‘वाचू आनंदे’ या स्तंभाच्या या अखेरच्या भागात मी विशिष्ट पुस्तकं सुचविण्यापेक्षा एका विशिष्ट प्रकारची पुस्तके सुचवीत आहे. या प्रकारात सामाजिक जाणिवा विकसित करणारी पुस्तके मुलांनी वाचली पाहिजेत. आपल्या देशात टोकाची विषमता आहे. दारिद्रय़ आहे. काही माणसांच्या वाटय़ाला अमानुष जगणे येते आहे. परंतु मध्यमवर्गीय जगण्यात आपल्या मुलांना याची जाणीव होत नाही. पाठय़पुस्तके, प्रसार माध्यमे यांत शोषितांचे जग फारसे प्रतिबिंबित होत नाही. यातून मुलांचे भावविश्व एकांगी विकसित होते आहे. आत्मकेंद्रितता वाढते आहे व सामाजिक जाणिवा विकसित होत नाहीत. तेव्हा आपली मुले टोकाची आत्मकेंद्रित होऊ नयेत,ती संवेदनशील, सामाजिक भान असणारी अशी विकसित होण्यासाठी आपण त्यांना वंचितांचे जग मुलांना माहीत होईल आणि त्यांचे भावविश्व विस्तारित होईल अशी पुस्तके वाचायला द्यायला हवीत.
सुदैवाने वैचारिक नव्हे, पण ललित शैलीत लिहिलेली अशी सामाजिक जाणिवा विकसित करणारी अनेक पुस्तके मराठीत आहेत. सामाजिक कविता आहेत. त्या त्यांना आपण जाणीवपूर्वक वाचायला द्याव्यात.
अनिल अवचट यांची सर्वच पुस्तके या प्रकारची आहेत. ते परिघाबाहेरचे जग आपल्यासमोर ठेवतात. त्यांची शैली विलक्षण चित्रमय असल्याने मुलेसुद्धा वाचू शकतात. तेव्हा अवचटांची पुस्तके मुलांना सुरुवातीला द्यायला हवीत. गोदावरी परुळेकर यांचे ‘जेव्हा माणूस जागा होतो’ हे ठाणे जिल्ह्य़ात आदिवासींमधील कामाचे वर्णन करणारे; तसेच गिरीश प्रभुणे यांचे ‘पारधी’ हे पुस्तक विलक्षण हादरवून टाकते.
मराठीत दलित आत्मकथनांनंतर जी दलित, भटके, विमुक्तांची आत्मकथनं प्रसिद्ध झाली त्या पुस्तकांमधील निवडक भाग वाचून दाखवावा किंवा ती वाचायला उपलब्ध करून द्यायला हवीत. मुलांना अगोदर त्या जमातीविषयी परिचय करून द्यावा. लक्ष्मण माने, लक्ष्मण गायकवाड, अशोक पवार असे कितीतरी लेखक हे जग उलगडून दाखवतात. महाश्वेतादेवी यांची अनुवादित पुस्तके या जगाची कलात्मक रीतीने ओळख करून देतात. मराठीत अशा वंचित जगाचा परिचय करून देणारी पुस्तके जवळपास सर्वच प्रमुख प्रकाशकांनी आणली आहेत.
कथासंग्रहात मुलांना संवेदनशील बनविणाऱ्या कथा अनेक आहेत. द. ता. भोसले यांची ‘बैलपोळ्या’ची कथा, भास्कर चंदनशीव यांची ‘लाल चिखल’ अशा कथांनी डोळे पाणावतात. अशा कितीतरी कथा हलवून टाकतात.
मराठी कवींच्या कविता अतिशय भावस्पर्शी आहेत. त्या मुलांना वाचून दाखविणे/ वाचायला लावणे हेही करायला हवे. दया पवार, नारायण सुर्वे, बाबुराव बागूल यांच्यापासून आजच्या अनेक कवींच्या दलित, ग्रामीण कविता वाचून दाखवाव्यात.
वंचित-शोषित मुले कशी जगतात, याविषयीची काही पुस्तके मराठीत आहेत. आपल्याच वयाची ही मुले कशी जगतात, हे मुलांनी वाचायला हवे. रेणू गावस्करांचे ‘आमचा काय गुन्हा?’ हे रिमांड होमवरील पुस्तक, रेल्वे स्टेशनवरील मुलांवरील अमिता नायडू यांचे ‘प्लॅटफॉर्म नं झीरो’, शालाबाह्य़ मुलांवरील राजा शिरगुप्पे यांचे ‘न पेटलेले दिवे’ व भाऊ गावंडे यांचे ‘प्रकाशाच्या उंबरठय़ावर’ ही पुस्तके मुलांनी वाचायला हवीत.
आपल्या मुलांमध्ये आर्थिक तसेच संवेदनशील भावविश्वाची समृद्धी एकाच वेळी यायला हवी असेल तर अशा वाचनातूनच आपला मुलगा/ मुलगी एक सुजाण, बांधीलकी असणारी नागरिक म्हणून घडेल.
सामाजिक संवेदनांचं भान देणारी पुस्तकं
‘वाचू आनंदे’ या स्तंभाच्या या अखेरच्या भागात मी विशिष्ट पुस्तकं सुचविण्यापेक्षा एका विशिष्ट प्रकारची पुस्तके सुचवीत आहे.
आणखी वाचा
First published on: 14-12-2014 at 03:52 IST
मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Read perfect