सोसायटीच्या देवळामध्ये मित्रांबरोबर लपंडाव खेळताना दीपू थोडय़ा अंतरावर असलेल्या झुडपांमागे जाऊन लपला. अचानक त्याला तिथे एक सुरेख इंद्रधनुष्यी रंगाचं पेन दिसलं. ‘काय मस्त पेन आहे!’ तो स्वत:शीच पुटपुटला. तितक्यात कुणाचीतरी चाहूल लागली म्हणून दीपूने पटकन् ते पेन पॅन्टच्या खिशात ठेवलं. मित्रांना काहीतरी कारण सांगून तो तिथून सटकला आणि धावतच घरी आला. घराचं दार उघडून लगबगीने तो त्याच्या स्टडीटेबलजवळच्या खुर्चीवर जाऊन बसला. घरी कुणीच नव्हतं. त्याची धाकटी बहीण आईबरोबर बाजारात गेली होती. बाबाही ऑफिसमधून यायचे होते.
दीपूची पेनाबद्दलची उत्सुकता एव्हाना शिगेला पोहोचली होती. त्याने पेनाचं टोपण उघडलं आणि टेबलावर पडलेल्या रफ कागदावर थोडंसं खरडून पाहिलं.
‘‘हाय! मी रंगा, तुझा पेन फ्रेंड.’’ अचानक पेनातून आवाज आला. दीपूच्या हृदयाचा ठोकाच चुकला. त्याने ते पेन झटकल्यागत टेबलावर फेकलं आणि तो मागे सरकला. तो आता संपूर्णपणे टरकला होता.
‘या पेनामध्ये अलाद्दीनच्या जिन वगरेसारखा तर कुणी नसेल नं?’ दीपूला एकदम वाटून गेलं. अलीकडेच त्याने ‘अलाद्दीन आणि त्याचा जादुई दिवा’ ही कथा ‘अरेबियन नाइट्स’ पुस्तकांत वाचली होती. असं काहीसं खऱ्या आयुष्यात आणि तेसुद्धा आपल्याबरोबर घडू शकतं, यावर त्याचा विश्वासच बसेना. धीर करून त्याने पेनाशी संवाद साधायचं ठरवलं.
‘‘पेन फ्रेंड? म्हणजे?’’ दीपूने पुन्हा ते पेन हातात घेत विचारलं आणि अनवधानाने पेनामागची काळी खिट्टी दाबली. त्याच क्षणी त्या रफ कागदावर इंद्रधनुष्यातल्या सात रंगांसारखे रंग उमटले आणि पेनामधून बोलणारा तो आवाज माणसाच्या रूपात त्या रफ कागदावर अवतरला. तो माणूस अगदीच ठेंगणा होता, जेमतेम हाताच्या अंगठय़ाएवढा. इंद्रधनुष्याच्या रंगांची रंगीत टोपी, तसेच रंगीत बूट, रंगीत झगा असा त्या ठेंगण्या माणसाचा वेश होता.
‘‘मी पेनात राहतो म्हणून पेन फ्रेंड. आजपासून मी तुझा मित्र. मला काहीही विचार. मी त्याचं उत्तर देईन.’’ रंगा त्या रफ कागदावर इकडून तिकडे कोलांटय़ा उडय़ा मारत म्हणाला.
‘‘म्हणजे त्या जादुई दिव्यातल्या जिनसारखंच.’’ दीपू उसळत म्हणाला.
‘‘अगदी तसंच नाही. तुझ्यासाठी मी महाल वगरे नाही बनवू शकणार. हा! पण पुस्तकं, साहित्य, अभ्यास या संबंधित कुठलीही माहिती मी चुटकीसरशी उपलब्ध करून देऊ शकतो. तू फक्त तुझा प्रश्न मनातल्या मनात म्हणायचा. मी आपोआप त्याचं उत्तर तुझ्याचकडून लिहून घेईन.’’ रंगा त्याच्या कमरेवर हात ठेवत निवांतपणे म्हणाला. हे ऐकून दीपूला चेव चढला.
‘‘फास्टर फेणे कोणी लिहिलंय?’’ दीपूने लगेच विचारलं.
‘‘भा. रा. भागवतांनी!’’ रंगाने त्वरित उत्तर दिलं. मग दीपूने रंगाला भूमितीमधलं एक प्रमेय विचारलं. त्याचंही उत्तर रंगाने बरोबर दिलं. दीपू भलताच खूश झाला.
‘‘तू कुणाच्या हाती लागलास तर तू त्याचीही मदत करणार?’’ दीपूला एकाएकी प्रश्न पडला.
‘‘अर्थात!’’
‘‘हे बघ रंगा, आपली मत्री हे आता आपलं दोघांचं ‘सीक्रेट’ आहे. ते कुणालाही कळता कामा नये.’’
‘‘मला प्रत्येक वेळी पेनाच्या बाहेर येण्याची गरज नाही. ती काळी खिट्टी दाबल्यावरच मी बाहेर येतो. एरवी तुला काय हवंय ते तू मला हातात धरून नुसतं मनात विचारलंस तरी मी आपोआप तुझ्याकडून त्याचं उत्तर लिहून घेईन. फक्त हेतू निर्मळ आणि प्रामाणिक पाहिजे. तेवढं लक्षात ठेव.’’ रंगा सावध करत म्हणाला.
‘‘तरी आपण आपल्यामध्ये एखादा पासवर्ड ठेवला तर?’’
‘‘गुड आयडीया. पण काय ठेवायचा?’’
‘‘फ -अ-क -ठ-इ-ड-ह. म्हणजे इंद्रधनुष्य! मी हा पासवर्ड आधी मनात म्हणून मगच तुला प्रश्न विचारेन. त्यानंतरच तू मला उत्तर द्यायचंस.’’ बराच वेळ विचार केल्यानंतर दीपू म्हणाला.
‘‘एकदम डन.’’ रंगाने ‘थम्स-अप’ केलं आणि पुन्हा एक कोलांटी उडी मारून तो पेनामध्ये गायब झाला. तसं त्या रफ कागदावर उमटलेले इंद्रधनुष्याचे रंगही गायब झाले.
दुसऱ्या दिवशी दीपूचा सातवीच्या वार्षिक परीक्षेचा गणिताचा पेपर होता. प्रश्नपत्रिका मिळाल्यावर दीपूने प्रश्नांवरून एक नजर फिरवली. त्यातलं एक गणित त्याला काही जमेल असं वाटेना. आणि त्याच प्रश्नाला नेमके सर्वात जास्त गुण होते. त्याला एक आयडीया सुचली. इतर गणितं सोडवून झाल्यावर त्याने कंपास बॉक्समधून रंगाला बाहेर काढलं. त्याला हातात घेऊन दीपूने काही क्षण डोळे मिटले. दोघांमध्ये ठरलेला पासवर्ड ‘फ -अ-क -ठ-इ-ड-ह’ मनात उच्चारून त्याने रंगाला अडलेलं गणित विचारलं. त्यानंतर अक्षरश: जादू झाल्याप्रमाणे दीपूचे हात उत्तरपत्रिकेवर चालू लागले आणि अगदी पटापट ते गणित त्याने सोडवलं. परीक्षा संपल्यानंतर जेव्हा मित्रांमध्ये पेपरची चर्चा झाली तेव्हा फक्त दीपूला ते गणित सोडवायला जमलं होतं. स्वाभाविकच दीपू स्वत:वर भलताच खूश होऊन घरी निघाला.
घरी आला तेव्हा हॉलमध्ये त्याची बहीण गोष्टीचं पुस्तक वाचत बसली होती.
‘‘दादा, प्रामाणिकपणा म्हणजे काय?’’ दीपूला पाहून तिने अचानक विचारलं आणि त्याच्या मनात एकदम चर्रर झालं. झपझप स्टडीटेबलपाशी जाऊन त्याने एक रफ कागद काढला. पेनामागची काळी खिट्टी दाबून रंगाला त्याने बाहेर बोलावलं. कागदावर इंद्रधनुष्याचे रंग विखुरले आणि रंगा आळस देत पेनाच्या बाहेर आला.
‘‘रंगा, आज मी परीक्षेत ‘चीटिंग’ केलीये. माझं मन आता खातंय रे..’’ दीपू पश्चात्तापाच्या स्वरात म्हणाला.
‘काय बोलतोयस तू?’’ रंगा जांभई देत म्हणाला.
‘‘असं काय करतोस? आज गणिताच्या पेपराच्या वेळी तू मला मदत केलीस त्याबद्दल बोलतोय मी!’’
‘‘मी केव्हाचा गाढ झोपलोय! हे काय, आत्ताच उठतोय!’’ रंगा आश्चर्याने म्हणाला. हे ऐकून दीपूचे डोळे चमकले. म्हणजे ते गणित त्याचं त्यालाच सोडवायला जमलं होतं. रंगाने मदत केलीच नव्हती. दीपूचा जीव भांडय़ात पडला. त्याने एकदम सुटकेचा नि:श्वास टाकला. एव्हाना रंगालाही घडलेल्या प्रकारची कल्पना आली.
‘‘दीपू, एरवी येत नसलेलं ते गणित तू सोडून दिलं असतंस. पण ते माझ्याकडून सोडवून घेऊन तू पकीच्यापकी गुण मिळवण्याच्या मोहात पडलास. बरोबर?’’
‘‘होय!’’
‘‘मी तुला मदत केली असती तर ती ‘कॉपी’ झाली असती. हेतू स्वच्छ नसेल तर मी कधीच प्रतिसाद देत नाही. आणि मित्र तर चुकीची वाट कधीच दाखवत नाहीत.’’ यावर दीपू काहीच बोलला नाही.
‘‘आपल्याला प्रत्येक गोष्ट सहजपणे हवी असते. पराभवाला सामोरं जायची तयारी नसते. पावसाच्या थेंबावर जेव्हा सूर्याची किरणं पडतात तेव्हाच आपल्याला इंद्रधनुष्यातले सात रंग दिसतात. एरवी तो असतो फक्त पांढरा प्रकाश. पण त्यासाठी त्या पावसाच्या थेंबाला सूर्याच्या प्रखर किरणांना सामोरं जावंच लागतं. त्यामुळे आपल्या बळावर, मेहनतीवर मिळतील ते गुण खरे, बाकी सब झूठ! आपण जगाला फसवू शकतो मनाला नाही.’’ रंगा समजावत होता.
‘‘मी पुन्हा अशी चूक कधीच करणार नाही.’’ दीपूचे डोळे पाणावले होते.
‘‘दीपू, आज सुदैवाने तू वाचलास. पण तुझा हेतू निश्चितच चुकीचा होता. त्यामुळे आता मला जावं लागणार मित्रा! मात्र या पेनाच्या रूपात तुझा हा ‘पेन फ्रेंड’ नेहमीच तुझ्याबरोबर राहील,’’ असं म्हणत रंगा कायमचा पेनामध्ये गायब झाला, यावेळी मात्र कागदावरचा इंद्रधनुष्य तसाच ठेवून..
– प्राची मोकाशी
mokashiprachi@gmail.com