शाळेत हस्तव्यवसायाच्या बाईंनी मुलांना टाकाऊतून टिकाऊ वस्तू तयार करायला सांगितली होती. गणेशोत्सवाला चेतनच्या घरी आरास केली होती, त्यातून काही रंगीबेरंगी कागद उरले होते. ते खिडकीजवळील टेबलावर ठेवून वेगवेगळ्या आकारांत त्यांतील काही कागद तो कापत होता.
अचानक सोसाटय़ाचा वारा आला अन् एक चौकोनी आकाराचा झगमगीत कागद खिडकीबाहेर उडाला. चेतनने लगेच खिडकी बंद केली नि तो बाल्कनीत धावला. खाली वाकून पाहिल्यावर त्याला कागद गवतावर पडलेला दिसला. त्याला वाईट वाटलं, ‘‘अरेरे, कागदाला माती लागली असेल! जाऊ दे. दुसरा कागद कापावा.’’ तो परत वेगवेगळे आकार कापण्यात गर्क झाला.
बिचारा कागद गरगरत खाली पडला. त्याला गवतफुलांनी हलवलं, ‘‘अरे कागदा, आम्ही तुला हलकेच झेललं, पण तू आम्हाला का झाकतोस? वाऱ्याबरोबर आम्हालाही डोलू दे, झुलू दे. ’’
‘‘ऐक. मी मुद्दाम काहीही केलं नाही. मला हातपायच नाहीत. माझं अस्तित्व दुसऱ्यांवर अवलंबून असतं.’’
‘‘आमचं आयुष्य तर एक दिवसाचं. ते हसत हसत जगावंसं वाटतं. आम्ही आमच्याच धुंदीत जगतो. एखाद्या वाटसरूचं लक्ष गेलंच तर कुणाला आनंद दिल्याचं समाधान मिळतं. नाहीतर पायदळी तुडवले जातो. ’’
‘‘हो. खरंय! पण ऐका. जेव्हा कारखान्यात मलाही सुंदर रूप मिळालं तेव्हा खूप आानंद झाला. वाटलं भेटवस्तूवर आवरण म्हणून किंवा घर-देव्हारा सजवायला तसेच आकाशकंदिलासाठी माझा उपयोग होईल. चेतनच्या बाबांनी गणपतीच्या सजावटीसाठी मला घरी नेलं. मोठय़ा कागदाचे अनेक तुकडे कापले. त्यांपकीच मी एक. इतर तुकडय़ांचा मखरीसाठी उपयोग झाला. मला कित्येक महिने कपाटात बंदिस्त केलं होतं. आज बाहेर काढलं. मोकळा श्वास घ्यायला मिळाला, पण वाऱ्याबरोबर मी हा असा खाली आलो. तुम्ही अलगद झेललं. माझ्यामुळे तुम्हाला त्रास होतोय. मी ते दु:ख समजू शकतो. विश्वास ठेवा. वारा आला की मी नक्कीच उडून जाईन.’’
तितक्यात एक लहान मुलगा खेळत खेळत तिथे आला. त्याचं लक्ष त्या चमचमणाऱ्या कागदाकडे गेलं.
‘‘अरेव्वा! किती सुंदर चमचमणारा कागद! याचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे.. वाऱ्यावर थोडासा वाळवला तर यापासून छानशी होडी करता येईल. ’’
त्याच वेळी त्याचा मित्रही धावत आला नि त्यानं विचारलं ‘‘स्नेहल, काय करतोस? ’’
‘‘अरे सागर, हा कागद बघ किती छान आहे! जरासा ओला झालाय. जरा वाळल्यावर याची होडी करून पाण्यात सोडू या. गंमत येईल.’’
स्नेहलने कागद हाती घेताच रानफुलांना मोकळं मोकळं वाटलं. स्नेहल, सागर या दोन्ही मित्रांचा संवाद ऐकून तर कागदाला सुखद गुदगुल्या झाल्या. कागद वाऱ्यावर सुकल्यावर स्नेहलने छानशी सुबक होडी तयार केली.
‘‘ए स्नेहल, तो बाजूचा ओहळ आहेच. त्यात ही चिमुकली होडी सोडली तर पुढे पुढे वाहत जाईल. मज्जा येईल.’’
‘‘हो, हो! खरंच. चल लवकर.’’
‘‘ए, जरा थांब. आपण ही रानफुलंही होडीत ठेवू या.’’
सागरने ती रंगीबेरंगी नाजूक रानफुलं हळुवार खुडली अन् त्या इवल्याशा होडीत ठेवली. रानफुलांना किती आनंद झाला! जणू हर्षवायूचा संचार त्यांच्यात झाला होता. त्यांना लहानाहून लहान झाल्यासारखं वाटलं, उडय़ा माराव्याशा वाटल्या.
स्नेहलने होडी सोडली. होडीला गती मिळाली. सागर, स्नेहल उल्हासात टाळ्या पिटत नाचू लागले. त्यांचा आवाज ऐकून इतरही मुलं धावत आली, त्यांच्या आनंदोत्सवात सामील झाली.
मुलांचा गोंगाट ऐकून चेतनही बाल्कनीत आला. ते आल्हाददायक दृश्य पाहून तोही नाचू लागला. त्याच्या कागदाचा सदुपयोग झाला होता. दुसऱ्याला आनंद देण्यात खरंच किती समाधान असतं. होडी नि रानफुलंही धन्य झाली.’
कागदाची होडी नि रानफुले
शाळेत हस्तव्यवसायाच्या बाईंनी मुलांना टाकाऊतून टिकाऊ वस्तू तयार करायला सांगितली होती. गणेशोत्सवाला चेतनच्या घरी आरास केली होती, त्यातून काही रंगीबेरंगी कागद उरले होते.
First published on: 14-07-2013 at 01:02 IST
मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Paper and flowers