माझी खात्री आहे- तुम्हाला सगळ्यांनाच गोष्टी ऐकायला आणि वाचायला खूप आवडत असणार. गोष्टी आपल्याला एका निराळ्याच विश्वात घेऊन जातात. त्या विश्वातल्या परीराणी, राजकुमार, राघू-मैना, चांदोबा आणि चांदण्या, आजी-आजोबा आणि त्यांची नातवंडं यांच्याशी आपलं नातं जोडतात. आपण गोष्टींमध्ये रममाण होतो.
बाकी तुमच्यासारख्या लहान मुलांकरता गोष्टी लिहिणं तशी अवघडच गोष्ट आहे हे नक्की! तुम्हाला सांगायच्या गोष्टींमध्ये शिकवण, रंजकता, कल्पनाविलास, स्वप्न, खरेपणा अशा अनेक घटकांची मांडणी हवी. मात्र, ती अतिशय सहज, सोपी वाटायला हवी. तुम्हाला गोष्टी वाचताना, ऐकताना कंटाळा येता उपयोगाचा नाही. शिवाय, चांगल्या गोष्टींची माझी मोजपट्टी अगदी सोपी आहे. त्या गोष्टी वाचल्या-ऐकल्यानंतर स्वप्नांत आल्या पाहिजेत. मला सांगा, एखादी सुरेख गोष्ट ऐकायची आणि विसरून जायची तर त्यात काय मजा? चांगली गोष्ट इतकी खोलवर रुजायला हवी, की ती ध्यानी, मनी, स्वप्नी वसायला हवी.
माझ्या लहानपणी विविध प्रकारच्या गोष्टीच्या पुस्तकांनी माझ्या घरात ठाण मांडलं होतं. काही पुस्तकं तर वीस-पंचवीस र्वष जुनी होती. आनंद साधलेंच्या इसापनीतीच्या मराठी भाषांतरापासून ते प्र. के. अत्रेंच्या कुमारांसाठीच्या कथा, अकबर-बिरबलापासून तेनालीरामापर्यंत सारी मंडळी होती. मला मात्र चिं. वि. जोशींच्या कथा फार आवडायच्या. मोरू आणि मैना, चिमणचारा, राइसप्लेट अशी विनोदी कथांची पुस्तकं माझ्या संग्रही होती. शिवाय, त्यादरम्यान चिं. वि. जोशींच्याच लेखणीतून अवतरलेल्या चिमणराव आणि गुंडय़ाभाऊच्या खुसखुशीत गोष्टींवर आधारित दूरचित्रवाणी मालिका दूरदर्शनवर दाखवली जात असे. मला त्या दोन मित्रांची ती मालिका भारीच आवडायची. लॉरेल-हार्डीसारखीच पोट धरधरून हसायला लावणारी चिमणराव-गुंडय़ाभाऊची अस्सल देशी मैत्री आणि त्यांच्या गंमतशीर गोष्टी पाहायला खूपच आवडायच्या. खरं तर चिं. वि. जोशींची ओळख चिमणराव-गुंडय़ाभाऊकरताच प्रामुख्याने होती. मात्र त्यांची साहित्यसंपदा खूपच मोठी आहे. त्यांनी बौद्ध जातककथांना मराठीत आणलेलं आहे. बौद्ध धर्मावर वैचारिक लेखन केलेलं आहे. अनेक कथांच्या माध्यमातून त्यांनी वाचकांची करमणूक केलेली आहे.
कुमार वाचकांकरता लिहिलेल्या त्यांच्या कथांपैकी मला ‘ओसाडवाडीचे देव’ हा कथासंग्रह आजही आवडतो. आपण वाचलेल्या देवांच्या साऱ्याच कथा उद्बोधक असतात. आदर्श पुत्र राम, दुष्टांचा नाश करणारा कृष्ण, स्वामीभक्त हनुमान वगैरे गोष्टींतून शिकवण मिळते. मात्र याच देवादिकांच्या निखळ मनोरंजन करणाऱ्या गोष्टी चिं. वि. जोशींच्या ‘ओसाडवाडीचे देव’ या पुस्तकात वाचायला मिळतात. देवादिकांच्या पारंपरिक बलस्थानांवर रचलेल्या या गोष्टी म्हणजे कल्पनाशक्ती आणि मनोरंजनाच्या अफाट-अचाट उडय़ा आहेत. यातले देवदेखील भक्तांच्या हाकेला धावणारे आहेत, चमत्कार करणारे आहेत. मात्र या साऱ्यांचा मेळ मोठाच चमत्कारी आहे..
गोष्टींच्या प्रवासाची सुरुवात होते चिं. विं.नी रचलेल्या ओसाडवाडी गावापासून. या गावात देवळं अनेक. या गावाला भेट देताना एका गुरवाच्या तोंडून या देवांच्या महती सांगणाऱ्या गोष्टी म्हणजे ओसाडवाडीचे देव इतर अनेक देवस्थानांप्रमाणेच या गावातले देव जागृत आहेत- या कहाणीपासून सुरुवात होते आणि मग या जागृत देवांचे अनेक किस्से गोष्टीरूपाने एकेका प्रकरणातून आपल्या समोर सादर होतात. सर्कशीत काम करणाऱ्या भक्ताच्या हाकेला धावून जाताना हनुमान त्या भक्ताची भूमिका वठवतो आणि सर्कशीत खेळ करून वाहव्वा मिळवतोच, त्या भक्ताचा फायदा करून देतो. एका गोष्टीमध्ये वाई विरुद्ध सातारा अशा क्रिकेटच्या सामन्यात साक्षात मारुतीराया आणि गणपती मॅच खेळायला उतरतात. एका गोष्टीमध्ये ओसाडवाडीचा मारुती पुण्याच्या सफरीवर जातो, तर दुसऱ्या गोष्टीत तो पोलीस शिपाई बनतो.
या साऱ्याच गोष्टींमधून मनोरंजन आणि विनोद समोर येत असले तरी देवांविषयी अनादर नाही. उंदरावरून पडणाऱ्या गणपतीला पाहून हसणाऱ्या चंद्राच्या गोष्टीतल्यासारखाच या गोष्टींतलाही विनोद निखळ आहे. मारुती, गणपती, नंदी यांसारख्या गोष्टींमध्ये आवडीच्या देवांच्या पौराणिक गुणांचा पुरेपूर वापर करतच या नव्या गोष्टींची रचना चिं. वि. अगदी चपखलपणे करतात. मला त्या बालवयात या गोष्टी आवडल्या, कारण या गोष्टींतला अफाट कल्पनाविलास.. आजीकडून ऐकलेल्या गणपती-मारुतीच्या गोष्टींपेक्षा या गोष्टी खूपच वेगळ्या, माझ्या भावविश्वाच्या होत्या. त्यामुळेच पारंपरिक गोष्टींपेक्षा कांकणभर त्या मला जवळच्या वाटल्या. परीक्षेआधीची धाकधूक कमी करण्याकरता घरच्या गणपतीसमोर हात जोडताना अचानक गणपतीनेच आपल्याला आशीर्वाद देत एखादी जादूची पेन्सिल द्यावी आणि आपली सगळी परीक्षा बिनबोभाट पार पडावी असं कुणाला वाटत नाही? ओसाडवाडीच्या देवांच्या या गोष्टी या अशाच निरागस, तरीही कल्पकतेतून फुललेल्या आहेत. साहजिकच त्या खूप जवळच्या वाटतात.
ज्या बालवयात चंद्र आपल्याशी बोलतो, दुपारच्या आकाशात दिसणाऱ्या पांढऱ्या ढगांच्या पुंजक्यात हरीण, हत्ती आणि ससुल्यागडी दिसतात अशाच वयात मारुती टणाटण उडय़ा मारत क्रिकेटमध्ये धावांचे डोंगर उभे करत असेल तर त्यात नवल ते काय? त्या मारुतीरायाने लक्ष्मणाकरता संजीवनी आणायला पर्वत वाहून न्यायच्या आपल्या रुटीन कामातून रजा घेत आपल्यासोबत क्रिकेटची मॅच खेळली तर त्यात काय बिघडलं? चिं. वि. जोशींनी ही कल्पनाशक्तीची कास पकडून उंच उडी मारली आहे, आणि त्यात आपल्याही कल्पनाशक्तीला भरारी घ्यायला लावली आहे. त्या भन्नाट कल्पनेकरताच हे ओसाडवाडीचे देव आपले लाडके होतात. पाहा एकदा वाचून- मग तुम्हालाही गंमत कळेल.
हे पुस्तक कुणासाठी? चिं. विं.च्याच भाषेत, दहा-पंधरा वर्षांच्या कुमार वाचकांकरता!
पुस्तक : ओसाडवाडीचे देव
लेखक : चिं. वि. जोशी
प्रकाशक : कॉन्टिनेन्टल प्रकाशन
श्रीपाद- ideas@ascharya.co.in

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा