अदिती देवधर
आपल्या वयाच्या मुलांपर्यंत पर्यावरणाविषयी माहिती पोहोचवायची असेल, तर त्यांना ज्या स्वरूपात आवडते त्याच स्वरूपात असली पाहिजे. मुलांना काय आवडतं? गोष्टी ऐकायला आवडतात, खेळायला आवडतं. त्याच माध्यमातून मुलांपर्यंत पोहोचायचं असं ठरलं. यतीनच्या शाळेत लगेचच संधी मिळाली.
आई किंवा बाबांचा लॅपटॉप वापरताना त्यांच्या कामात अडथळा येणार नाही हे बघायचं असं केदार दादानं बजावलं होतं. अभ्यासपूर्ण आराखडा जेव्हा तयार झाला, तेव्हाच मुलांनी आई-बाबांकडून लॅपटॉप मागितला. सगळी पूर्वतयारी असल्यानं दहा ते पंधरा मिनिटांत पॉवर पॉइंट तयार झालंसुद्धा. ज्यांचे फोटो वापरतो त्यांना न विसरता श्रेय द्यायचं हे केदार दादानं त्यांना सांगितलं.
संपदाच्या घरी एकत्र बसून सगळय़ांनी काम केलं. गणेश आणि गँग ऑनलाइन होते. त्यांनाही त्यांच्या शाळेत गोष्ट सांगण्याची संधी मिळाली होती.
‘‘साल १९९७. कॅप्टन चार्ल्स मूर त्याच्या अल्गाईता बोटीतून कॅलिफोर्नियाला जायला निघाला. हवाई बेटावर बोटींच्या स्पर्धेत भाग घेऊन तो आता घरी निघाला होता.’’ यतीननं गोष्ट सांगायला सुरुवात केली. एकीकडे जगाच्या नकाशावर त्यानं हवाई बेट कुठे आहे आणि कॅलिफोर्निया कुठे आहे ते दाखवलं.
हेही वाचा >>> बालमैफल: बिनायाका-तेन
‘‘नेहमीच्या मार्गानं न जाता त्यानं लांबचा मार्ग निवडला. या भागाला प्रशांत म्हणजे पॅसिफिक महासागरातलं वाळवंट म्हणतात. तिथे मासे फारसे नाहीत, त्यामुळे मासेमारी करणाऱ्या बोटी या भागात फिरकत नाहीत. सागरी प्रवाह असे आहेत की जहाजे आणि बोटींना फारशी अनुकूल परिस्थिती नाही.
एक आठवडा चार्ल्स मूर आणि त्याचे सहकारी प्रवास करत होते, पण दुसरी बोट त्यांना दिसली नाही. तिसऱ्या दिवशीपासून पाण्यात प्लॅस्टिक मात्र दिसू लागलं. बाटलीचं झाकण, कुठे प्लॅस्टिक सील, अशा छोटय़ा गोष्टींनी सुरुवात झाली. मग ते प्रमाण वाढत गेलं. सातव्या दिवशी समोर दिसलं ते हादरवून टाकणारं होतं.
समुद्रात प्लॅस्टिकचा कचरा पसरलेला होता. जणू प्लॅस्टिकचं बेटच होतं. त्याची व्याप्ती किती होती? चार महाराष्ट्र त्यात मावतील. त्याला त्यानं ‘ग्रेट पॅसिफिक गार्बेज पॅच’ असं नाव दिलं.
समुद्राच्या ज्या भागात कोणी फिरकत नाही तिथे एवढा कचरा आलाच कसा? चार्ल्स मूरला वाटलं, बहुधा नौदलाच्या नौका गस्त घालणाऱ्या नौकांनी टाकला असेल.
हेही वाचा >>> बालमैफल: पृथ्वीचं सरप्राइझ
तो कचरा काही त्याच्या मनातून जाईना. दोन वर्षांनी मोठी टीम घेऊन पूर्ण तयारीसह तो त्या ठिकाणी परत गेला. गार्बेज पॅचमधल्या काही वस्तू नमुना म्हणून गोळा केल्या. बहुतांश प्लॅस्टिक होतं. त्याचा अभ्यास केल्यावर त्याला आणखी धक्का बसला. त्यातल्या ८०% वस्तू जमिनीवर कचरा म्हणून टाकलेल्या होत्या. ओढे-नद्यांमार्फत त्या समुद्रापर्यंत पोहोचल्या होत्या. समुद्री प्रवाहांमुळे त्या भोवऱ्यात येतात तशा इथे गोळा होत होत्या. असेच पॅचेस सगळय़ाच समुद्रांमध्ये आहेत असं त्याच्या लक्षात आलं.’’
‘‘असं झालं कसं आणि कधी?’’ प्रश्न विचारून यतीन थांबला. सगळेजण गोष्टीत रंगून गेले होते. आता चर्चा सुरू झाली. aditideodhar2017@gmail.com