मैत्रेयीच्या आई-बाबांनी ती लहान असल्यापासूनच कटाक्षाने तिचं टी.व्ही. बघण्याचं किंवा मोबाइलवर गेम्स खेळण्याचं प्रमाण कमी राहील याची काळजी घेतली होती. त्यासाठी वेगवेगळे बोर्ड गेम्स, पुस्तकं त्यांनी तिला आणून दिली होती. तिच्यासोबत खेळण्यासाठी, पुस्तकं वाचण्यासाठी दिवसभरातला थोडा वेळ ते नेहमीच राखून ठेवत असत. सुट्टीचा दिवस असेल तर चित्रकला, हस्तकला, भटकंती, संगीत ऐकणं, सगळ्यांनी मिळून एखादा पदार्थ तयार करणं हे सगळं ते आवर्जून करत. सध्या तर जुलै महिना सुरू झाल्यामुळे पाऊस धुवॉंधार कोसळत होता. त्यात आज रविवार असल्यामुळे शाळा आणि रोजच्या अॅक्टिव्हिटीजना सुट्टी होती. त्यामुळे मस्त काहीतरी खायला करायचे बेत सुरू होते. आज मात्र बाबाने एक वेगळीच गोष्ट करायची ठरवली. तो म्हणाला की, आजोबा आणि तो मिळून कॉर्न पॅटिस करतील आणि मैत्रेयी, आई आणि आजी मिळून एखादा बोर्डगेम खेळतील! बाबाची आयडिया सगळ्यांनाच आवडली. मैत्रेयीने नुकतंच शाळेत एक प्रोजेक्ट केलं होतं. त्यासाठी ‘ऑथेल्लो’ या गेमची बरीच माहिती तिने जमवली होती. त्यामुळे तोच गेम खेळायचा, असं सर्वानुमते ठरलं. पण आजोबांच्या टीममध्ये दोन जण आणि आजीच्या टीममध्ये तीन जण हे काही मैत्रेयीला पटेना! तेव्हा तिने सुचवलं की, आज आई आणि आजी बोर्ड गेम खेळतील आणि ती स्वत: त्या गेमची प्रोजेक्टसाठी जमवलेली माहिती सगळ्यांना सांगेल. आणि आवश्यकता असेल तेव्हा बाबा आणि आजोबांना मदत करेल, अशा पद्धतीने दोन्ही टीम्समध्ये समसमान मेंबर्स होतील. मैत्रेयीचं हे म्हणणं सगळ्यांनी कौतुकाने मान्य केलं.
आजोबा बटाटे उकडण्यासाठी कुकर लावायला स्वयंपाकघरात गेले. बाबा ब्रेडचा चुरा, आलं-लसूण-मिरचीची पेस्ट वगैरे जमवाजमव करायला लागले. त्यांना मक्याचे दाणे काढण्यासाठी मैत्रेयीची मदत लागणार होती म्हणून ती सगळं साहित्य घेऊन बाहेरच्या खोलीत आली. तोपर्यंत आई आणि आजीने ऑथेल्लो काढून मांडामांड करून ठेवली होती. पांढऱ्या आणि काळ्या रंगाच्या ६४ सोंगटय़ा आई-आजींनी ३२-३२ अशा वाटून घेतल्या होत्या. आजीकडे काळ्या आणि आईकडे पांढऱ्या सोंगटय़ा होत्या. खेळायचा बोर्ड मात्र हिरवा होता. सुरुवातीला आईने दोन्ही रंगांच्या दोन-दोन सोंगटय़ा मध्यभागी असलेल्या चौकोनात विरुद्ध दिशांना ठेवल्या. त्यानंतर काळ्या रंगाच्या सोंगटय़ा ज्याच्याकडे असतील त्याने पहिली चाल करायची, या नियमाप्रमाणे आजीने आधी खेळायला सुरुवात केली. तिची काळी सोंगटी आईच्या पांढऱ्या सोंगटीच्या बाजूला ठेवली आणि पांढरी सोंगटी उलटून काळी बाजू वर करून ठेवली. तेवढय़ात कणसातले दाणे काढता काढता मैत्रेयी म्हणाली, ‘‘इंटरनेटवर ऑथेल्लो कसा खेळायचा त्याचे छान व्हिडीओज् आहेत. अगदी डीटेलमध्ये माहिती मिळते आपल्याला!’’
आजीचं खेळून झाल्यावर आईने आपली पांढरी सोंगटी आजीच्या काळ्या सोंगटीच्या बाजूला ठेवली आणि आजीची काळी सोंगटी उलटून पांढरी बाजू वर करून ठेवली. शेवटी गेम संपायच्या वेळी ज्या रंगाच्या सोंगटय़ा पटावर जास्त असतील तो रंग म्हणजेच तो खेळाडू जिंकत असल्यामुळे दोघीही रंगून जाऊन खेळत होत्या.
एव्हाना कुकर गॅसवर ठेवून आजोबाही मैत्रेयीला मदत करायला आले होते. त्यांच्याकडे बघत मैत्रेयीने सांगितलं, ‘‘खूप पूर्वी अशाच स्वरूपाचा खेळ ‘रिव्हर्सी’ म्हणून ओळखला जात असे. त्याचा शोध नक्की कुणी लावला याबद्दल बरेच वाद आहेत. कुणी म्हणतं की १८८३ मध्ये लुईस वॉटरमॅन नावाच्या माणसाने याचा शोध लावला, कुणी म्हणतं जॉन मॉलेट नावाच्या माणसाने हा खेळ शोधला, तर कुणी म्हणतं की कुणीतरी तिसऱ्याच माणसाने हा खेळ शोधला! काही जणांचं तर म्हणणं आहे, की त्याही पूर्वी कुठल्यातरी वेगळ्याच नावाने हा खेळ अस्तित्वात होता! १८८६ सालच्या ‘द सॅटर्डे रिवू’मध्ये रिव्हर्सीचा पहिला लिखित उल्लेख सापडतो. पण हा खेळ इंग्लंडमध्ये लोकप्रिय व्हायला मात्र एकोणिसाव्या शतकाची अखेर उजाडावी लागली! सध्याच्या या मॉडर्न रूपातला ‘ऑथेल्लो’ मात्र १९७१ मध्ये जपानमधल्या गोरो हॅसेगावा यांनी शोधला.’’
मैत्रेयीचं बोलणं संपेपर्यंत कणसाचे दाणे काढून झाले होते आणि गॅस बंद करायची वेळही झाली होती. त्यामुळे आजोबा आत गेले. बाबाची बाकीची तयारी झालेली बघून त्यांनी दाणे स्वच्छ धुऊन उकळत्या पाण्यात टाकले आणि झाकण ठेवून ते म्हणाले, ‘‘मला तर या खेळाचं नाव ऐकलं की शेक्सपियरच्या ‘ऑथेल्लो’चीच आठवण होते. कॉलेजमध्ये असताना शेक्सपियरच्या नाटकातली कितीतरी स्वगतं मला पाठ होती!’’
‘‘करेक्ट आहे आजोबा! या खेळाचं नाव शेक्सपियरच्या ऑथेल्लोवरूनच ठेवलं गेलंय. गोरो हॅसेगावा यांचे वडील शिरो हॅसेगावा हे इंग्लिश साहित्याचे अभ्यासक होते. त्यांनीच या खेळाला ऑथेल्लो हे नाव दिलं. जपानमधल्या या खेळाची लोकप्रियता बी.बी.सी.पर्यंत पोचली आणि त्यांनी जॅपनीज् ऑथेल्लो चॅम्पियन आणि ब्रिटिश चेस मास्टर यांच्यात मॅचेस आयोजित केल्या. १९७६ मधल्या या सामन्यांचे निकाल जगभर प्रसिद्ध केले गेले आणि ऑथेल्लो या खेळाला जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळाली. नंतर १९७७ मध्ये वर्ल्ड ऑथेल्लो फेडरेशनची स्थापना झाली आणि तेव्हापासून दरवर्षी ऑथेल्लोचे सामने आयोजित केले जायला लागले!’’ मैत्रेयीने माहिती पुरवली.
मैत्रेयीने तिच्या प्रोजेक्टसाठी केलेला अभ्यास, संशोधन आणि माहिती सांगण्याची तिची कला या सगळ्यासाठी घरातल्यांनी तिचं कौतुक केलं. तोपर्यंत ऑथेल्लोच्या खेळात आजी जिंकली आणि ‘पार्टी’ असं म्हणत बाबा आणि आजोबांनी कॉर्न पॅटिस आणि वाफाळता चहा बाहेर आणला. आजोबांची ‘ऑथेल्लो’मधली अजूनही पाठ असलेली स्वगतं ऐकता ऐकता कॉर्न पॅटिसचा कधी फडशा पडला ते कळलंच नाही!
अंजली कुलकर्णी-शेवडे anjalicoolkarni@gmail.com
खेळायन : ऑथेल्लो
तिच्यासोबत खेळण्यासाठी, पुस्तकं वाचण्यासाठी दिवसभरातला थोडा वेळ ते नेहमीच राखून ठेवत असत.
Written by अंजली कुलकर्णी-शेवडे
आणखी वाचा
First published on: 03-07-2016 at 00:45 IST
मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Othello game