श्रावण सुरू झाल्यामुळे पावसाचा जोर जरा कमी झाला आणि मेघचे आजी-आजोबा सातारहून मुंबईला आले. मेघच्या बाबाची बदली झाल्यामुळे मेघ आई-बाबांबरोबर मुंबईत राहत होता आणि आजी-आजोबा सातारला. आई-बाबांनी त्यांनाही सोबत राहण्याचा खूप आग्रह केला होता, पण मुंबईतली धावपळ आणि मुख्यत: धो-धो कोसळणारा पाऊस यांच्याशी आजी-आजोबांचं गणित जमणं कठीण होतं. त्यामुळे ते अधूनमधून मुंबईला येत असत. आजी-आजोबा आल्यामुळे मेघ एकदम खुशीत होता. यावेळी स्वातंत्र्यदिनाला आजीने आणलेले कंदी पेढे असणार म्हणून तर तो जास्तच खुशीत होता. मेघचे कुटुंबीय आपला स्वातंत्र्यदिन ‘राष्ट्रीय सण’ म्हणूनच साजरा करतात. त्या दिवशी एखादं छोटंसं का होईना, पण देशोपयोगी काम ते करतात. यावर्षी त्यांचा स्वातंत्र्यदिन पहिल्यांदाच मुंबईत साजरा होणार होता. पावसामुळे शेवाळं साठून निसरडे झालेले जवळपासचे रस्ते स्वच्छ करायचे आणि झेंडावंदनाच्या कार्यक्रमात बाजूच्या वस्तीतल्या मुलांनासुद्धा सहभागी करून घ्यायचं, त्यांना खाऊ द्यायचा असं त्यांच्या सोसायटीनेच ठरवलं होतं. मेघचं कुटुंबही या कार्यक्रमात सहभागी होणार होतं.
दुपारी जेवणं झाल्यावर आई-बाबा कार्यक्रमाच्या तयारीसाठी सोसायटीच्या ऑफिसमध्ये गेले. मेघला आजी-आजोबांना त्याच्या नव्या शाळेतल्या गमतीजमती सांगायच्या होत्या. त्याची वह्य-पुस्तकं, नवीन दप्तर, सुट्टीतल्या वर्कशॉपमध्ये तयार केलेल्या वस्तू असं बरंच काय काय दाखवायचंही होतं. मेघने दाखवलेला वर्कशॉपमध्ये तयार केलेला कॅलिडोस्कोप आजी हातात घेऊन बघत होती तेवढय़ात ‘आपण काहीतरी खेळूया ना,’ असं मेघ म्हणायला लागला. आता याच्याशी काय खेळावं असा विचार करत आजी पुन्हा एकदा कॅलिडोस्कोपला डोळा लावून बघायला लागली. ते आकार बदलणारे काचांचे तुकडे बघून तिला एकदम काहीतरी सुचलं. ती म्हणाली, ‘‘मेघ, आज मी तुला एक अगदी आपल्या देशातला आपल्या मातीतला खेळ शिकवते. हा खेळ कुणी शोधला, कधी शोधला, इतकंच काय पण याचं नेमकं नाव काय, हे काही मला माहीत नाही. पण आम्ही लहानपणी हा खेळ ‘काचा खेळूया’ असं म्हणत खेळायचो.’’ आजी कुठल्या खेळाबद्दल बोलतेय ते समजल्यावर आजोबा खुशीत हसले. पण लगेच गंभीर होत म्हणाले, ‘‘अगं, पण काचा खेळायला आता बांगडीच्या काचा कुठून आणायच्या?’’ मेघ म्हणाला, ‘‘माझ्याकडे आहेत छान रंगीत काचांचे तुकडे.
कॅलिडोस्कोपसाठी जमवलेल्या सगळ्या काचा काही वापरल्या नव्हत्या. तेव्हाच्या उरलेल्या काचा मी जपून ठेवल्यात.’’ आजीने कौतुकाने मेघकडे बघितलं.
मेघने त्याच्या खणातून एका छान बॉक्समध्ये ठेवलेल्या काचा काढून आजीकडे दिल्या. आजोबांनी तोपर्यंत एक पाठकोरा कागद घेऊन त्याच्यावर मोठं वर्तुळ काढलं. आजीने काचा ओंजळीत धरून हलक्या हाताने हलवल्या आणि वर्तुळाच्या बाहेर येऊ न देता हळूच त्या कागदावर टाकल्या. ‘‘आता एकेक काच अलगद सरकवून किंवा उचलून बाहेर काढायची. दुसऱ्या काचेला अजिबात धक्का लागता कामा नये. दुसऱ्या काचेला धक्का लागला की डाव गेला. मग पुढच्या भिडूने खेळायचं. असं खेळत ज्याला जास्त काचा बाजूला काढता येतील, तो जिंकला!’’ आजीने सांगितलं. तेवढय़ात कार्यक्रमाच्या तयारीची कामं संपवून आई-बाबा आले. उत्सुकतेने तेही हा खेळ बघत बसले. वयोमानानुसार आता आजी-आजोबांचे हात तेवढे स्थिर राहत नव्हते, नजर पूर्वीसारखी स्पष्ट राहिली नव्हती. त्यामुळे मेघलाच त्यांच्यापेक्षा जास्त काचा काढता आल्या.
हात आणि डोळ्यांचा समन्वय साधणारा हा खेळ आई-बाबांना फारच आवडला. मुलांची एकाग्रता वाढवण्यासाठी हा खेळ खूप उपयुक्त ठरेल असं त्यांना वाटलं. ‘‘काचा अलगद काढायच्या असल्यामुळे हाताला लागणार नाहीत, तरीही आई-बाबा किंवा मोठं कुणीतरी बरोबर असतानाच हा खेळ खेळायचा,’’ असं आजीने मेघला बजावून सांगितलं. आजीचं बोलणं संपता संपता आईने दुधाचा कप त्याला आणून दिला. या नव्या खेळाबद्दल कधी एकदा मित्रांना सांगतोय असं मेघला झालं होतं. तेवढय़ात खालून त्याला मित्रांच्या हाका ऐकू आल्या. एरवी दूध पिताना टंगळमंगळ करणारा मेघ आज मात्र दोन मिनिटांत रिकामा कप स्वयंपाकघरात ठेवून खाली पळाला!
अंजली कुलकर्णी-शेवडे – anjalicoolkarni@gmail.com