आता काय करायचंय माहीत आहे का? आपण कोणतीही वस्तू खरेदी करणार असू; मग ती खाण्याची वस्तू असो किंवा वापरण्याची, अगर अंगावर धारण करण्याची- तिच्या वेष्टनावर, बॉक्सवर, पिशवीवर जे काही लिहिलंय ते बारकाईनं पाहायचं. म्हणजे पहा हं, आइस्क्रीम खायचं असेल तर कप, कोन किंवा कॅण्डी फोडण्याआधी लक्षपूर्वक त्यावरचा मजकूर वाचायचा. कोणते मार्क्‍स दिसतात तेही पाहायचे. असं निरीक्षण केलंत ना की त्याचा फ्लेव्हर समजेल. ते कधी, कुठे, किती वाजता तयार केलंय आणि पॅक केलंय हेही समजेल. ते कशा पद्धतीने साठवावं हेही लक्षात येईल आणि कधीपर्यंत ते खाण्यायोग्य असेल तेही सांगता येईल. एखाद्या औषधाच्या खोक्यावर किंवा गोळ्यांच्या पाकिटावर अशीच किंवा यापेक्षा वेगळी माहिती असेल. कपडय़ांच्या बॉक्सवर आणखीन काही वेगळ्या गोष्टी असतील. पण महत्त्वाचं म्हणजे ते सगळं म्हणजे अगदी सगळं आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असेल आणि एक गंमत तुम्ही पाहू शकता बरं का? खायच्या वस्तूंची वेष्टनं, कपडय़ांचे बॉक्स, इलेक्ट्रिकल अ‍ॅप्लायन्सेसचे खोके आणि शेतीची अवजारं यांच्यावरचे मार्क्‍स किती वेगवेगळे असतात ते!
अरे, अरे, थांबा चाललात कुठे? पसे मागायला चाललात खरेदीसाठी? त्याची काही गरज नाहीए लगेचच. जेव्हा खरेदी केली जाईल त्या वेळी हे करत जा. नाहीतर असं करा, जेव्हा सुट्टीच्या दिवशी आई-बाबांबरोबर मॉलमध्ये जाल की नाही भटकायला, तेव्हा एकेका विभागात जाऊन असं पाहायला काहीच हरकत नाही. आणि औषधांचं म्हणताय तर घरात असतातच की बारीकसारीक औषधांच्या बाटल्या वगरे. त्यांच्यापासून सुरुवात तर करा.  
-मेघना जोशी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा