गांधीजी : स्वातंत्र्य मिळत असताना देशाची अशी फाळणी होणं ही आपली इच्छा कधीच नव्हती.
पंडित नेहरू : बापू, पण आता दुसरा मार्गही दिसत नाहीये.
मौलाना आझाद : देशाची फाळणी कदापि नाही होणार, बापू.
गांधीजी : जिन्नाह, पुन्हा एकदा शांतपणे विचार कर. आवेशात आपल्याकडून असं काही घडू नये, ज्याचे परिणाम पुढील अनेक पिढय़ांना भोगावे लागतील.
जिन्नाह : आमचा निर्णय अटळ आहे. आम्हाला स्वतंत्र पाकिस्तान हवा आहे.
लॉर्ड माऊंटबेटन : भारताच्या फाळणीचा निर्णय पक्का झाला आहे. त्यावर लवकरात लवकर अंमल करण्यात येईल.
****
.. नाटकाचा शेवटचा संवाद संपला. स्टेजवर टेबलाभोवती विविध पेहरावात बसलेले सगळे कलाकार खाली मान घालून स्तब्ध उभे राहिले. पडदा पडला. हॉलचे दिवे लागले. काही क्षण शांततेत गेले.आणि मग सगळ्या प्रेक्षक विद्यार्थ्यांनी आपापल्या जागी उभं राहून उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवल्या. १५ ऑगस्ट १९४७ ला जरी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं, तरी त्याचबरोबर सर्वत्र उमटलेले फाळणीचे पडसाद अतिशय भयंकर आणि हृदयद्रावक होते. त्याची फार मोठी किंमत पुढे देशाला मोजावी लागली.
भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शाळेच्या छोटेखानी हॉलमध्ये आठवडाभर अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. यात नववीच्या विद्यार्थ्यांनी ‘देशाची फाळणी’ ही १५ मिनिटांची नाटुकली सादर केली. नाटक संपल्यावर सगळे विद्यार्थी आपापल्या घरी निघाले.
****
‘‘इम्रान, रुक तो! किधर भाग रहा है?’’ शाळेपासून थोडय़ा अंतरावर केशव इम्रानला पाठीमागून आवाज देत म्हणाला. इम्रानने मागे वळून पाहिलं आणि तो थांबला.
‘‘अब्बा ने देख लिया तो शामत आ जायेगी.’’ इम्रान म्हणाला.
‘‘घरीच चालला आहेस नं?’’ केशवने त्याला विचारलं.
‘‘हां!’’- इम्रान
‘‘देवळापर्यंत एकत्र जाऊ. नंतर जाऊ आपापल्या वाटेने.’’ केशवने त्याला गळ घातली.
‘‘भारी धीट आहेस रे तू!’’- इम्रान
‘‘नाटक कैसा लगा, इम्रान?’’
‘‘चांगलं होतं. मला अब्बाने पूर्वी सांगितलं होतं देशाच्या फाळणीबद्दल. अब्बा का कोई दूर का रिश्तेदार रहता था पंजाब में. बटवारा झाल्यावर ते गेले पाकिस्तानात. नंतर कुणी कधीच नाही पाहिलं त्यांना.’’ दोघे काही सेकंद शांत झाले.
‘‘आपल्याकडे तरी कुठे काय वेगळं चाललंय, इम्रान? तुझ्या आणि माझ्या बाबांची इतकी जुनी मैत्री! कुठल्या तरी गैरसमजामुळे आज ते एकमेकांचे शत्रूच बनलेत. त्याचा परिणाम आपल्या मैत्रीवरही होतोय.’’
‘‘नाटकामध्ये गांधीजी म्हणतात त्याप्रमाणे- बडों के फैसले, भुगते हम! अब तो लकीर भी खींच गयी है हमारे खेतों के बीच!’’ इम्रान आणि केशवच्या बाबांची शेतं एकमेकांना लागूनच होती.
‘‘इसका कुछ करना पडेगा, इम्रान!’’
तेवढय़ात देऊळ आलं. दोघे पडलेल्या चेहऱ्याने आपापल्या दिशांना पांगले.
****
‘‘बाबा, आज शाळेमध्ये नाटक होतं, देशाच्या फाळणीबद्दल.’’ रात्री जेवताना केशव सांगत होता.
‘‘अरे वा! नवीन माहिती मिळाली म्हणजे.’’
‘‘फाळणी खूप वाईट होती नं?’’
‘‘देशाचं विभाजन कधीही वाईटच! भारत आणि पाकिस्तान अशी दोन स्वतंत्र राष्ट्रं निर्माण झाल्यानंतर दोन्हीकडच्या लोकांना आपली घरं सोडावी लागली. जे लाहोर, कराची अशा शहरांमध्ये राहत होते, पण ज्यांना भारतात यायचं होतं, त्यांना दुसरा पर्यायच नव्हता. त्याचप्रमाणे इकडून ज्यांना पाकिस्तानात जायचं होतं त्यांनाही त्यांचं इथलं बस्तान हलवून तिथे जावं लागलं. यांत बराच घातपात झाला. लाखोंनी प्राण गेले. स्त्रियांबाबतही खूप वाईट गोष्टी घडल्या. देशाच्या नकाशावर फक्त एक रेष ओढली गेली आणि बनले भारत आणि पाकिस्तान.’’
‘‘आपल्या आणि रहीम चाचाच्या शेतामध्ये कुंपण घालून आपणही तसंच तर केलंय फाळणीसारखं!’’
‘‘त्याचा काय संबंध इथं? त्याचं आणि आपलं शेत आधीपासूनच वेगळं आहे.’’
‘‘पण वर्षभरापूर्वी तिथं कुंपण नव्हतं, बाबा..’’
ॠ ॠ ॠ
‘‘अब्बा, आपकी एक दूर की खाला थी नं, जो पाकिस्तान चली गयी, उनका कुछ आता-पता है आपको?’’ इम्रानच्या घरीही त्या दिवशी तीच चर्चा होती.
‘‘नहीं रे! लेकिन आज अचानक तुझे उनकी याद क्यों आयी?’’
‘‘आज स्कूल में बटवारे पर नाटक देखा. तब याद आया.’’
‘‘बटवारे में न सिर्फ वतन बटे बल्की लोगों के दिलों में जमी कडवाहट भी उभरकर सामने आयी. इसलिये तो इतना खूनखराबा हुआ.’’
‘‘क्या आप और गोविंद काका के बीच कभी सुलह नहीं हो सकती? खेतों के बीच बनी लकीर देखकर तो और भी बुरा लगता है.’’
‘‘वो तो उसनेही खींची है.’’
‘‘पर आपने उन्हें रोका भी तो नहीं, अब्बा..’’
****
दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यासाठी शाळेत जय्यत तयारी सुरू होती. केशव तयारी पाहायला त्याच्या बाबांना मुद्दामच तिथे घेऊन आला. इम्रान आणि त्याचे अब्बा तिथे पताका लावण्यात मश्गूल होते. शाळेचे एक मास्तर सर्वाना सूचना देत होते. रहीम चाचांना तिथे पाहून गोविंद काकांनी ताबडतोब पाठ फिरवली. पण केशव तिथून जायला तयार होईना.
‘‘या वर्षी झेंडूचं पीक झक्कास आलंय, गोविंदराव! यंदाही पाठवणार नं शाळेत फुलं?’’ मास्तर त्यांना थांबवत म्हणाले.
‘‘हे काय विचारणं झालं मास्तर?’’
‘‘आणि गणपतीचं काय?’’
‘‘ती फुलं तर त्या रहीमच्या शेतातून येतात नं?’’ केशवचे बाबा जरा कुत्सितपणे म्हणाले.
‘‘यंदा देवळाचा जीर्णोद्धार पूर्ण झालाय. उत्सवही मोठा आहे. त्यामुळे सजावटीसाठी फुलं जास्त लागतील. म्हणून विचारतोय!’’
‘‘बघू.’’
‘‘गोविंदराव, तुमच्यात आणि रहीममध्ये जे बिनसलं, ते आणखी किती ताणून धराल? एरवी ईद आणि दिवाळीला एकमेकांचे सण उत्साहाने साजरे करणारे तुम्ही! पण धर्माच्या आड कुणी तिसऱ्याने तुमच्यामध्ये गैरसमज निर्माण केला आणि तुमच्यात फूटही पडली? मैत्री इतकी कमकुवत असू नये. शाळेतली पोरंदेखील भांडतात. पण एक-दोन दिवसांत विसरतात सगळं!’’ मास्तरांनी आता रहीम चाचांनाही जवळ बोलावलं. आधी ते यायला तयार होईनात, पण इम्रान ओढतच त्यांना घेऊन आला.
‘‘रहीम, तुमची दोघांची झेंडूच्या फुलांची शेती. झेंडूच्या केशरी पाकळ्या आणि हिरवं देठ हे आपल्या ध्वजातलेही रंग- एकतेचे प्रतीक. गोविंदरावांच्या शेतातील झेंडूच्या फुलांनी तू दरवर्षी शाळेची सजावट करतोस. गोविंदरावही तुझ्या फुलांची गणपतीला आरास बांधतात. या झेंडूच्या फुलाची प्रत्येक पाकळी स्वत: एक फूल असतं. अशा अनेक पाकळ्या जेव्हा एकत्र सांधतात तेव्हाच त्यांचं सुंदर फूल बनतं. विखुरलेल्या पाकळ्यांमध्ये कसलं आलंय सौंदर्य? माणसांची मनं जर या झेंडूप्रमाणे एकत्र आली, तर कुठलंही कुंपण त्यांना विभागू शकणार नाही. आज तुमच्या भांडणाचा परिणाम तुमच्या मुलांच्या मैत्रीवरही होतोय. तुम्हा दोघांना पुन्हा एकत्र आणण्यासाठी यांनीच मला गळ घातली. इतक्या लहान मुलांना हे समजतंय, तुम्हाला का समजू नये? विसरून जा सगळं आणि मनात बांधलेली कुंपणं उखडून टाका.’’
रहीम आणि गोविंदराव काही क्षण एकमेकांकडे नुसतेच पाहत राहिले. झालेली चूक त्यांच्या पुरती लक्षात आली आणि त्यांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. इम्रान आणि केशवचे चेहरे एकदम खुलले. मास्तरांनीही आनंदाने दोघांची पाठ थोपटली. काही दिवसांतच दोन शेतांमधलं कुंपणही नाहीसं झालं होतं.
प्राची मोकाशी mokashiprachi@gmail.com