आज वाचायला कमी व पाहायला जास्त असणार आहे. भारतातील बंगाल भागात (१९ व्या शतकात) ही चित्रपरंपरा सुरू झाली. या चित्रांना ‘कालिघाट चित्र’ म्हणून ओळखले जाते. बंगाली लोक कालीमातेला पूजतात. या कालीच्या मंदिरात ही चित्रं निर्माण झाली. मग पुढे स्थानिक गावकऱ्यांनी जोपासली. लक्ष्मी, काली, सरस्वती, अन्नपूर्णा या देवी. रामायण, महाभारत यांतील घटना चित्रात असत. पण रोजच्या जगण्यातील घटनादेखील या चित्रात दिसतात.
बंगाली चित्रकार जेमिनी रॉय यांनी कालिघाट चित्रांना अभ्यासून स्वत:ची आधुनिक चित्रपद्धती तयार केली. या चित्रांत पाहा. या चित्रात ठळक रेषा, मोठे व सोपे आकार, चटकदार रंग दिसतील. आपण काळ्या स्केचपेनने आऊटलाइन काढून बाहेर गेलेला रंग लपवतो तसेच इथेही खूपच जाड आऊट लाइन दिसते. बहुतेक या चित्रकारांचेही रंग बाहेर जात असावेत!
प्रत्येक प्राण्याला माणसासारखे डोळे असणं हे या चित्रांचे वेगळेपण आहे. प्राण्यांच्या पाठीवर जाड रंगाने केलेली नक्षी आहे, तीही सोपी व सहज!
चित्र पाहून असं वाटतं की आपणदेखील हे सहज काढू शकतो. पण आपण इथेच चुकतो. फोटोत दिसणारी मांजर, घोडे, हत्ती कॉपी करून काढू शकतो, पण नव्याने एखाद्या प्राण्यांचे चित्र तयार करू शकत नाही. कुठल्याही वस्तूंचे सोपी सहज चित्रात रूपांतर करणं हेच मुळात खूप कठीण असतं.
या चित्रातील मांजर दरवेळी काहीतरी खात असते. इथे ती खातेय मोठा लॉबस्टर (झिंगा)! आता ती झिंगा- मासे का खातेय? तर तुम्हाला माहीत असेल की कोलकाता मध्ये भात व मासे हे मुख्य अन्न आहे. तुमचं मुख्य अन्न काय? या दुसऱ्या चित्रातील सोपा बैल पाहा. चौकोनाला एका ठिकाणी मोडून त्याचे तोंड तयार केले आणि तो आयत बैल वाटू लागतो.
तुम्हाला कुठला प्राणी पाळायला आवडेल? त्या प्राण्यांचे चित्र थेट ब्रशने काढा. पेन्सिल किंवा खोडरबर वापरायचा प्रश्नच येणार नाही.
श्रीनिवास आगवणे shreeniwas@chitrapatang.in