डॉ. तेजस्विनी कुलकर्णी
dr.tejaswinikulkarni@gmail.com
मागच्या वेळी मी सांगितलेली सकारात्मक विचारांची गोष्ट वाचून मला माझ्या भाचीने लगेचच एक शंका विचारली. ती म्हणाली, ‘‘मी एखाद् दुसऱ्या वेळेस असा सकारात्मक विचार करू शकते गं मावशी, पण अनेकदा जेव्हा कशाची तरी भीती वाटते, तेव्हा नकारात्मक विचारांनी मन भरून जातं गं. तेव्हा हे सकारात्मक विचार करायला मन तयार होतंच असं नाही. कसं समजवायचं आपल्या मनाला?’’
खरं तर मलासुद्धा पूर्वी हा प्रश्न अनेकदा पडत असे. खासकरून परीक्षेच्या भीतीने सारखे सारखे येणारे नकारात्मक विचार अक्षरश: मला थकवून जायचे. तुम्हालाही कदाचित असा अनुभव आला असेल. चांगले प्रयत्न करूनसुद्धा वारंवार नकारात्मक विचार येतात आणि त्यांना कसं तोंड द्यायचं, कसं काय त्या विचारांना सकारात्मक विचारांमध्ये रूपांतरित करायचं, या कोडय़ामध्ये आपण अडकतो. कधी कधी तर या विचारांनीच थकून जातो. अशा वेळी नेमकं काय करायचं, याचं उत्तर मला सापडलं ते माझ्या आजीने दाखवलेल्या बागेतील एका गमतीदार प्रयोगातून!
एके दिवशी तिने मला सकाळी सकाळीच आमच्या घरामागच्या बागेत नेलं. तिथे दोन कुंडय़ांमध्ये लावलेली टोमॅटोची टवटवीत झाडं दाखवली. त्यांना छोटे छोटे हिरवट रंगाचे टोमॅटोसुद्धा लागले होते. ते ‘छोटुकले टोमॅटो कित्ती गोड आहेत’ या विचारांत रमून गेलेल्या मला पाहताच आजीने हाक मारली. ‘‘अगं, नुसतीच काय पाहत बसली आहेस त्या झाडांकडे? प्रयोग करायचा आहे नं आपल्याला?’’
‘‘हो आजी, सांग काय करू या?’’ मी प्रयोगासाठी सज्ज झाले.
‘‘हं, हा प्रयोग एक आठवडय़ाचा आहे बरं का. आज आपण प्रयोग सुरू करणार आणि एका आठवडय़ाने याच्या निकालाचे निरीक्षण करणार. आता यातली एक कुंडी उचलून आपल्याला घरात ठेवायची आहे. एका अंधाऱ्या जागी. या झाडापर्यंत सूर्यप्रकाश पोहोचता कामा नये. या झाडाला खत-पाणीसुद्धा अजिबात घालायचं नाही.’’
मला यासाठी एक उत्तम जागा सुचली. ‘‘बरं. मग आपल्या अडगळीच्या खोलीत ठेवू या का ही कुंडी?’’
आजीने होकार देत दुसऱ्या कुंडीचं काय करायचं ते सांगितलं. दुसऱ्या झाडाला आम्ही बाहेर बागेतच ठेवणार असं ठरलं. आजीने मला त्या झाडाला नियमित खत व पाणी घालायला सांगितलं.
बघता बघता आठवडा संपला. मी बाहेरच्या झाडाचं पालनपोषण करण्याचं माझं काम व्यवस्थित पार पाडलं होतं आणि आता मला उत्सुकता होती ती आमच्या प्रयोगाच्या निकालाची!
आजीने मला अडगळीच्या खोलीत ठेवलेलं झाड बाहेर आणून ठेवायला सांगितलं. मी लगेच ते घेऊन आले. आता आमची दोन्ही झाडं शेजारी शेजारी होती. एका आठवडय़ापूर्वी अगदी एकसारख्या अवस्थेत असणारी ही झाडं आज पाहते तर एकमेकांपासून पूर्णपणे वेगळी दिसत होती. आजी म्हणाली, ‘‘काय निरीक्षण आहे तुझं ते काळजीपूर्वक पाहून सांग.’’
मी अगदी अभ्यासू नजरेनं पाहिलं. ‘‘आजी, हे आत अंधारात ठेवलेलं झाड अर्धमेलं झाल्यासारखं दिसतं आहे. याची पानं सुकली आहेत. हिरव्याऐवजी तपकिरी रंगाची झाली आहेत. जे छोटे टोमॅटो होते तेसुद्धा वाळून गेलेत. आकुंचन पावले आहेत. आणि याउलट बाहेर ठेवलेलं झाड मात्र थोडं वाढल्यासारखं वाटतंय. पानं हिरवीगार आहेत. आणि मुख्य म्हणजे याचे टोमॅटो मस्त मोठे, गोलगरगरीत आणि लालसरसुद्धा झालेत बघ!’’
‘‘निरीक्षण अगदी बरोबर केलंस हं तू. आता निष्कर्ष!’’ आजी म्हणाली. मीही खूप उत्सुक झाले. खरं तर झाडांचा आणि मला भेडसावणाऱ्या नकारात्मक विचारांचा काय संबंध असू शकतो, हे मला अजून कळलं नव्हतं. पण माझी आजी अनेक र्वष शिक्षिका असल्यानं ती मला काहीतरी भन्नाट मार्गाने हे शिकवणार यात मला कणमात्र शंका नव्हती. तिनं सुरुवात केली. ‘‘ज्या झाडाला आपण सूर्यप्रकाश, खत, पाणी दिलं, ते झाड वाढलं. त्याचे टोमॅटो मोठे, रसरशीत झाले. कारण झाडाला, टोमॅटोला त्यांचं ‘पोषण’ आपण दिलं. हेच ‘पोषण’ ज्या झाडाला आपण नाकारलं, ते झाड मात्र सुकलं. त्याला लागलेले टोमॅटो वाढले नाहीत. उलट ते सुकून आकुंचन पावले. अर्धमेले झाले. बरोबर?
‘‘आपल्या मनातील विचारांचंही अगदी असंच होतं. ज्या विचारांना आपण ‘पोषण’ देतो, ते विचार मोठे होतात. जसे आपण विचार करतो, तशीच आपण कृती करतो. त्यामुळे अप्रत्यक्षपणे तेच विचार आपल्यासाठी सत्य ठरतात. हे कायम लक्षात ठेव.’’
‘‘म्हणजे आजी, सकारात्मक विचारांना पोषण द्यायचा आपण प्रयत्न करायचा ना?’’
‘‘हो’’
‘‘पण विचारांना पोषण द्यायचं म्हणजे नेमकं काय करायचं? विचारांना तर सूर्यप्रकाश, पाणी, कंपोस्ट खत यांचा काहीच उपयोग नाही.’’
‘‘आता आलीस तू मुख्य मुद्दय़ाकडे! विचारांचं पोषण म्हणजे आपण त्या विचारांकडे दिलेलं लक्ष. आपण त्यांना दिलेली आपली मानसिक ऊर्जा. अनावश्यक नकारात्मक विचार ज्या ज्या वेळी मनात येतील, तेव्हा एक गोष्ट कायम लक्षात ठेव बाळा, की कोणताही विचार जेव्हा पहिल्यांदा आपल्या मनात येतो, तेव्हा तो खूप छोटा, अगदी त्या पहिल्या कोवळ्या टोमॅटोंसारखा असतो. तेव्हा आपण त्या विचाराला सहज हरवू शकतो. मात्र त्याला जर पोषण म्हणजेच लक्ष दिलं, तर तो मोठा होतो. तुला नकारात्मक विचारांनी होणारा त्रास हा आपण त्या विचारांना नकळत दिलेल्या पोषणामुळेच आहे. तुला सकारात्मक विचारांचं पोषण करायचं आहे आणि नकारात्मक विचारांना अक्षरश: उपाशी ठेवायचं आहे हे मनाशी पक्कं कर. जेव्हा हे करणं अवघड जाईल, तेव्हा मनात ती दोन टोमॅटोची झाडं डोळ्यांसमोर आण. हवं तर एखाद्या वहीमध्ये या दोन टोमॅटोंचं चित्र काढ. एक टोमॅटो टवटवीत, लाल, मोठा व त्याच्याच शेजारी सुकलेला, आकुंचन पावलेला छोटा. छोटय़ा सुकलेल्या टोमॅटोपाशी मनात येणारा नकारात्मक विचार सरळ लिहून काढ. या नकारात्मकतेला माझ्या आयुष्यात मला मोठं करायचंय का? सत्यात येऊ द्यायचंय का? का सुकून जाऊ द्यायचं आहे? हा प्रश्न स्वत:ला विचार. एकदा का नकारात्मकतेला तू उपाशी ठेवायचं ठरवलंस, की मग कोणताही एखादा सकारात्मक विचार निवड आणि तो मोठय़ा टोमॅटोपाशी लिही. आणि मुद्दामहून त्याला पोषण द्यायला सुरुवात कर. जितका याचा सराव करशील तितकं हे अजून सोपं होत जाईल.’’
या टोमॅटोच्या झाडांच्या युक्तीचा सराव खरं तर मी आजही करते आहे. छान सवयच झाली आहे ती आता. परवा माझ्या भाचीला खरेदीला घेऊन गेले आणि ही गोष्ट सांगितली. आपण खरेदीला गेल्यावर कसे आपल्याला आवडतील ते, छान दिसतील ते, बसतील ते, परवडतील असे कपडे निवडतो; तशीच सर्व प्रकारच्या विचारांमधून आपल्यासाठी योग्य अशा सकारात्मक विचारांचीसुद्धा ‘निवड’ करण्यातली गंमत तिला सापडली. त्या दोन टोमॅटोंची चित्रं काढून ती टवटवीत टोमॅटोला सकारात्मक व सुकलेल्याला नकारात्मक विचार जोडण्याची युक्ती तर हे काम खूपच सोपं करून गेली. नकारात्मक विचारांना मनातून लांब फेकण्यासाठी तुम्हीही नक्की वापरून पाहा ही युक्ती.