‘वाचू आनंदे’ या स्तंभाच्या या अखेरच्या भागात मी विशिष्ट पुस्तकं सुचविण्यापेक्षा एका विशिष्ट प्रकारची पुस्तके सुचवीत आहे. या प्रकारात सामाजिक जाणिवा विकसित करणारी पुस्तके मुलांनी वाचली पाहिजेत. आपल्या देशात टोकाची विषमता आहे. दारिद्रय़ आहे. काही माणसांच्या वाटय़ाला अमानुष जगणे येते आहे.
सुदैवाने वैचारिक नव्हे, पण ललित शैलीत लिहिलेली अशी सामाजिक जाणिवा विकसित करणारी अनेक पुस्तके मराठीत आहेत. सामाजिक कविता आहेत. त्या त्यांना आपण जाणीवपूर्वक वाचायला द्याव्यात.
अनिल अवचट यांची सर्वच पुस्तके या प्रकारची आहेत. ते परिघाबाहेरचे जग आपल्यासमोर ठेवतात. त्यांची शैली विलक्षण चित्रमय असल्याने मुलेसुद्धा वाचू शकतात. तेव्हा अवचटांची पुस्तके मुलांना सुरुवातीला
मराठीत दलित आत्मकथनांनंतर जी दलित, भटके, विमुक्तांची आत्मकथनं प्रसिद्ध झाली त्या पुस्तकांमधील निवडक भाग वाचून दाखवावा किंवा ती वाचायला उपलब्ध करून द्यायला हवीत. मुलांना अगोदर त्या जमातीविषयी परिचय करून द्यावा. लक्ष्मण माने, लक्ष्मण गायकवाड, अशोक पवार असे कितीतरी लेखक हे जग उलगडून दाखवतात. महाश्वेतादेवी यांची अनुवादित पुस्तके या जगाची कलात्मक रीतीने ओळख करून देतात. मराठीत अशा वंचित जगाचा परिचय करून देणारी पुस्तके जवळपास सर्वच प्रमुख प्रकाशकांनी आणली आहेत.
कथासंग्रहात मुलांना संवेदनशील बनविणाऱ्या कथा अनेक आहेत. द. ता. भोसले यांची ‘बैलपोळ्या’ची कथा, भास्कर चंदनशीव यांची ‘लाल चिखल’ अशा कथांनी डोळे पाणावतात. अशा कितीतरी कथा हलवून टाकतात.
वंचित-शोषित मुले कशी जगतात, याविषयीची काही पुस्तके मराठीत आहेत. आपल्याच वयाची ही मुले कशी जगतात, हे मुलांनी वाचायला हवे. रेणू गावस्करांचे ‘आमचा काय गुन्हा?’ हे रिमांड होमवरील पुस्तक, रेल्वे स्टेशनवरील मुलांवरील अमिता नायडू यांचे ‘प्लॅटफॉर्म नं झीरो’, शालाबाह्य़ मुलांवरील राजा शिरगुप्पे यांचे ‘न पेटलेले दिवे’ व भाऊ गावंडे यांचे ‘प्रकाशाच्या उंबरठय़ावर’ ही पुस्तके मुलांनी वाचायला हवीत.
आपल्या मुलांमध्ये आर्थिक तसेच संवेदनशील भावविश्वाची समृद्धी एकाच वेळी यायला हवी असेल तर अशा वाचनातूनच आपला मुलगा/ मुलगी एक सुजाण, बांधीलकी असणारी नागरिक म्हणून घडेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा