दिवाळीच्या फराळाची
स्पर्धा इथे सुरू आहे
सांगे एकेक पदार्थ
मीच कसा मस्त आहे!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गरीगरीत मी ‘लाडू’
किती गोंडस नि गोल
गोड गोड चव माझी
तिचे वेगळेच मोल

‘करंजी’ मी आहे बाई
दिवाळीची खरी शान
माझा कातीव आकार
शोभे मज किती छान!

कुरकुरीत चविष्ट
सांगा बरे कोण आहे?
तुम्हा साऱ्यांची लाडकी
होय मी ती ‘शेव’ आहे!

काटेरी, खमंग गुणी
‘चकली’ हे माझे नाव
साऱ्यांपेक्षा मिळे मला
अधिकच इथे भाव!

‘चिवडा’, ‘शंकरपाळी’
तेही मागे न राहिले
आम्हावाचून दिवाळी
नाही होणार म्हणले!

असा फराळ स्वादिष्ट
धावे त्याच्याकडे मन
नको थांबाया दोस्तांनो,
आला दिवाळीचा सण!