भल्या पहाटे वाघोबा उठले
जोरजोरात खोकायला लागले
खोकल्याची उबळ थांबेना
तोंडून डरकाळी फुटेना
हरीण वाऱ्यासारखं धावत सुटलं
‘वाघोबाला आलाय खोकला’
जंगलभर ओरडत सुटलं-
म्याऊ म्याऊ वाघोबाची मावशी आली
वाघोबाला हळुवार थोपटू लागली
साऱ्यांची मग भीती गेली
सारी वाघोबाभोवती गोळा झाली-
मावशी म्हणाली,
‘वाघोबा आता स्वस्थ पडा
तुमच्यासाठी मी करते काढा.’
काढय़ासाठी नव्हती मिरी
आणायला धावत पळाली बकरी
काढय़ासाठी नव्हती सुंठ
लगबगीनं गेला आणायला उंट
काढय़ासाठी नव्हती लवंग-पिंपळी
धावत घेऊन आली शेळी
ताजा मध आणला मधमाशीनं
ज्येष्ठमध आणला कोल्होबानं
माकडानी चुलीत विस्तव घातला
दगडी भांडय़ात काढा रटरट शिजला
उंट, शेळी, जंगलचे सारे सारे प्रेमळ
माझ्यासाठी करतात धावपळ
उगाच करतो मी यांचा छळ
वाघोबाच्या डोळ्यांतून झरले ओघळ
वाघोबाने काढा गटागटा घेतला
वाघोबाचा खोकला दूर पळाला
वाघोबाच्या तोंडून फुटली डरकाळी
जमलेली सारी धुम्म पळाली