अथर्व, वेदांत, ओंकार, विराज, मुक्ता, सई सगळ्यांचा लपाछपीचा खेळ रंगात आला होता. इतक्यात मुक्ताची आई बाहेर निघाली. मुक्ताने बरोबर लक्ष ठेवून तिला आठवण करून दिली.
‘‘आई, नुसती केळी, सफरचंद नको आणूस. डाळींब पण आण, बरं का.’’
‘‘आजी पेपर वाचत बसली होती. मुक्ताने केलेला डाळिंबाचा उल्लेख तिने ऐकला. त्यामागचं कारण जाणून घेण्याची आजीला उत्सुकता होती. म्हणून तिने मुक्ताला विचारलंच.’’
‘‘मुक्ता, डाळींब आणायला सांगितलंस काही विशेष मेनू.’’
‘‘विशेष काही नाही गं. जरा गंमत.’’ मुक्ता स्वत:च्याच कल्पनेवर खुदकन हसली.
‘‘आजी, म्हणजे ही नुसतं लालतिखट पण खाणार मिसळ्याच्या डब्यातलं,’’ अथर्व त्यातल्या त्यात मोठा असल्यामुळे त्याच्या डोक्यात हा वेगळा विचार घुसला.
‘‘बाप ऽऽरे, मग ती हाय हाय करत नाचायला लागेल,’’ नुसतं गोड खायला आवडणाऱ्या ओंकारने नाचूनच दाखवले. एक एक करत सगळेच धुडघूस घालू लागले. शेवटी आजीला लक्ष घालावंच लागलं.
‘‘आपण एक गंमत करूया. आपण हा लाल रंग आजूबाजूला कुठे कुठे दिसतो तो शोधण्याचा प्रयत्न करू या. आज मुक्ताने लाल रंगाकडे सगळ्यांचे लक्ष वेधले म्हणून आज आपण लाल रंग शोधूया.’’ आजीने सगळ्यांना ‘रंगात’ बुडवले.
‘‘आजी, मी आधी सांगणार. लाल टिकली. माझी आई सारखी लाल टिकल्यांची पाकिटं आणत असते. लग्न झालं की लालच टिकली लावतात ना गं?’’ – इति मुक्ता.
‘‘होऽऽ तर. कुंकवाचा रंग ही लाल असतो. भारतीय परंपरेत कुंकू लावण्याची प्रथा ५००० वर्षांपासून चालत आलेली आहे, असं अभ्यासक सांगतात. हा सामर्थ्यांचा रंग आहे. सोळा शृंगारामध्ये कुंकवाला स्थान आहे. पूजा किंवा धार्मिक कार्य असेल तर आपण पुरुषांनाही उभं कुंकू लावतो. ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीनं कुंकू हे मेष राशीचं प्रतीक आहे. मंगळ हा या राशीचा स्वामी म्हणून तोही लालसरच.’’ आजीनं अधिक माहिती दिली.
‘‘..आणि रक्तपण लाल असतं.’’ अथर्वने वयाचा शहाणपणा दाखवला आणि महत्त्वाची नोंद घेतली.
‘‘..शाबास, अगदी खूप महत्त्वाची गोष्ट सांगितलीस तू अथर्व. रक्त तयार करता येत नाही, पण त्याची गरज असते. म्हणून तर रक्तदान हे महत्त्वाचे आहे.’’ आजीने कौतुक केले.
‘‘आजी, सिग्नलही लाल असतो.’’ गाडीवरून फिरताना मध्ये मध्ये थांबविणारा सिग्नल विराजच्या ओळखीचा होता.
‘‘खरं आहे. आपल्या रोजच्या वेळापत्रकातील महत्त्वाचा निर्णय लाल रंगावर अवलंबून आहे. वाहन चालवताना ‘थांबा’चा आदेश तो देतो. यासाठी लालच रंग का? गुलाबी, जांभळा, तपकिरी का नाही? सांगा बरं.’’ – इति आजी.
‘‘अगं, दिवे बसविणाऱ्यांकडे लाल दिवे खूप असतील. आणि तो रंग त्यांच्याआवडीचा असेल.’’ वेदांतने निरागस खुलासा केला.
‘‘तसं नाही हं. लाल रंगाची वेव्हलेंथ सर्वात जास्त असते. तो सगळ्या रंगात प्रखर असतो. म्हणून दुरूनही दिसतो. आणि म्हणून धोक्याची सूचना किंवा सावधान करण्यासाठी लाल रंगाचा उपयोग केला जातो.’’
‘‘म्हणून रेडक्रॉसमध्ये किंवा शववाहिकेवर लाल रंगाची फुली असते.’’ मुक्ताच्या बरोबर लक्षात आले.
‘‘शिवाय इंद्रधनुष्यातही पहिला रंग तांबडालाल असतो. ता ना पि हि नि पा जा’’,, सईच्या डोळ्यासमोर जणू काही इंद्रधनूची कमानच होती. त्यामुळे हात कमान रेखत होते. सगळ्यांनीच हवेत कमानी रेखल्या.
‘‘झेंडय़ातही लाल रंग असतो.’’ओंकारचे हात आता खोटाखोटा झेंडा काढण्यात गुंतले.
‘‘लाल, भगवा, केशरी, तांबडा या लाल रंगाच्याच विविध छटा. एकाच कुटुंबातल्या माणसांसासारख्या आजीने एकतेतील वैविध्य स्पष्ट केले.
‘‘मेंदीचाही रंग लाल असतो. माझी मेंदी ना अगदी लालचुटूक रंगते.’’ हातावरच्या मेंदीने मुक्ताला आठवण करून दिली.
‘‘लालचुटूक, किती छान वाटतं ना, चुटूक शब्द म्हणताना.’’ सई मुक्ताच्या जवळ जात दोघींच्या मेंदीचा रंग सारखाच आहे ना, हे निरखू लागली.
‘‘लाल गुलाब चाचा नेहरूंना फार आवडायचा. बालदिनाला मला नेहमी ही गोष्ट आठवते. आम्हा मुलांना ते फूल बटणाच्या इथे खोचता येते ना! बाकी फुलं आमच्या उपयोगी नाहीत. म्हणून लाल गुलाब मला फार आवडतो.’’ विराजने बोलता बोलता फूल शर्टला खोचल्याचा अविर्भाव केला.
दहावीचं वर्ष असल्यामुळे अभ्यास करत बसलेली रतीताई पाणी पिण्याच्या निमित्ताने हळूच डोकावली.
‘‘ए रतीताई, लाल रंग कुठे दिसतो सांग ना.’’ सईने तिला पकडलेच.
‘‘अगं, लालगुलाब हे प्रेमाचं प्रतीक आहे. काही जणांकडे लग्नात नवरीचा पोशाख लाल असतो. शिवाय खूप छान स्वागत करायचं असलं की रेडकार्पेट अंथरलय, असं म्हणतात. पळस, पांगारा, काटेसावर, गुलमोहर हे वृक्ष वसंत ऋ तूत इतके फुलतात की झाडाला पान दिसतच नाही. जणू हे लाल वृक्षच असतात.’’ रतीताईने झटपट ‘लाल रंग’ आठवला.
‘‘आणि गणपती बाप्पालासुद्धा लाल जास्वंदीचं फूल प्रिय आहे.’’ विजयी मुद्रेने सई म्हणाली.
‘‘माणिक हे रत्न लाल असतं बरं का! शिवाय अक्षता वापरतो ना पूजेत तेव्हा त्यांना कुंकू लावूनच वापरतो. पांढरे तांदूळ घेत नाही आपण. विडा कसा रंगतो सांगा बघू?’’-इति आजी.
‘लाऽऽल.’’ सगळ्यांनी चटकन् उत्तर दिलं. उगाचंच न रंगलेल्या जिभा बाहेर आल्या.
‘‘पण त्या लाल पिचकाऱ्यांनी आपण जिथे तिथे रस्ते घाण करतो, हे चांगलं का?’’ आजीने सगळ्यांना विचारात पाडलं.
सगळ्यांच्या नकारार्थी माना हलल्या.
‘‘मेकप करताना गालाला लाल रूप लावता नं! त्याने गाल कसे आरक्त होतात.’’ रतीताई सोडून इतरांच्या नजरेत ‘आरक्त’ शब्दाविषयीचे अनोळखी भाव वाचताना आजीला मजा वाटली.
‘‘सूर्य उगवताना आकाशात लाल रंगाची पखरण होते. आपण काय म्हणतो त्याला, तर ‘तांबडं फुटलं’. कुठेही प्रवासाला गेलो की सनसेट पॉइंट आपण चुकवत नाही. कारण तो लाल गोळा क्षितिजाखाली डुबताना रंगांची नयनमनोहर उधळण होत असते.’’
‘‘आणि आजी, बरं झालं आठवलं. पेपर तपासताना आमच्या बाई लाल शाईचं पेन वापरतात. उत्तरं चूक की बरोबर ठरवून लाल रंगात मार्क देतात. ते सगळं छान वाटतं. पण प्रगती पुस्तकात एखाद्या विषयात दांडी उडाली की लाल रेष मारली जाते. तेव्हा खूप वाईट वाटतं. इथे लाल रंग नको वाटतो.’’ अथर्वने अगदी गंभीरपणे सांगितलं.
‘‘मग चला तर भरपूर अभ्यास करा. आज लाल रंगाच्या हिमालयाचं किंचितसं टोक पाहिलं. उरलेला लाल रंग, पुन्हा कधी घरी शोधू या.’’
काहीतरी ‘शोधलं’ या आनंदात सगळेच पांगले.
suchitrasathe52@gmail.com