श्रीनिवास बाळकृष्ण
मित्रा, तुझ्या डोक्यावरच्या टोपीचं वैशिष्टय़ असं की, त्या खालचा ‘तू’ कधीकधी गायब होऊन जातोस. आणि मग टोपीला तुला खूप खूप शोधावं लागतं. कधी तरी उन्हाळय़ाच्या सुट्टीत तू सापडतोस, तर कधी ट्रेकला जाताना. अशा या टोप्या कधी झाडावरच्या माकडाच्या डोक्यावर, तर कधी तुझ्या डोक्यावर बसतात. पण आज मात्र तुला सोडून या तीन पुस्तकांत अनेकांच्या डोक्यावर फिरतायेत. ही तीन पुस्तके आपल्या जुन्या कॅनेडियन मित्राची. ज्याला आपण मागे कधीतरी धावतं भेटलोय. चित्रांच्या स्टाईलवरून बरोब्बर ओळखलंस.. तोच तो त्रिकोण, वर्तुळ आणि चौकोनाची पुस्तके चितारणारा ‘जॉन क्लासिन’! इथं मात्र लेखक आणि चित्रकार अशा दोन्ही भूमिका साकारल्यात.
तिन्ही पुस्तकाचा वरवर दिसणारा विषय म्हणजे टोपी. हरवलेली, शोधलेली आणि सापडणारी टोपी. या तिन्ही पुस्तकांमध्ये प्राणी, मासे आणि कासव आहेत. खरं तर जे कध्धीच टोपी घालत नाहीत. त्यांना टोपीचं आकर्षण असेल असंही नाही, पण पुस्तकात आहे. हे प्राणी इतर कुठलेही मानवी वस्त्र न घालता, शहरात न राहताही एका टोपीसाठी जीव ओततात आणि घेतात.
आणि आपण त्या गोष्टीत कुठलेही लॉजिकल प्रश्न न आणता रंगून जातो. असा प्रश्न पुस्तक पाहताना पडू नये म्हणून चित्रकाराने टोपीचा आणि प्राण्यांचा आकारात आणलेला सारखेपणा. ती आधुनिक टोपी त्या प्राणी विश्वाचाच भाग वाटते.
हेही वाचा >>> पोटलीबाबा : सशाने मारली उडी..
या तिन्ही पुस्तकात टोपीभोवती एक गंभीर वातावरण दिसून येतं. लहान मुलांचे आहे म्हणून कर कॉमेडी, लिही विनोदी असं काही नाही. ही हलक्या फुलक्या कथेतही गंभीरता आणायला चित्रातल्या वातावरणाचा उपयोग चित्रकाराने केलाय. खूप सारी मोकळी जागा, पूर्ण अंधार, कातरवेळ, एकेकटे प्राणी दाखवून हा परिणाम साधलाय. या प्राण्यांचे पुस्तकभर वाढलेले मोठे आकार आणि अचानक पुढच्या पानावर छोटा आकार तर याची खास स्टाईलच!
छोटे-मोठे दोन्ही आकारातले प्राणी एकत्र दाखवणं म्हणजे किती कठीण काम हे आपण खूपदा पाहिलंय ना! त्यात मजकुराला अर्थात टेक्स्टला वेगळी स्वतंत्र जागा दिल्याने त्यांची लुडबुड चित्रात होत नाही. चित्र आणखीनच चित्र राहतात. इतकं की एखादा प्राणी टेक्स्टमध्ये वेगळं बोलत असला तरी आपल्यासमोरच्या चित्रात घडतं मात्र भलतंच. ही वेगळी गंमत या पुस्तकांत आहे.
हेही वाचा >>> पोटलीबाबा : शीऽऽऽ इ इ इ!
इथले कथेतील मुख्य प्राणी हिरो आहेत म्हणून प्रेमळ, दयाळू फियाळू नाहीत. सेम प्राण्यांसारखेच वागतात. फक्त डोळे आपल्या माणसासारखे असल्याने त्यांच्या भावना आपल्याला थेट कळतात. आकार काढण्याची पद्धत फार सोपी आणि साधी. शक्यतो एका मातकट जलरंगात पूर्ण प्राणी चितारायचा. तो रंग सुकल्यावर केस, कवच, नाक, इत्यादी डिटेल्स त्याच पण जरा गडद रंगाने काढायचे. मग डोळे!
या प्राण्यांच्या सावल्या वगैरे काढत बसत नाही. चित्रात दिसत असल्याप्रमाणे कागद शक्यतो रिकामाच. परिसराचा अंदाज यायला एखाद् दोन गवत, झाडं, फुलं, पाने! वातावरण कळायला सूर्य किंवा चंद्र.
अंधारात हटकून दिसणारे तारे किंवा बुडबुडे. इतकी सोपी मांडणी की आपल्यालाही चित्र जमतील असा विश्वास देणारी. या प्राण्यांच्या टोपीखाली काय दडलंय ते हे पुस्तक पाहूनच समजेल.
हेही वाचा >>> पोटलीबाबा : फ्रेंच मिसळपावची गोष्ट!
पुस्तकाची नावं लिहून घ्या. देखणी पुस्तकं विकत घ्या किंवा निदान युटय़ुबवर पाहा- ‘वी फाउंड अ हॅट’, ‘धिस इज नॉट माय हॅट’, ‘आय वॉन्ट माय हॅट बॅक’.. तीनही पुस्तकांत चित्रमालिका एकापुढे एक अशी जाते की जणू हलती चित्रं. त्यामुळेच का काय पण या सर्व चित्रांची अनिमेशन फिल्म पाहायला मिळेल.
shriba29@gmail.com