एकदा काय झालं, आपला छान पांढराशुभ्र पिसारा डोलवत मोर जंगलातून ऐटीत फिरत होता. इतक्यात त्याला कोणाच्या तरी रडण्याचा आवाज आला. त्याने इकडे तिकडे पाहिलं. जवळच्या खड्डय़ातून आवाज येत असल्याचं त्याच्या लक्षात आलं. मोराने डोकावून पाहिलं तर आत एक सशाचं पिल्लू अडकलं होतं आणि घाबरून थरथर कापत होतं. मोठमोठय़ानं रडतही होतं. मोराला पिल्लाची अवस्था बघून खूप वाईट वाटलं.
त्याने पिल्लाला प्रेमाने विचारलं, ‘काय रे बाळा, इथे कसा पडलास? तुला दिसला नाही का एवढा चिखल?’
‘हो ना काका, पळता पळता पडलो मी. मला इथून बाहेर काढा ना!’ ससुल्या रडत रडतच म्हणाला.
मोरानेही लगेच त्या खड्डय़ात उडी मारली आणि आपल्या पिसाऱ्यावर बसवून पिल्लाला बाहेर काढलं. पिल्लू खूश झालं. त्याने मोराला कडकडून मिठी मारली आणि मग ते निघून गेलं. इकडे घरी आल्यावर मोराच्या लक्षात आलं की, आपला छान शुभ्र पिसारा चिखलाने माखलाय. ‘शी! किती घाण झालाय पिसारा! हे ससुल्याला वाचवताना झालं वाटतं! असू दे! स्वच्छ आंघोळ करतो म्हणजे परत माझा सुंदर, देखणा पिसारा फुलवून मला ऐटीत फिरता येईल,’ असं म्हणत त्याने पिसारा स्वच्छ करायला सुरुवात केली. पण खूप घासून-पुसून, धुऊनही त्याच्या पिसाऱ्याचा पांढरा रंग काही त्याला परत मिळाला नाही. काळा, मातकटलेला पिसारा पाहून मोर खूप खूप दु:खी झाला. आणि त्या दिवसापासून तो कोणालाच मदत करेनासा झाला. उलट सगळ्यांशी तुसडय़ासारखं वागू लागला.
मोराचं ते रूप आणि त्याचं बदललेलं वागणं बघून जंगलातल्या इतर प्राण्यांनाही प्रश्न पडला. त्यांनी मोराला विचारलं, ‘मित्रा, काय झालं? तुझ्या पिसाऱ्याचा रंग गेला म्हणून तू दुखी आहेस, हे आम्ही समजू शकतो. पण तू आमच्याशी पूर्वीसारखा प्रेमळपणे का वागत नाहीस? कुणाशीच नीट बोलत नाहीस. अरे, आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो, ते तुझ्या रूपामुळे नव्हे, तर तुझ्या गुणांमुळे. तुझ्या प्रेमळ, मनमिळाऊ स्वभावामुळे. परत पूर्वीसारखा हो पाहू आणि चांगलं वागायला लाग.’
मोर चिडूनच म्हणाला, ‘आता ते शक्य नाही, काय मिळालं मला चांगलं वागून, सगळ्यांना मदत करून? त्या दिवशी त्या ससुल्याला मदत करायला गेलो आणि माझी ही अवस्था झाली. त्याला मदत करायला गेलोच नसतो तर.. चांगलं वागूनही माझ्याबाबतीत इतकं वाईट घडलं, मग मी कशाला चांगलं वागून?’
सगळ्या प्राण्यांनी त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण मोराने काही आपला हेका सोडला नाही. सगळे प्राणी हताश होऊन निघून गेले. दिवसेंदिवस मोराचं वागणं अधिकच वाईट होत गेलं. जंगलातलं पूर्वीचं आनंदी वातावरणही पार बिघडून गेलं.
शेवटी सगळे प्राणी मिळून देवांचा राजा इंद्र याच्याकडे गेले. त्यांनी देवेंद्राला सगळं सांगितलं आणि म्हणाले, ‘हे देवाधिराज, आता तूच काहीतरी कर आणि आमचा आधीचा प्रेमळ मित्र आम्हाला परत दे. आमचं हसतं-खेळतं जंगल पुन्हा तसंच कर.’
‘ठीक आहे, तुम्ही मोराला माझ्याकडे घेऊन या.’ देवेंद्र म्हणाला.
मग सगळे प्राणी मोराला देवेंद्राकडे घेऊन आले. मोराच्या पिसाऱ्याची ती कळकटलेली अवस्था बघून देवेंद्रालाही वाईट वाटलं. त्याने मोराला सांगितलं, ‘अरे मोरा, रूप म्हणजे काही सर्वस्व नसतं. तुझं वागणं महत्त्वाचं. तू जंगलच्या सगळ्या प्राण्यांचा लाडका होतास ते तुझ्या वागण्यामुळे, रूपामुळे नव्हे! परत पहिल्यासारखा वागायला लाग बघू.’ राजाज्ञाच ती! ऐकायलाच पाहिजे असं मोराला वाटलं. पण तो मनातून मात्र खट्ट झाला. देवेंद्रानेही आपल्यासाठी काही केले नाही असं त्याला वाटलं. पण देवेंद्राविषयी त्याच्या मनात खूप आदर होता. त्यामुळे त्याने परत पहिल्यासारखं चांगलं वागायचं असं ठरवलं आणि तो जायला वळला. इतक्यात देवेंद्राने त्याला हाक मारली, ‘मोरा, जायच्या आधी माझ्या जवळ ये बघू.’ देवेंद्राने त्याच्या अंगावरून प्रेमाने हात फिरवला आणि अगदी हळुवारपणे म्हणाला, ‘अरे, चांगल्या वागणुकीचं फळ नेहमी चांगलंच मिळतं. आता शहाण्यासारखा वागशील ना?’
देवेंद्राच्या प्रेमाने मोराच्या डोळ्यात पाणीच आलं. त्याने हळूच हो म्हटलं. मग देवेंद्रच म्हणाला, ‘जा आता परत. जाण्याआधी त्या तळ्यातल्या पाण्यात स्वत:ला बघ. कळलं ना!’
मोराला देवेंद्र असं का सांगतोय ते कळलं नाही. पण तरीही जाताना तो तळ्यात डोकावला आणि पाहतो तर काय, त्याचा पिसारा पुन्हा पहिल्यासारखा पांढरा पांढरा शुभ्र झाला होता. त्याला खूप खूप आनंद झाला. त्याने देवेंद्राकडे कृतज्ञतेने पाहिलं आणि जंगलात परत आला. आता पुन्हा तो पहिल्यासारखा पिसारा फुलवून दिमाखात फिरतो. सगळ्यांना मदत करतो आणि खूप खूप प्रेमाने वागतोही!
मोराचा पिसारा
एकदा काय झालं, आपला छान पांढराशुभ्र पिसारा डोलवत मोर जंगलातून ऐटीत फिरत होता. इतक्यात त्याला कोणाच्या तरी रडण्याचा आवाज आला.
आणखी वाचा
First published on: 20-04-2014 at 01:06 IST
मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Plumage of peacock