सकाळपासून खेळून, दमूनभागून मिनी दुपारी जेवायला आली ती जरा हिरमुसल्यासारखीच. पानं घेताघेता आईनं विचारलं, ‘काय गं मिने? काय झालं? कुणाशी भांडलीस की काय?’ पण मिनी गप्प ती गप्पच.
आईला काहीच समजेना. ती स्वयंपाकघरात जायला निघाली तशी मिनी म्हणाली, ‘हे काय गं आई? माझा वाढदिवस आहे ना आता पुढच्या आठवडय़ात? आपण अजून काहीच तयारी केली नाही! मला आज सगळे मित्र-मैत्रिणी विचारात होते की केक कुठला आणणार? रिटर्न गिफ्ट काय देणार? मला काहीच सांगता नाही आलं.. शी बाबा.’
‘‘अच्छा, म्हणून स्वारी रुसली आहे तर!’’ आईला कारण लक्षात आलं. आई मिनीला म्हणाली, ‘अगं मिने, त्यात काय? दरवर्षी करतो त्याप्रमाणे करायचा की साजरा तुझा वाढदिवस. आपण मस्त घरी केक करू. तू सांगशील तो खाऊ करू. तुझ्या मित्र-मैत्रिणींना बोलावू! काय?’ हे ऐकून मिनीचा चेहरा जरास्सा खुलला.
ती म्हणाली, ‘आई आपण या वर्षी सगळ्यांना खरंखुरं घडय़ाळ रिटर्न गिफ्ट म्हणून देऊया का? मागच्या वर्षीसारखं नको ते पट्टी-पेन्सिल वगैरे.’
हे ऐकून आई जरा चमकलीच. आई मिनीला काही सांगणार, समजावणार तितक्यात दारावरची बेल वाजली. दारात मिनीचा मित्र संजू आणि बिल्डिंगच्या वॉचमनचा- गंगारामचा मुलगा चंदू मिनीबरोबर खेळायला आले होते.
गंगाराम अनेक वर्षे बिल्डिंगमध्ये वॉचमनचं काम करत होता. त्याचबरोबर बिल्डिंग साफ ठेवणं, सगळ्यांची बिलं भरणं, गाडय़ा पुसणं, अगदी दळण आणणं अशी सर्व कामे तो प्रेमानं करत असे. त्याला बिल्डिंगच्याच आवारात असलेल्या आउट हाउसमध्ये राहायला जागा दिली होती. त्याची बायकोही चार-दोन घरची धुणी-भांडी करून गंगारामला मदत करत असे. त्यांचा हा मुलगा चंदू. त्याला एक मोठी बहीण होती-सावरी. ती दोघंही शाळेत शिकत होती. चंदू या मुलांच्याच वयाचा असल्यामुळे त्यांच्यात कधी कधी खेळायला येत असे. तो क्रिकेट, खो-खो मस्त खेळायचा आणि धावायचाही जोरात. त्यामुळे बिल्डिंगमधली मुलंसुद्धा अगदी प्रेमानं त्याला खेळांमध्ये सामील करून घेत.
दोघेजण आत शिरताच संजूने मिनीच्या आईला विचारलं, ‘काकू, आता मिनीचा बर्थडे आहे नं? मग, बर्थडेचं रिटर्न गिफ्ट काय देणार?’ मिनी उत्सुकतेने आई काय म्हणते ते ऐकू लागली.
आई शांतपणे म्हणाली, ‘बघू, अजून ठरवलं नाही रे, संजू.’
संजू पुढे म्हणाला, ‘काकू, पण मिनीची मज्जा असते बर्थडेला. घरी मस्त केक करता न तुम्ही आणि मिनीची मावशी मिळून? आमच्याकडे आईला वेळच नसतो. त्यामुळे विकतचा केक. मज्जा आहे मिनी तुझी! आणि काकू, मिनी तर म्हणत होती की ती खरं घडय़ाळ देणार आहे या वर्षी रिटर्न गिफ्ट म्हणून! खरंच? तसं असेल तर ग्रेटच.. गेल्या आठवडय़ात नाही का, साहिलच्या आईने व्हिडीओ गेम्स रिटर्न गिफ्ट म्हणून दिले होते सगळ्यांना त्याच्या बर्थडेला? आता मीपण माझ्या आईला सांगणार आहे की माझ्या बर्थडेलाही असं काहीतरी मस्त रिटर्न गिफ्ट द्यायला. ती नक्की आणेल माझ्यासाठी. ती माझे खूप लाड करते.’
साहिल अतिशय श्रीमंत घरचा, लाडावलेला मुलगा होता. शेजारच्या सोसायटीमध्ये त्याच्या वडिलांचा मोठा बंगला होता. त्यामानाने मिनी किंवा तिचे इतर मित्र-मैत्रिणी मध्यमवर्गीय घरातले होते. मिनीच्या आईला मुलांच्या या अशा चर्चा काही सहन होईनात. ती चंदूकडे वळली. तो एकटाच मिनीच्या एका खेळण्याशी खेळत बसला होता. तो हे सगळं ऐकत होता खरं, पण न ऐकल्यासारखं करत होता.
मिनीच्या आईने मुद्दामच त्याला विचारलं, ‘चंदू, तुझा वाढदिवस केव्हा असतो रे?’
चंदू म्हणाला, ‘तसा ऑक्टोबरमध्ये असतो, पण माझी आई दर दिवाळीला मला ओवाळते, नवीन कपडे आणते आणि मला आवडतात म्हणून मोतीचूर लाडू करते. म्हणून तोच माझा वाढदिवस.’
‘हे काय, चंदू? केक नाही कापत तू? आणि रिटर्न गिफ्ट?’, मिनीने जरा चिडवतच चंदूला विचारलं.
आईने तिच्याकडे रागावून बघितलं. ती मिनीला म्हणाली, ‘मिने, दर दिवाळीत नाही का चंदूची आई आपल्या सगळ्यांना तिने स्वत: केलेले मोतीचुराचे लाडू देते? आपण कित्ती आवडीने खातो ते? हेच त्याचं रिटर्न गिफ्ट! रिटर्न गिफ्ट मोठंच असलं पाहिजे असं कुणी सांगितलं?’ आईने मिनीला समजावण्याचा प्रयत्न केला.
चंदू पुढे म्हणाला, ‘पण काकू, या वर्षी नं मी कपडे नाही आणणार माझ्या वाढदिवसाला.’
‘मग रे?’, आईने कुतूहलाने विचारलं.
‘काकू, मी या वर्षी आईला माझ्याकरता कंपासपेटी आणायला सांगणार आहे.’
‘का रे? नाही का तुझ्याकडे कंपासपेटी?’ मिनीच्या आईने विचारलं.
चंदू म्हणाला, ‘नाही नं ककू. त्या वरच्या जोशीकाकूंच्या मुलाने पेटी दिली होती एक. पण ती आता तुटायला आली आहे. तशी जुनीच होती ती.. सावरीकरता आईने दप्तर घेतलंय नं या वर्षी. मग आता मी एकाच वेळेस कपडे आणि कंपासपेटी कशी मागू? म्हणून मग या वाढदिवसाला कंपासपेटी. कपडे पुढच्या वाढदिवसाला. तसे माझे आहेत ते कपडे चांगले आहेत अजून.’ हे सांगतानादेखील चंदूच्या चेहऱ्यावर आनंद होता. त्याचंही त्याला अतिशय अप्रूप होतं.
थोडय़ा वेळाने मुलं खेळून आपापल्या घरी निघून गेली. आई मिनीला म्हणाली, ‘बघ मिनी, चंदू किती शहाणा मुलगा आहे. त्याच्या आईनं सावरीकरता नवीन दप्तर आणलं तर त्याला कळलं, की आता आईला नवीन कपडे आणि कंपासपेटी नाही परवडणार त्याच्या वाढदिवसाला आणायला. म्हणून मग तो त्याला आवश्यक असलेली कंपासपेटी घेणार आहे या वर्षी वाढदिवसाला आणि कपडे नाही घेणार. बाळा, आपण एक काम केलं तर? या वर्षीपासून आपण वाढदिवसाला मित्रांकडून गिफ्ट घ्यायचंही नाही आणि रिटर्न गिफ्टसुद्धा द्यायचं नाही. सगळ्या मित्र-मैत्रिणींनी एकत्र जमायचं, खायचं, प्यायचं, खेळायचं आणि धम्माल करायची. आपणही आता मोठे झालो की नाही? मग नुसतं उंचीने नाही वाढायचं! विचारांनीही मोठं व्हायला हवं की नको?’ मिनी आईचं बोलणं मन लावून ऐकत होती.
आई पुढे म्हणाली, ‘हे बघ, सगळ्यांनाच सगळ्या गोष्टी परवडतात असं नाही. आपण नेहमी आपल्या आजूबाजूला जसे लोक असतील त्याप्रमाणे वागावं, राहावं. म्हणजे सगळे आपले मित्र बनून राहतात. आता बघ, साहिलने व्हिडीओ गेम त्याच्या वाढदिवसाला रिटर्न गिफ्ट म्हणून दिला तर तुला घडय़ाळ द्यायचंय. मग संजू अजून मोठ्ठं काहीतरी देईल. ते बघून प्रिया, सायलीला वाटेल त्याच्यापेक्षा अजून मोठ्ठं काहीतरी द्यायचं रिटर्न गिफ्ट म्हणून. मग राहतं काय? मी जास्त, तू कमी हेच. आपल्याला ते हवं आहे का? आपल्याला साहिलही मित्र म्हणून हवा आणि चंदूही. गरिबी, श्रीमंती, मोठेपणा, कमीपणा आपल्या मैत्रीच्या आड येता कामा नयेत. सगळ्यांशी मिळून-मिसळून वागायचं. हीच खरी मैत्री. रिटर्न गिफ्ट किंवा अजून कुठल्या महागडय़ा गोष्टींवर आपली मैत्री नसते ठरवायची. समजलं बाळा!’
मिनीला मनापासून आईचं म्हणणं पटलं. ती मोकळेपणानं हसली आणि तिने आईला मिठी मारली! या वर्षीपासून वाढदिवसाचं आमंत्रण करताना ‘नो गिफ्ट्स प्लीज’ असं सगळ्या मित्र-मैत्रिणींना सांगायचं हे तिने मनोमन ठरवून टाकलं!
रिटर्न गिफ्ट
सकाळपासून खेळून, दमूनभागून मिनी दुपारी जेवायला आली ती जरा हिरमुसल्यासारखीच. पानं घेताघेता आईनं विचारलं, ‘काय गं मिने?
First published on: 14-09-2014 at 02:26 IST
मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Return gift