बाहेर खेळणाऱ्या मुलांचा आवाज वाढला म्हणून मावशी बाहेर आली. तेव्हा ‘‘मावशी, बघ ना या दोघी आमच्याशी कशा भांडतायत. वरून तुम्हाला रक्षाबंधनाला राखी बांधणार नाही म्हणतात,’’ जयने तक्रार केली.
त्यावर ‘‘शहाण्या, तुम्हीच आम्हाला मगापासून भित्री भागूबाई म्हणताय आणि आम्ही भाऊ म्हणून तुमचे रक्षण करणार नाही. असं चिडवता की नाही?’’ मधुराने उसळून विचारले. त्यांचे पोरकट भांडण ऐकून मावशीला हसू फुटले. त्यांना शांत करत मावशी म्हणाली, ‘‘अरे, दोन दिवस मामाकडे मजा करायला जमलात ना? मग भांडताय काय? आणि लगेच राखी न बांधण्याच्या आणि रक्षणाच्या वगैरे गोष्टी काय करताय?’’
‘‘मला सांगा, इतिहासातील रक्षाबंधनाची गोष्ट कुणाला माहितेय?’’ – मावशी.
‘‘मी सांगतो.’’ मल्हारने हात उंचावत सांगायला सुरुवात केली.
‘‘एकदा गुजरातच्या सुलतानाबरोबर राजपुतांची लढाई चालू होती. राजपूत हरायला लागले तेव्हा राणी कर्णावतीने हुमायूनला-म्हणजे दिल्लीच्या बादशहाला भाऊ मानून राखी पाठवली. त्यानेही तिला बहीण मानले आणि लढाईत म्हणजे संकटात मदत केली. बरोबर ना?’’
‘‘शाब्बास! आपल्याकडे फार पूर्वीपासून रक्षाबंधन हा खास बहीण-भावांचा सण मानला जातो. त्या दिवशी बहीण प्रेमाने आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि भाऊ तिला संकटात मदत करण्याचं आश्वासन देतो. परंतु आता आपण या सणाचा अर्थ इतक्या मर्यादित स्वरूपात घ्यायचा नाही. तुम्हाला एक गोष्ट सांगू का, म्हणजे तुम्हाला माझे म्हणणे नीट समजेल.’’
‘‘मावशी, हो चालेल चालेल!’ मुलांचा गलका.
‘‘गेल्या वर्षी उत्तराखंडला मोठा प्रलय झाला, माहितेय ना? तुम्ही ते सर्व टी.व्ही.वर पाहिलंय ना? त्यावेळचीच गोष्ट आहे ही. महिका गुप्ता नावाची ८-९ वर्षांची छोटी मुलगी आपल्या कुटुंबीयांबरोबर केदारनाथला गेली होती. १६ जून २०१३ ला तिथल्या हॉटेलच्या खोलीत ती छोटय़ा भावाबरोबर असताना अचानक पाण्याचा भलामोठा लोंढा आला. त्यात तिचा भाऊ वाहून जाऊ लागला. पण महिकानं मोठय़ा चपळाईनं आणि ताकदीनं त्याला पाण्याच्या लोंढय़ातून खेचून घेतले. आजूबाजूला भयानक वेगाने जाणारे पाण्याचे लोट बरोबर बरेच काही वाहून नेत होते. अशा परिस्थितीत तिनं मदत येईपर्यंत एकीकडे भावाला पकडून खोलीच्या खिडकीला घट्ट धरून ठेवलं. आणि इतक्या भयंकर प्रसंगात स्वत:बरोबर छोटय़ा भावाचाही जीव वाचवला. तिनं दाखवलेल्या धाडसाचं, समयसूचकतेचं कौतुक म्हणून तिला २५ जानेवारी २०१४ ला तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या हस्ते राष्ट्रीय वीरता पुरस्कार मिळाला. ’’
‘‘काय डेअरिंगबाज आहे ना ती महिका?’’ मल्हार पुटपुटला.
‘‘हो.. मगाशी तुम्ही मुलींना भित्र्या म्हणून चिडवत होतात. पण त्या संकटात न घाबरता धाडस कुणी दाखवलं? एका मुलीनं! आणि मला सांगा कुणी कुणाचं रक्षण केलं?’’
‘‘बहिणीनं तिच्या भावाचं.’’ जय उत्तरला.
‘‘मग आता समजतंय का मला काय म्हणायचंय ते? रक्षाबंधनाचा सण साजरा करताना बहिणीला दुर्बल समजून भावानेच फक्त बहिणीच्या रक्षणासाठी धावणं असं न समजता सर्वानीच म्हणजे बहीण-भावांनी एकमेकांच्या, फार कशाला प्रत्येक सुजाण माणसानं संकटात सापडलेल्या कुणाच्याही मदतीसाठी धावणं असा घ्यायला हवा. पटतंय का काही? तर या वर्षी तुम्ही सर्वानीच एकमेकांना राख्या बांधा पाहू. आणि हो, महत्त्वाचं म्हणजे नुसत्याच बांधून मिरवायच्या नाहीत तर आपसात न भांडता एकमेकांना गरज पडेल तेव्हा मदतही करायची बरं का! चला तर मग कोण येतंय बाजारात आपल्या पसंतीची राखी घ्यायला?’ मावशीच्या या प्रश्नावर सगळी बच्चेकंपनी तयारीला लागली.
रक्षाबंधन
बाहेर खेळणाऱ्या मुलांचा आवाज वाढला म्हणून मावशी बाहेर आली. तेव्हा ‘‘मावशी, बघ ना या दोघी आमच्याशी कशा भांडतायत.
First published on: 10-08-2014 at 01:03 IST
मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raksha bandhan