मंद संगीताने भारलेला परिसर, फुलांचा दरवळणारा सुगंध, माफक पण आकर्षक सजावट यामुळे आनंद सोसायटीचा हॉल जणू नवीन रूपच धारण केल्यासारखा भासत होता. आणि नववर्षांनिमित्त उपस्थित असलेल्या सर्वाचा उत्साह ओसंडून वाहत होता. हजर असलेले सर्वजण आपलं वय विसरून परत एकदा लहान झाले होते आणि अगदी चढाओढीने प्रत्येक गोष्टीत सामील होत होते. तिथे कोण कोण हजर होते, हे ऐकलंत तर तुम्हाला आश्चर्यच वाटेल. तिथे सगळे म्हणजे सोसायटीतले झाडून सारे आजी-आजोबा जमले होते. प्रत्येकजण आपापल्या कामात गढला होता. सावंतआजोबा खुच्र्या मांडत होते,
रेळेआजोबा स्टेज सजवत होते, डिसूझा आंटी फुलांचे गुच्छ बनवण्यात मग्न होत्या, बर्वेआजोबा नाश्त्याची व्यवस्था पाहात होते आणि सगळ्यात गंमत म्हणजे ब्याण्णव वर्षांच्या खानचाची या प्रत्येकावर बारीक लक्ष ठेवून होत्या. काही ना काही सूचना करत होत्या, पण कोणीही रागावत नव्हतं की भांडत नव्हतं. अगदी एवढय़ातेवढय़ा गोष्टींवरून सोसायटीतील प्रत्येकाशी भांडणासाठी प्रसिद्ध असणारे देशमुख ग्रँडपाही! (ते स्वत:ला आजोबा म्हणवून घेत नसत, ग्रँडपा म्हणवत); नव्हत्या फक्त ढापरेआजी, कारण गेले चार दिवस त्या हॉस्पिटलमध्येच होत्या. पण विचारेआजींना वारंवार फोन करून त्या कार्यक्रमाच्या तयारी बाबत विचारत होत्या. ही सगळी कमाल होती पार्थची! गेल्या नववर्षदिनाच्या आधी आठ दिवस पार्थने सोसायटीतील सगळ्या मुलांची फेसबुकवर एक कम्युनिटी बनवली होती आणि नववर्षांसाठी संकल्प करण्याचा प्रस्ताव मांडला होता. काय संकल्प करायचा, कसा पार पाडायचा वगरे मुद्दय़ांवर जोरजोरात चर्चा घडल्या होत्या अर्थात फेसबुकवरूनच. त्यामुळे कोणालाच पत्ता नव्हता, अगदी कशाचाच. आणि १ जानेवारी २०१२ पासून सगळी वानरसेना कामालाच लागली. काम तसं म्हटलं तर सोपं, म्हटलं तर जबाबदारीचं! ज्या आजी-आजोबांची मुलं परदेशात राहत असत किंवा नोकरीनिमित्त बाहेरगावी राहत असत. किंवा जे आजी अगर आजोबा एकटेच राहत अशा सर्वाना त्यांना हवी असणारी मदत करायची. सोसायटीतल्या पाचवीतल्या आशीषपासून बारावीतल्या राजदादापर्यंत सगळी मुलं यात सामील झाली होती. जेव्हा एक जानेवारीला राजदादा आणि स्नेहाताईने प्रत्येक आजी-आजोबांना जाऊन हे सांगितलं होतं, तेव्हा सगळ्यांनाच हा पोरखेळ वाटला होता. काहीजणांनी हे तेरडय़ाचे रंग तीन दिवस टिकतील असं भाकीतही केलं होतं. पण पार्थने फेसबुकचा अप्रतिम वापर करून वर्षभर उत्तम व्यवस्थापन करून हा उपक्रम अत्यंत सुंदर रीतीने चालवला होता.
वर्षभरात किती छोटय़ामोठय़ा गोष्टी केल्या होत्या त्यांनी. वारके आजी अ‍ॅक्सिडंटनंतर जेव्हा वॉकर घेऊन फेऱ्या मारत तेव्हा सायली कायम त्यांना सोबत करत असे. नेनेआजोबांबरोबर रिक्षातून बँकेत, पोस्टात जाण्यासाठी कोणी ना कोणी सतत हजर असे. सतत चिडचिड करणाऱ्या देशमुख ग्रँडपांना जेव्हा अ‍ॅडमिट करावं लागलं होतं तेव्हाही राज, स्नेहा, वरदा, रमा अशा ताईदादांनी देशमुख आजींना कित्ती मदत केली होती. वीणाआजीची मुलगी गावातच पण थोडी दूर राहायची.  वीणाआजी एकटी राहते, तिच्या सोबतीला कोणी नाही म्हणून तिला काळजी वाटायची, पण या संकल्पामुळे काळजीचं कारणच नव्हतं. कारण वीणाआजीचा फोन आला की जो कोणी रिकामा असे तो तिच्या मदतीला जायचाच. स्नेहा आणि ईषाने त्या वेळात आजीकडून भरतकामही शिकून घेतलं होतं. साखरेआजोबांकडे मेल वाचून दाखवायला जाता जाता हर्षनेही त्यांच्याकडून बुद्धिबळाचे धडे घेऊन स्पध्रेत नंबरही मिळवला होता. दत्ताआजोबांचा नातू न्यूझीलंडला होता. तिथल्या घडय़ाळानुसार त्याला फोन करण्याची योग्य वेळ
दत्ताआजोबांना सांगण्याचं कामसुद्धा ही कंपनी करी. कोणाला औषधं आणून दे, कोणाला औषध घ्यायच्या वेळेची आठवण कर, कोणाला दूध, भाजी किंवा किराणा आणून दे, कोणाला रिपोर्ट आणून दे, कधी लायब्ररीचं पुस्तक आणून दे तर कुणाशी फक्त गप्पा मार; कित्ती वेगवेगळी कामं होती, पण सगळे आनंदाने करायचे. पण हे मात्र खरं की त्याबदल्यात कधीही पसे किंवा गिफ्ट घ्यायचं नाही, हा नियम मात्र प्रत्येकाने पाळला होता. आणि बघता बघता या उपक्रमाला वर्ष पूर्ण झालं होतं. पहिल्यांदा या उपक्रमावर विश्वास न ठेवणारे आजी-आजोबा आता अगदी मुलांवर फिदा होते. म्हणूनच आज त्यांनी मुलांच्या उपक्रमातील सातत्याचं कौतुक करण्यासाठी हा छोटासा कार्यक्रम आयोजित केला होता. आणि सगळे दादा-दादी, नाना-नानी या सोहळ्यासाठी आवर्जून जमले होते आणि आपल्या लाडक्या साथीदारांची वाट बघत होते. इतक्यात फेसबुक कम्युनिटीतील सर्व बच्चे कंपनी गावातल्या सुखदाम वृद्धाश्रमातील आजीआजोबांना घेऊन आली. या नवीन वर्षांपासून तेही यात सहभागी होणार होते. हा नवा संकल्प ऐकून सोसायटीतले आजी-आजोबा प्रचंड खूश झाले. अनेकांचे डोळे पाणावले. आणि या पाणावलेल्या डोळ्यांनीच सावंत आजोबा लिहीत होते- ‘अरे, नेटकऱ्यांनो असेच विस्तारत राहा!’

Story img Loader