प्रिय मित्रा,

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इथे समुद्राने माझ्या डोळ्यांचा आणि जिभेचा फारच पाहुणचार केलाय. इथे आल्यापासून वेगवेगळ्या आकाराची, ठेवणीची, चवीची मासळी रोज चाखतोय, पण सर्व मासे लाल तिखट, हिरव्या मसाल्यात, हळदीच्या पिवळ्यात येत असल्याने ते नेमके कुठल्या रंगांचे आहेत हे मला कळत नव्हते.

मग आज समुद्राने त्याच्या किनाऱ्यासोबत मला मासळी बाजार दाखवलाच. नैसर्गिक रंग जसे डोळ्यांना हवेहवेसे वाटतात तसे काही नैसर्गिक वास मला मोहून टाकतात. जसे की फोडणी, शेण, चूल, नवा कागद…त्याच रांगेत आता मासळी बाजारही आला. पण इथे रंगाबाबतीत त्याने थोडी निराशाच केली.

हेही वाचा…बालमैफल : वृक्षवल्ली आम्हां सोयरे

तर चित्रास कारण की, फिश टँकमध्ये रंगीत मासे असतात तसे या समुद्राच्या पोटात किती तरी रंगाचे मासे असायला हवे ना? पण इथे जास्त करून राखाडी (ग्रे)! खाडीतली कोळंबीदेखील ‘ग्रे’च.

लालसर कोळंबी, नारंगी मांदेली, जांभळट लाल माकुळ (स्क्विड), गुलाबी राणी मासा सोडल्यास बाकीचे सर्वच काळ्या रंगाच्या पट्टीत दिसले. आता ही ग्रे रंगाची पट्टी म्हणजे… एका टोकाला काळा रंग घे, त्यात एक एक थेंब पांढरा रंग मिसळत जा, प्रत्येक रंग कागदावर लाव. मग तुझ्याकडे ग्रे रंगाच्या अनेक छटा तयार होतील. डार्क टू लाइट.

हेही वाचा…बालमैफल : भाषा… आपलं अस्तित्व

मी केवळ दोन रंग घेऊन अशा छटा तयार करून सर्व मासे काढले. कसे वाटले? मित्रा, तूही मासळी बाजारात जा. तुला तिथे दिसणाऱ्या ग्रे रंगाला कागदावर आण. सर्वांत काळा मासा कुठला दिसतोय तुला? मासळी बाजार नसेल तर भाजी बाजारात जाऊन हिरव्या भाज्यांचे वेगवेगळ्या रंगछटा तयार करून पाठवशील?

हेही वाचा…बालमैफल : मराठमोळा वाढदिवस

तुझ्या पत्राची… चित्राची वाट पाहतोय.

तुझाच खासमखास मित्र,
श्रीबा

shriba29@gmail.com

मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Picture painting fishes from sea and letter fifty shades of grey psg