गेल्या रविवारीच घडलेली ही गोष्ट.. सूर्य मावळतीला जात होता. चौपाटीवरची वाळू तुडवत लगबगीने जात असताना नवीनला तिथल्या एका बाकावर एक आजोबा मान खाली घालून खूप उदासवाणे बसलेले दिसले. आजोबा अगदीच वयस्कर होते. त्यांची लांब दाढी, भरघोस मिशा, लांब केस सगळेच संपूर्ण पांढरे होते. शेजारीच बाकाला त्यांनी त्यांची काठी टेकवून ठेवली होती. त्यांनी पांढराशुभ्र पायजमा आणि सदरा घातला होता. नवीन थोडा थांबला. त्या आजोबांना काही मदत करण्याच्या उद्देशाने तो पुढे सरसावला.
‘‘आजोबा, काही मदत हवीये का तुम्हाला?’’ नवीन त्यांच्या खांद्यावर हलके हात ठेवत म्हणाला. तशी आजोबांनी मान वर करून बघितलं.
‘‘अरे, तुम्ही?’’ नवीन आश्चर्याने म्हणाला.
‘‘होय! मी सरतं वर्ष. तू नवीन नं?’’
‘‘हो, मी नवीन वर्ष. तुम्ही इथे असे एकटेच का बसलात?’’ आजोबांनी नवीनला बरोबर ओळखलं. नवीनला ते आता न्याहाळत होते. अगदी एका गुटगुटीत बाळासारखा त्याचा चेहरा होता. जीन्स, टी-शर्ट घालून, आपल्या काळ्याभोर केसांचा व्यवस्थित भांग पाडून नवीन अगदी गोजिरवाणा दिसत होता.
‘‘आज ३१ डिसेंबर. माझा शेवटचा दिवस! रात्री बारा वाजता म्हणजे खरं तर काही तासांतच मी इतिहासजमा होणार! म्हणून थोडं उदास वाटतंय, इतकंच. वर्षभर खूप धावपळ झाली म्हणून जरा शांत बसलो होतो हा शेवटचा सूर्यास्त बघत.’’ आजोबा पश्चिमेकडे बोट दाखवत म्हणाले. सूर्य आता जवळजवळ मावळलाच होता. अंधार पडू लागला होता.
‘‘पण सूर्य तर तोच आहे. उद्याही तोच असणार!’’
‘‘हो ना. पण उद्या मी नसणार. आज तू मात्र खूपच घाईत दिसतोयस.’’ आजोबा विषय बदलत म्हणाले.
‘‘हो. पण आहे थोडा वेळ माझ्याजवळ.’’
‘‘मग बैस की! थोडय़ा गप्पा मारूया. आज मी एकदम निवांत आहे.’’ आजोबा नवीनला शेजारी बसण्याची खूण करत म्हणाले. नवीनही मग पाठीवरची ‘सॅक काढून मांडीवर ठेवत आजोबांच्या शेजारी विसावला.
‘‘या सॅकमध्ये एवढं काय भरलंयस?’’
‘‘वर्षभरासाठी लागणारं सगळं सामान. आता सज्ज व्हायला हवं मला! पुढचे ३६५ दिवस माझी डय़ूटी.’’
‘‘मी तसा ‘ट्रॅव्हल-लाइट’ करतो. प्रत्येकाची आवड!’’
‘‘गेल्या वर्षी याच वेळी तुम्ही माझ्या जागी होतात..’’ नवीनने वाक्य अर्धवट सोडलं.
‘‘गेल्या वर्षी मी भविष्य होतो आणि त्यामागील वर्ष इतिहास! आज तू भविष्य आहेस आणि मी इतिहासजमा होणार. मग पुढच्या वर्षी तुझा नंबर! हे चक्र असंच चालणार, बाळा!’’
‘‘म्हणजे ऑलिम्पिक्समधल्या त्या ४ ७ १०० किंवा ४ ७ ४०० च्या रिले रेससारखं! प्रत्येक जण आपली ‘लॅप घेऊन धावतो आणि रेस पूर्ण करण्यासाठी ‘बॅटन पुढच्याला ‘पास’ करतो.’’
‘‘अगदी बरोबर म्हणालास. आपल्यामधल्या या रिले रेसचे आपणच धावपटू. आपली लॅप एका वर्षांची.’’
‘‘पण सूर्य तर रोज उगवतो आणि मावळतो. रात्री बारा वाजून एक सेकंदाने रोजच नवा दिवस येतो. त्याच्या येण्याला आपण इतकं महत्त्व कुठे देतो? मग या ३१ डिसेंबर ते एक जानेवारीच्या संक्रमणाला इतकं महत्त्व का दिलं जातं? तोही एक सर्वसाधारण दिवसच तर आहे! आणि नव्या वर्षांच्या पहिल्या दिवसापासून असं कुठे काय वेगळं घडतं? तरी जगभर आतषबाजी, रोषणाई, पाटर्य़ा.. सगळीकडे नुसता ‘सेलिब्रेशन’चा मूड असतो.’’ यावर आजोबा दिलखुलास हसले.
‘‘दररोज येणारा दिवस जरी आपण साजरा करत नसलो तरी आपल्या वाढदिवसाची आपण वर्षभर आठवण ठेवतो, त्याची आतुरतेने वाट पाहतो आणि तो उत्साहाने साजरा करतो. तो दिवस आपल्यासाठी एकदम ‘स्पेशल’ असतो. नवीन वर्षही एक प्रकारचा वाढदिवसच आहे. म्हणून त्याचं महत्त्व!’’
‘‘पण १ जानेवारीच का?’’
‘‘दिवस, आठवडा, महिना, वर्ष ही सगळी काळ मोजण्याची साधनं आहेत. ज्युलियस सीझरने तयार केलेल्या ज्युलियन कॅलेंडरमध्ये सुधारणा करून पोप ग्रेगरी यांनी १५८२ मध्ये तयार केलेलं ग्रेगोरीयन कॅलेंडर- जे आपण आता वापरतो- ते संपूर्ण जगात रूढावलं साधारण अठराव्या शतकात. तेव्हापासून १ जानेवारी ही तारीख- नवीन वर्षांची सुरुवात- म्हणजेच ‘न्यू इयर्स डे’ म्हणून जगभर साजरी होऊ लागली. त्याआधी काही देश आपापला न्यू इयर वेगवेळ्या दिवशी साजरा करायचे.’’
‘‘नवीन वर्ष म्हणजे पुन्हा मिळालेल्या ३६५ नवीन संधी.’’
‘‘खरंच आहे ते! त्याचबरोबर सरत्या वर्षांतल्या चुकांचा आढावा घेऊन त्या दुरुस्त करण्याची संधी नवीन वर्ष देईल असा एक आशावादही प्रत्येकाला असतो.’’
‘‘आणि नवीन वर्षांचे संकल्प? त्याचा तर नुसता ऊत येतो या दिवसांत! कुणी चांगले मार्क्स मिळवण्यासाठी खूप अभ्यास करण्याचा संकल्प करतं, कुणी नीट वागायचं ठरवतं, तर कुणी व्यायाम करायचं ठरवतं. यादी लांबलचक असते. पण फार क्वचितच कुणाचा संकल्प पूर्ण होतो. पहिल्याच आठवडय़ात.. फार फार तर महिन्याभरात हे संकल्प गळून पडतात. कुणी एकाने तरी त्याचा संकल्प या वर्षभरात पूर्ण केलेला पाहिलात का तुम्ही?’’
‘‘बरेच पाहिले की! तुला तिथे तो लाल स्वेटर घातलेला मुलगा दिसतोय? तो माझ्या आधीच्या वर्षी त्याच्या क्रिकेट टीममधून वगळला गेला होता.’’ चौपाटीवर गप्पा मारत बसलेल्या दहा-बारा जणांच्या एका ग्रुपकडे बोट दाखवत आजोबा म्हणाले.
‘‘का बुवा?’’
‘‘पिझ्झा, बर्गर – थोडक्यात जंक फूडचं ‘व्यसन’. फिटनेस कमी पडला. पण त्याला त्याची चूक वेळेवर समजली. मनाचा हिय्या करत त्याने या वर्षी संकल्प करून त्याचं फिटनेस सुधारलं. झाला की मग सिलेक्ट! आजच सेंच्युरी मारत त्याने त्याच्या टीमला क्रिकेटचा आंतरशालेय करंडक जिंकून दिलाय. मुळात न्यू इयर किंवा नवीन वर्षांचे संकल्प हे आपल्या मनाची एक अवस्था असते. मनाला उभारी देण्याची वेगवेगळी साधनं. भविष्याकडे सकारात्मकपणे बघण्याचं प्रयोजन. मानसशास्त्रज्ञ रिचर्ड वाईजमन म्हणतात नं – ‘नथिंग चेंजेस ऑन न्यू इयर्स डे.’ फरक असतो तो आपल्या दृष्टिकोनातला.’’
‘‘त्या मुलाला तुम्ही मात्र कायमचे लक्षात राहाल.’’
‘‘हो तर! तसंच प्रत्येक वर्षांलाही त्याच्या कालावधीत घडलेले चांगले आणि वाईट अनुभव लक्षात राहतात.’’
‘‘म्हणजे? मी नाही समजलो.’’
‘‘आता हेच पाहा ना.. १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळालं ही चांगली गोष्ट घडली. पण देशाची फाळणीही झाली. चंद्रावर पडलेलं मानवजातीचं पहिलं पाऊल, एडिसनने केलेला बल्बचा आविष्कार- ही इतिहासात अजरामर झालेली वर्षही पाहिली आणि दुसरं महायुद्ध, अमेरिकेवरचा दहशतवादी हल्ला, त्सुनामी – ही इतिहासातली काळी वर्ष.’’
‘‘आणि हे ‘घटनाक्रम’ जेव्हा परीक्षेत विचारतात तेव्हा कसली तारांबळ उडते मुलांची!’’ वातावरण थोडं हलकं करण्यासाठी नवीन म्हणाला. आजोबाही मनसोक्त हसले.
अशा विविध विषयांवर दोघांच्या भरपूर गप्पा रंगल्या. सरत्या आणि नवीन वर्षांची ही ‘ग्रेट भेट’ होत असतानाच आकाशात सुरू झालेल्या आतषबाजीने दोघांचंही लक्ष वेधून घेतलं. रात्रीचे बारा वाजले होते. नवीन वर्षांच्या स्वागताची ती नांदी होती. बराच वेळ आकाशांत चाललेली ती आतषबाजी पाहून झाल्यावर नवीन आजोबांच्या दिशेने वळला. पण शेजारी कोणीच नव्हतं. फक्त बाकाला टेकवलेली काठी तेवढी होती. रिले रेसची बॅटन आता नवीन वर्षांच्या हातात होती.
प्राची मोकाशी
mokashiprachi@gmail.com