बालमित्रांना आवडतील आणि त्यांनी वाचावीत अशी दोन अनुवादित पुस्तकं ‘चंद्रकला प्रकाशन’ तर्फे प्रकाशित करण्यात आली आहेत. ‘रवींद्रनाथांच्या गोष्टी’ हे एक, तर दुसरे ‘मुलांच्या आवडत्या जपानी गोष्टी’चा दुसरा भाग. या दोन्ही पुस्तकांचा अनुवाद शशिकला उपाध्ये यांनी केला असून, बच्चेकंपनीला आवडेल अशा लेखनशैलीत त्यांचा अनुवाद झाला आहे. यातील गोष्टी वाचताना मुलं नक्की रमून जातील आणि ती केवळ त्यात रमणारच नाहीत, तर प्रत्येक गोष्टीतून काही ना काही मूल्यशिक्षणाचे धडे घेतील याची खात्री वाटते.
‘रवींद्रनाथांच्या गोष्टी’ या पुस्तकातली पहिली नाटुकली ‘छडी (न) लागे छम छम !’ मुलांना नक्कीच आवडेल आणि हे नाटुकलं ते विविध कार्यक्रमांत नक्की करू शकतील असंच आहे. या नाटुकल्यासह आणखी दोन गोष्टी या पुस्तकात असून त्यातील एक ‘पोपटाची कहाणी’ तर दुसरी ‘इच्छा तर पूर्ण झाली’. ही गोष्ट वाचताना खूपच धमाल येते. या पुस्तकाचे मूल्य ४० रुपये पृष्ठे ३२ आहेत. या पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि आतील चित्रे दीपक संकपाळ यांची आहेत. एका बंगाली पुस्तकाचा अनुवाद म्हणजे ‘रवींद्रनाथांच्या गोष्टी’ हे पुस्तक आहे.
‘मुलांच्या आवडत्या जपानी गोष्टी’ च्या दुसऱ्या भागात जादूची किटली, छडीवाला शॉबी, लांब नाकाचे विदूषक, जीभ कापलेली चिमणी, कापड विणणारा कोळी, आखूड शेपटीचं माकड अशा सहा कथा आहेत. कृतज्ञता, प्रेम, दया, क्षमाशीलता, उद्योगीपणा, समयसूचकता, औदार्य, सहकार्य या गुणांबरोबरच शौर्य, धैर्य, देशप्रेम हे गुणही अंगी बाळगले तर काय-काय फायदे होऊ शकतात, हे नकळतपणे या गोष्टींमधून समजते. तसेच पर्यावरण, वनस्पती, पक्षी, प्राणी यांचं महत्त्व बच्चेमंडळींना समजू शकेल आणि नकळतच ही मंडळी त्यांच्यावर प्रेम करू लागतील. मराठी वाचणाऱ्या मुलांना वेगळ्या भाषेतील गोष्टी समजाव्यात म्हणून उपाध्ये यांनी या दोन्ही गोष्टींचा अनुवाद केला आहे. या गोष्टी वाचून बालमित्रांची दृष्टी व्यापक होण्यास मदत होईल, असा विश्वास वाटतो. सुशील पाटील यांनी या पुस्तकाचे मुखपृष्ठ केले असून आतील छानशी चित्रेदेखील त्यांचीच आहेत. या पुस्तकाचे मूल्य ४० रुपये व ३२ पाने आहेत.
‘जादूची किटली’ यात एका किटलीचा रोमांचकारक प्रवास आहे. ‘छडीवाला शॉबी’ ही एका गरीब शेतकऱ्याची कथा आहे. ‘लांब नाकांचे विदूषक’ ही दोन विदूषकांची तर ‘जीभ कापलेली चिमणी’ ही गोष्ट आहे आजी-आजोबा आणि चिमणीची. ‘कापड विणणारा कोळी’ ही गोष्ट विणकर आणि कोळ्याची आहे तर या पुस्तकातील शेवटची गोष्ट आहे मुर्ख माकडाची.
ही पुस्तकं सुट्टीच्या दिवशी वाचली किंवा अभ्यासातून थोडासा वेळ काढून वाचली तर अभ्यासाचा कंटाळादेखील येणार नाही आणि खूप छान काही तरी वाचल्याचे समाधान बालमित्रमैत्रीणींसह त्यांच्या पालकांनादेखील नक्कीच मिळेल.
    

Story img Loader