मेघश्री दळवी

गेल्या काही वर्षांमध्ये चंद्र, मंगळ अशा स्वाऱ्या झाल्या. कॅसिनीने शनी आणि गुरूच्या आसपास भरपूर निरीक्षण केलं. पूर्वी मरिनर यान बुध ग्रहापाशी आणि वेनेरा शुक्रावर गेलेले आहेत. व्हॉयेजरने युरेनस आणि नेपच्यूनला भेट दिली आहे, तर पायोनियर यान फिरत फिरत केव्हाच आपल्या सूर्यमालेपलीकडे गेलं आहे. पण नुसता ग्रहांचा अभ्यास संशोधकांना पुरे होत नाही. त्यांना खरं तर खुणावत असतो सूर्य. आपल्याला प्रकाश आणि ऊर्जा देणारा हा तेजस्वी तारा.

सूर्याचं दुरून थोडंफार निरीक्षण झाल्यावर आता नासाने पहिल्यांदाच एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. सूर्याचा जवळून अभ्यास करण्यासाठी नासाचा पार्कर प्रोब सज्ज झाला आहे. यान म्हटल्यावर डोळ्यासमोर जे चित्र येतं त्या तुलनेत असा प्रोब छोटा असतो. त्यात फक्त काही उपकरणं बसवलेली असतात. आपली कामं पूर्ण झाली की तिथेच हा प्रोब नष्ट होऊन जातो.

सूर्यासंबधी अनेक र्वष संशोधन करणाऱ्या युजिन पार्कर या शास्त्रज्ञाचं नाव या प्रोबला दिलं आहे. इतका काळ दुरून अभ्यास केल्यावर आता प्रत्यक्ष माहिती हातात पडणार या कल्पनेने नव्वद वर्षांचे युजिन खूप खूश झाले आहेत.

येत्या जुलैमध्ये सूर्याकडे झेप घेणाऱ्या या मोहिमेत सौर वारा आणि सौर वादळं यांचा अभ्यास होणार आहे. त्यासाठी पार्कर प्रोब सूर्यापासून अवघ्या साडेसहा कोटी किलोमीटरवर जाऊन नोंदी घेणार आहे. अर्थात अवकाशातली अंतरं प्रचंड असल्याने साडेसहा कोटी म्हणजे चांगलंच जवळ की! त्यातून हा झाला सूर्याचा करोना म्हणजे त्याचं प्रभामंडळ. त्यात प्रखर विकिरणं (रेडिएशन) आहेत आणि तापमान आहे चौदाशे अंश सेल्सियस! या कडक तापमानाला तोंड देण्यासाठी पार्कर प्रोबवर खास उष्णतारोधक पदार्थाचा साडेचार इंच जाडीचा थर दिला आहे.

सूर्याच्या प्रभामंडळात सात वर्षांत चोवीस फेऱ्या घालत हा पार्कर प्रोब आपल्याला कोणती नवनवीन आणि नवलाईची माहिती देईल याची आता सर्वाना उत्सुकता आहे.

meghashri@gmail.com

Story img Loader