दोस्तांनो, नवं वर्ष उजाडलं. नवं वर्ष म्हणजे नवं नवं काही सुरू करायचं म्हणजे संकल्प करायचा. असं छोटे आणि मोठे सारेजणच संकल्प करतात. संकल्प म्हणजे काय? एकच गोष्ट रोज किंवा ठरावीक कालानंतर पुन्हा पुन्हा करणे. पण संकल्प करायचे आणि मोडायचे हे कोणालाच नवीन नाही. कारण तेच तेच करायचा कंटाळा येतो आणि जे काही करायचं ठरवलेलं असतं ते बंद पडतं. म्हणूनच या नवीन वर्षांत तेच तेच परत परत करूच नका. म्हणजे कंटाळून बंद पडायचा प्रश्नच येणार नाही. आणि दुसरी गोष्ट- पुस्तकं, वह्या, पेन, पेन्सिल, कंपासपेटी, दप्तर हे सगळं बाजूला ठेवूनही खूप काही करता येईल असाही विचार करा. या नवीन वर्षांत आम्ही काही गमतीजमतीचे प्रयोग घेऊन येणार आहोत. तुम्हाला जमेल तेव्हा, शक्य असेल तेव्हा पाटी, पुस्तक, वही, पेन, पेन्सिल, मोबाइल, कम्प्युटर बाजूला ठेवा आणि व्हा आमच्यात सामील. आणि घरातल्या मोठय़ांनाही घ्या तुमच्याबरोबर.
दोस्तांनो, तुम्हाला एक छोटीशी गंमत सांगू का? रागवायचं नाही आणि एकदम झिडकारूनही टाकायचं नाही. शांतपणे विचार करायचा. अगदी पुढचं वर्षभर विचार करायचा आज जे काही वाचणार त्याच्यावर. तर मी तुम्हाला असं म्हणणार होते, की आपल्याला नेहमी इतरांबद्दल बोलायला आवडतं पण आपण आपल्याबद्दल फार म्हणजे फारच कमी बोलतो आणि कमी विचार करतो. म्हणजे आपण आपल्या एखाद्या मित्राचा चांगला गुण, त्याचा एखादा दोष पटकन सांगून मोकळे होतो. पण सांगा बरं, तुमचा एखादा चांगला गुण किंवा तुमच्यामधील चांगले गुण. एका सेकंदात सांगा. नाही ना जमत, होतोय ना गोंधळ. मग तो आता टाळायचा. पुढचं वर्षभर हे करायचं. तुमच्यामधील चांगले गुण शोधायचे जसे की उदाहरणादाखल- चिकाटी, सातत्य, सहकार्याची वृत्ती, विचारीवृत्ती, आत्मविश्वास, उत्साही, प्रामाणिक, वक्तशीर, कष्टाळू, समायोजनक्षम, बोलकेपणा, खुलं मन. हे किंवा यापेक्षा वेगळेही असू शकतात बरं! यातले जे तुमच्याकडे आहेत ते खुल्या दिलाने मान्य करायचे आणि जोपासायचे. हो, हो, मला माहिती आहे, सगळेच सगळ्यांकडे नसणार आणि स्वत:ला तुम्ही फसवणार नाहीच, की माझ्यापाशी हे सगळे गुण आहेत म्हणून. कारण, माणूस म्हटला की गुणदोष आलेच. आपले दोषही आपण आपल्याशी मान्य करायला काय हरकत आहे! काही दोष असणारच तुमच्याकडे. जसे की-आळशी, रागीट, अनियमित, विसराळू, बेजबाबदार, उद्धट, वक्तशीरपणाचा अभाव, कोत्या मनाचा, भित्रा, दुसऱ्याचा द्वेष करणारा, अप्पलपोटा, स्वार्थी.. यातील किंवा यापेक्षा काही वेगळं. हो, हो, समजतंय, सारं समजतंय. आपल्याला असं दुर्गुणी म्हणायला मन तयार होतच नाहीए. नाहीच होणार. पण आपल्या मनाशी मान्य करायला काय हरकत आहे? कारण ते काही कुणाला ऐकू जात नाहीए. आणि हे मान्य करायला एवढा त्रास होत असेल तर त्रास का वाढवायचा. आत्ताच सुरुवात करा नं बदलायची. हळूहळू नक्कीच बदलाल. ज्याची लाज वाटते ते दुर्गुण काढून टाका, जाणीवपूर्वक काढून टाका आणि पुढील वर्षी चमकत्या सद्गुणांच्या जोरावर नवीन वर्षांला सामोरं जा. या सगळ्यासाठी आपल्याकडे पुरं एक वर्ष आहे. चाला, मग व्हा तयार!
joshimeghana.23@gmail.co