माझ्या मायदेशाचा
मोर राष्ट्रीय पक्षी
पिसाऱ्यावर पाहा त्याच्या
नाना रंगी नक्षी
 
माझ्या मायदेशाचे
कमळ राष्ट्रीय फूल
देशसेवा करण्यास
तत्पर येथे मूल
 
माझ्या मायदेशाचे
आंबा राष्ट्रीय फळ
गोडी त्याची चाखुनी
अंगी येई बळ
माझ्या मायदेशाची
िहदी राष्ट्रभाषा
संवादातून देशाची
फुलून येते आशा
 
माझ्या मायदेशात
नाही काही अशक्य
सत्यमेव जयते
हेच ब्रीदवाक्य

माझ्या मायदेशात
भिन्न धर्म पंथ
एकतेची महती गाई
येथे कबीर संत
 
माझ्या मायदेशाचा
बावळा जरी वेश
संस्काराची शिदोरी
देई माझा देश

सैनिक
डॉ. प्रकाश गोसावी
देश माझा, मी देशाचा
सैनिक माझे नाव,
परचक्राचा येता घाला
सत्वर घेईन धाव

निधडी छाती, फौलादी बाहू
धमन्यांतूनी वाहे लाव्हा,
नजरेत आग-तेजाब
रणमर्द शूर मी छावा

भीती न मजला मुळी मरणाची
स्फुल्लिंग मी शौर्याचे,
पुढेच जाणे मजला ठावे
ब्रीद असे सैनिकाचे

खडा पहारा सीमेवरती
शत्रूचे करीन शीरकाण
तसू न देईन, स्वप्राणाचे
देईन तरी बलिदान

देश असे हा देव माझा
देशसेवा माझी पूजा
देशभक्तीचे कंकण हाती
धर्म न माझा दुजा

डौलात फडकतो तिरंगा
भारतभूमीची शान,
जनन-मरण तूजसाठी
तूजवरी कोटी जन्म कुर्बान!

Story img Loader