मेघना जोशी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हर्ष झोपेतून जागा झाला तर समोर आई उभीच होती. हे अगदी क्वचितच घडायचं, कारण आई सकाळी नेहमी घाईतच असायची. घरातली कामं, सगळय़ांची बाहेर जाण्याची गडबड, त्यांच्या मागण्या पुरवण्याची घाई, यामुळे आईला सकाळी क्षणाचीही फुरसत मिळायची नाही. त्यामुळे एकीकडे कामं आवरता आवरताच ती हर्षशी बोलत असायची. पण आज ती चक्क त्याच्यासमोर हसत उभी होती.

‘‘शुभ सकाळ हर्ष. नवीन वर्षांच्या खूप खूप शुभेच्छा!’’ म्हणत आईने एक सुंदरसा बॉक्स त्याच्या हातात ठेवला.

‘‘आई, चक्क तू आज माझ्यासाठी नववर्षांची भेट आणलीस. आपल्याकडे हे काम ताई करते ना नेहमी,’’ असं म्हणत हर्षने बॉक्स उघडला आणि म्हणाला, ‘‘तू रंगवलेला मग, खूप छान आहे आई हा.’’

‘‘आई, हा माझा दूध प्यायचा मग ना गं, त्या दिवशी एका बाजूने त्याचा कपच्या उडाला तोच ना?’’ तो आईला उत्साहात विचारत होता. त्यावर आई हसत हसत म्हणाली, ‘‘हर्ष, अगदी आजीचा शब्द वापरलास बरं का, कपचा उडालेला मग. पण तो शब्द ‘कपच्या’ नाहीय ‘कपचा’ असा आहे, चमच्यातला ‘च’ असतो त्यात.’’

‘‘मग, हुश्शार मुलगा आहे मी, बरोब्बर लक्षात राहिलंय माझ्या. कपचा म्हणजे तुकडा ना मगाच्या कडेचा.’’

‘‘हो, या मगाचा थोडा मोठा कपचा गेला त्यामुळे मी त्याची फुलदाणी करायची ठरवली.’’

 ‘‘मस्त झालीय की एकदम. मला वाटलं आता याचा काहीच उपयोग होणार नाही.’’

‘‘काय झालंय मस्त. काय खातोयस सकाळी सकाळी?’’ असं म्हणतच ऋता आत आली.

‘‘अगं, खाणारेय काय सकाळी सकाळी, अजून बाहेरही आला नाहीय.’’ आईचं हे बोलणं अर्धवट तोडत हर्ष म्हणाला, ‘‘ही बघ किती मस्त फुलदाणी केलीय आईने माझ्यासाठी. स्वत:च्या हाताने रंगवलीय तिनं. अगं, ओळखलंस का तू? माझा दूध प्यायचा मग आहे तो जुना.’’

 ‘‘हा, हा, तो टवका उडालेला मग ना, तुझा आवडता.’’

‘‘अगं, टवका काय टवका. टवका अगदी छोटा असतो. त्याचा टवका उडाला असता ना, तरीही मी तो वापरला असता. पण हा उडालाय ना तो कपचा आहे. आठवत नाही तुला आजी नेहमी सांगायची टवका आणि कपचा यातला फरक.’’

‘‘हो, हो, आता लक्षात ठेवीन हं मी हा टवका आणि कपचा यातला फरक. मोठ्ठा आलाय शिकवणारा. आता कुणी वापरतं का हे शब्द.’’

‘‘कुणी का न वापरेना, मी वापरणारेय ते. माझ्या आजीचे शब्द आहेत. म्हणजे आपल्या आजीचे शब्द आहेत ते आपण वापरले तर टिकतील ना. मी वापरणारे ते.’’ हर्ष प्रत्येक शब्दावर जोर देत म्हणाला. त्याचं ते बोलणं ऐकत ऋता जराशी गडबडलीच, पण तसं न दाखवता तिने विषय बदलत म्हटलं, ‘‘अरेरे! कित्ती वर्ष त्यातून दूध पित होतास तू बिच्चारा. माझे दोन-तीन मग तरी सहज झाले असतील तेवढय़ा वेळात. आणि तो फुटला, त्याचा कपचा का काय तो उडाला तर तू तो ठेवलायस त्या तुझ्या कप्प्यात लपवून. काय काय आणि किती किती वस्तू ठेवल्या आहेस त्या कप्प्यात. किती कचरा केलायस. नाहीतर माझा कप्पा बघ. मी जादाचं काही ठेवतच नाही साठवून. वेळच्या वेळी आवरून टाकते सारं. त्या जाहिरातीत दाखवतात ना तसा साफसुथरा असतो माझा कप्पा. हो ना आई, खरंय की नाही मी म्हणतेय ते?’’

‘‘आताही तशी ही फुलदाणी तू परत त्या कप्प्यातच ठेवशील. त्यापेक्षा मला दे ती. मी माझा कप्पा सजवायला वापरते ती.’’ असं म्हणत ऋता हर्षच्या हातून फुलदाणी ओढू लागली, पण हर्ष काही ती सोडेना. त्यांच्या लटक्या भांडणाकडे पाहत असलेली आई गालातल्या गालात हसली आणि ऋताकडे पाहत म्हणाली, ‘‘सोड गं ती फुलदाणी. तू म्हणतेस ते निम्मं खरं आहे. तो वस्तू जमवून ठेवतो, त्यामुळे त्याच्या कप्प्यात अडगळ होते हे जरी खरं असलं तरी त्याने जमवलेल्या वस्तूंमध्येच हा मग मला सापडला आणि त्यापासून ही फुलदाणी तयार करून देऊ शकले मी त्याला. तुझ्या त्या साफसुथऱ्या कप्प्यात मला काही सापडलं नसतंच तसं. त्यामुळे तुला काय देणार होते मी नवीन वर्षांत तुझ्या कप्प्यातून तयार करून? पण एक मात्र केलंय. पाहायचं असेल तर कप्पा उघडून बघ.’’

 आईचं हे बोलणं ऐकताच ऋता धावलीच आपल्या कप्प्याकडे. कप्पा उघडून बघते तर काय, आईने त्याच्या आत एक सुंदर पक्ष्याचं चित्र काढलं होतं आणि त्यावर लिहिलं होतं. ‘‘नववर्ष सुखाचं, आनंदाचं जावो.’’ ते पाहून ऋताच्या तोंडून शब्दच फुटेना. ती धावत धावत आईकडे गेली आणि तिने आईच्या कमरेला आनंदाने विळखाच घातला. 

हे बघून हर्षही आईकडे धावला. दोघांनाही जवळ घेत, त्यांच्या केसांतून हात फिरवत आई म्हणाली, ‘‘कसं आहे ना बाळांनो, तुम्हा दोघांच्या सवयी अगदी परस्पर वेगळय़ा आहेत, पण कोणतीही सवय वाईट नाहीए. त्याकडे तुम्ही जसं पाहता तसं दिसेल तुम्हाला. म्हणजे बघा हं, रोज पोळय़ा केल्यावर तवा गरम असतो की नाही. त्याला हात लागला तर पोळेल तो. पण त्या गरम तव्यावर तुपाचं भांडं ठेवलं तर जेवताना पातळ तूप मिळतं, तीळ भाजले तर त्याची चटणी होते. म्हणजे तव्याचं गरम असणं आपण कसं वापरतो ते महत्त्वाचं. तसंच कोणतंही फूल एक-दोन दिवसांत कोमेजतं, पण ते तसं कोमेजतं म्हणून देवपूजेसाठी किंवा सजावटीसाठी वेगवेगळी फुलं वापरून रोज वेगवेगळा आनंद मिळवू शकतो आपण. तो आनंद कृत्रिम प्लास्टिकच्या फुलांनी मिळतो का सांगा? कारण ती कोमेजतच नाहीत, मग बदलावी तरी का लागतील ती. तसंच आहे सवयींचं. अनेकदा छोटय़ा छोटय़ा सवयींमधल्या अनेक सवयी वाईट नसतातच. तुम्ही त्यांचा वापर कसा करता ते महत्त्वाचं.’’

दोघंही विचारात पडलेली पाहून आईने हळूच तिथून काढता पाय घेतला. कारण आता ती दोघं नक्की त्यावर बोलणार होती आणि तेच तर नवीन वर्षी घडायला हवं होतं.

joshimeghana.23@gmail.com