श्रीपाद

‘लवकरच आपल्याकडे कोण येणार आहे माहीत आहे का?’ असं आपल्याला कुणीही विचारलं की साहजिकच आपल्या डोक्यात आपल्या आवडीच्या सगळ्या मित्रमत्रिणींची, दूर-जवळच्या सगळ्या नातेवाईकांची नावं तरळून जातात. सोबतच आपल्याला आठवतो तो आपला आवडता गणपती बाप्पा! खरं ना? हा लेख वाचून होईतोवर गणपती बाप्पा येण्याची तयारी सुरूदेखील झाली असेल तुमच्या घरी. त्याच्या स्वागताला तुम्ही सज्ज असावं, आपल्या आवडत्या बाप्पाकरता तुम्हाला काही करता यावं याकरता आजची खास पाककृती- भातुकली मोदक.

साहित्य : एक मोठी वाटीभर होईल एवढे पिस्ते, काजू, बदाम आणि खारे शेंगदाणे. अर्धी वाटी होईल इतपत बेदाणे आणि बी काढलेला खजूर. पाच-सहा चमचे किंवा गरजेनुसार साजूक तूप. सजावटीकरता बिटर चॉकलेट बार.

उपकरणं : मोदक बनवण्याचा साचा. मिक्सर-ग्राइंडर किंवा खलबत्ता. रेफ्रिजरेटर. चॉकलेटच्या सजावटीकरता सुरी, एकात एक बसणारी दोन भांडी आणि आचेकरता शेगडी. मायक्रोवेव्ह आणि त्याकरता वापरणारं भांडं-देखील चालेल. मोदक ठेवण्याकरता जाळीचा स्टॅण्ड किंवा ताट.

सर्वप्रथम मी मोदकाची सोप्पी पाककृती सांगतो. सजावटीची नंतर सांगतो. मोदकाची पाककृती इतकी सोप्पी आहे की ती घरातल्या अगदी लहानात लहानुकल्या बाळांनाही मोठय़ांच्या मदतीने अगदी सहज करता येईल. सर्वप्रथम बेदाणे निवडून घ्या; काही बेदाण्यांना देठ असतात, ते वेगळे करा. सुक्यामेव्यापकीच्या दाण्यांमध्ये काही कुजके दाणे नाहीत ना, ते पाहून ते वगळा. बी असलेला खजूर घेतला असाल तर त्यामधल्या बिया वेगळ्या करून गर बेदाण्यांसोबत ठेवा. खलबत्ता किंवा मिक्सर-ग्राइंडर वापरताना घरातल्या मोठय़ांच्या देखरेखीखालीच काम करा, म्हणजे अपघात होणार नाही.

सगळं साहित्य म्हणजे पिस्ते, काजू, बदाम आणि खारे शेंगदाणे, बेदाणे आणि खजूर एकत्र करून खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सर-ग्राइंडरमध्ये कुटून घ्या. आपल्याला या साहित्याची बारीक पूड करायची नाहीए, तर त्यांचा फक्त चुरा करून त्यांना एकजीव करायचं आहे. साधारण मुगाच्या डाळीपेक्षा थोडा बारीक कुट्टा झाला पाहिजे. कुटताना आधी दाणे किंचितसे कुटा किंवा मिक्सरमध्ये एक-दोनदा फिरवून त्यांचे मोठे तुकडे करून घ्या, त्यानंतर त्यामध्ये बेदाणे आणि खजूर घाला. आता या मिश्रणामध्ये गरजेनुसार साजूक तूप घाला, जेणेकरून या मिश्रणाचे लाडू वळले जातील.

लहान, खव्याचे मोदक असतात त्या आकाराच्या मोदकांच्या साच्याला हातानेच साजूक तूप लावून साचा बंद करा. एका हाताने बंद साचा घट्ट धरून दुसऱ्या हाताच्या बोटांनी मोदकाचं कुटलेलं मिश्रण साच्यामध्ये दाबून दाबून घट्ट भरा. साचा भरला आणि साच्यामध्ये सगळे मोदक बनवून झाले की हलक्या हाताने साचा उघडून त्यातले मोदक एका ताटलीमध्ये किंवा ताटामध्ये ठेवत जा. सगळे मोदक तयार झाले म्हणजे रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. गणपतीच्या स्वागताला तुमचे खास मोदक तय्यार!

हे मोदक अधिक चवदार आणि सुबक करायचे असतील तर त्यावर आपण चॉकलेटचा थर देऊ शकतो. एका भांडय़ामध्ये तळाशी पाणी आणि त्या पाण्यामध्ये बुडून नरम होईल अशा आकाराच्या छोटय़ा भांडय़ामध्ये चॉकलेटचे तुकडे घ्या. आपल्या मोदकांकरता वाटीभर चॉकलेटचे तुकडे लागतील. आता शेगडीवर मोठय़ा भांडय़ातलं पाणी गरम करा. आचेवरून हे भांडं उतरवा. त्यामध्ये चॉकलेटचे तुकडे असलेलं भांडं पाण्याच्या आचेवर गरम करा. चॉकलेट चमच्याने हलवत वितळवा. त्यामध्ये एक चमचाभर तूप घालून एकत्र करा. फ्रीजमध्ये थंड झालेले मोदक एकेक करून या कोमट चॉकलेटमध्ये बुडवून ताटामध्ये मांडून ठेवा. दुसरा पर्याय म्हणजे, जाळीच्या स्टॅण्डवर सगळे थंडगार मोदक ठेवून त्यावर वितळलेलं चॉकलेट ओता. जाळीखाली मोठं ताट ठेवायला विसरू नका, जेणेकरून मोदकांवरून निथळणारं चॉकलेट ताटामध्ये एकत्र होऊन वाया जाणार नाही. चॉकलेटचा थर असलेले मोदक थंड झाले म्हणजे पुन्हा गोळा करून फ्रीजमध्ये ठेवा आणि गणपतीला नवेद्य दाखवण्याच्यावेळी बाहेर काढा.

या मोदकांची खरी गंमत खाताना कळेल. करायला अगदीच सोप्पे असले तरी हे मोदक चवीला छान लागतात. खाऱ्या शेंगदाण्यांमुळे गोड चवीमध्ये हळूच खारट, चटपटीत चव लागेल. या मोदकातला गोडवा बेदाणे-खजुरापासून येत असल्याने हे गोडगुट्ट होत नाहीत. साखर खाऊन दात किडण्याची भीती नाही. साखर खाऊ शकत नाही, म्हणून प्रसाद नाकारणाऱ्या मोठय़ा माणसांनाही हे मोदक अगदीच सहज खाता येतील. दाणे, सुका मेवा असलेले हे मोदक तुमच्याकरता खचितच पौष्टिक असतील, मात्र तुम्ही ते इतक्या निगुतीने करत असल्याने तुमच्या गणपती बाप्पालाही ते आवडतील, यात शंका नाही. खरी मजा येईल ती तुमच्या गणपतीसमोर मोठय़ांनी केलेल्या किंवा बाजारातून आणलेल्या मोठय़ा, तळलेल्या किंवा उकडीच्या मोदकांसमोर हे चिमुकले, चविष्ट आणि सुबक भातुकली मोदक  बाप्पाला नमस्कार करायला येणाऱ्या मित्र, नातेवाईकांचं लक्ष वेधून घेतील. आहे की नाही मज्जा?

या मोदकांची आश्चर्यचकित करणारी गोष्ट माझ्याकडे आहे. मी हे मोदक फार वर्षांपूर्वी एका चिमुकल्यांच्या शिबिरामध्ये शिकवले. तिथल्या थोडय़ा गरीब मुलांनी मला नंतर सांगितलं की, ‘दादा, हे मोदक आम्हाला फारच आवडले. आम्ही घरून मिळणाऱ्या चण्या-फुटाण्याच्या पशामध्येसुद्धा आमच्या बाप्पाकरता प्रसाद बनवू शकतो.’ मी चकित झालो.. त्यांचं उत्तर सोप्प होतं. ‘अरे दादा, आम्ही फक्त शेंगदाणे आणि बेदाणे किंवा अगदी गूळ-शेंगदाणे वापरून हे मोदक करू शकतो की?’ या मुलांच्या बाप्पावरच्या प्रेमाने या माझ्या मोदकांची चव द्विगुणीत केली. तेव्हाच यांचं बारसं झालं- भातुकली मोदक.

contact@ascharya.co.in