यांचा आस्वाद घ्या. स्वत:ला ओळखा, इतरांना जाणून घ्या आणि खरेखुरे अभ्यासक व्हा. नुसते बुकवर्म नकोत बुवा. हे सगळं हळूहळू होणारेय.. तेव्हा प्रयत्न करत राहा. ऑल द बेस्ट!
मेघना जोशी – joshimeghana231@yahoo.in
(समाप्त)