अदिती देवधर
वसुंधरा दिनानिमित्त संपदा आणि यशच्या शाळेनं त्यांना प्रकल्प करायला सांगितला होता. दोघांना ‘नदी’ हा विषय आला होता. यशचे आजोबा लहानपणी राहायचे तो वाडा नदीच्या काठावर होता. त्यांच्याकडून नदीची माहिती मिळाली. आजोबांचे मित्र जिऑलॉजिस्ट म्हणजे भूशास्त्रज्ञ होते. आजोबांनी सुचवलं की, त्यांच्याकडे जाऊन नदी समजून घ्या. शाळेनं सांगितलं आहे म्हणून नाही, तर स्वत: नवीन शिकण्यासाठी म्हणून हा प्रकल्प करा.
यश आणि संपदा त्यासाठीच सरांकडे आले होते. नदीबद्दल खूप नवीन गोष्टी कळल्या. नळ सोडला की पाणी येतं हे इतकं सवयीचं आहे, की पाणी नक्की कुठून आणि कसं आपल्यापर्यंत पोहोचतं, हा विचारच कधी आपण केला नाही, हे दोघांच्या लक्षात आलं.
नदीची ब्रिटिशांच्या काळातली पेंटिंग्ज, काही जुने फोटोही सरांनी दाखवले. नदी खूप सुंदर होती, तिच्यात होडय़ा होत्या, काठावर झाडे-झुडपे होती. नदीचं पाणी अगदी स्वच्छ होतं.
नदी म्हणजे कचरा, गढूळ, काळेकुट्ट पाणी आणि सडका वास, असंच समीकरण झालं होतं. यापेक्षा नदी वेगळी होती ही मुलांसाठी नवीन माहिती होती.
नदीच्या उगमाजवळ सर नुकतेच जाऊन आले होते. तेथून नदी शहरात येईपर्यंत, वेगवेगळय़ा टप्प्यांत त्यांनी नदीचे फोटो काढले होते ते दाखवले. जुन्या फोटोत नदी जशी छान दिसत होती तशीच अजूनही आहे, अर्थात शहरात प्रवेश करण्यापूर्वी. ‘नदीच्या या अवस्थेला शहरातले लोक म्हणजे आपण जबाबदार आहोत.’ यश विचारात गढला होता.
सरांनी सांगितलं की, पंधरा ते वीस हजार वर्षांपासून आपले पूर्वज या नदीच्या काठावर राहत आहेत. शहरातही नदी अगदी चाळीस-पन्नास वर्षांपर्यंत स्वच्छ होती.
‘‘नदी परत स्वच्छ कशी करायची? खूपच अवघड काम आहे.’’ संपदा म्हणाली.
मुलांच्या उत्साहाकडे कौतुकानं बघत सर म्हणाले, ‘‘अवघड आहे, अशक्य नाही. आपलं काय चुकलं, कुठे चुकलं हा अभ्यास करायचा आणि मग उपाय शोधायचा. जे लगेच शक्य आहे त्यापासून आधी सुरुवात करायची. कुठल्याही कामाला सुरुवात करणं हे सगळय़ात महत्त्वाचं असतं.’’
‘‘काय करता येईल?’’ यश आणि संपदाला काहीच सुचत नव्हतं.
‘‘तुम्हाला नदीबद्दल माहिती मिळाली म्हणून नदीच्या आत्ताच्या अवस्थेचा त्रास झाला. हीच माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवता येईल का? म्हणजे नदीची ही अवस्था खुपणाऱ्या, नदीबद्दल जागरूक असणाऱ्या अशा लोकांचा गट तयार होईल. नदीला आपणच परत स्वच्छ करू शकतो, हा विचार, तसे प्रयत्न हा पुढचा टप्पा.’’ सरांनी सुचवलं.
‘‘आम्ही पेंचला गेलो होतो तेव्हा जीपमधून सफारी केली. गाईड आम्हाला माहिती देत होते. आपण शाळेतल्या मित्र-मैत्रिणींना आणि शिक्षकांना नदीवर घेऊन जाऊ. नदीचा जन्म, तिचा इतिहास त्यांना सांगू, फोटो दाखवू, नदीपात्रातला खडक, रांजणखळगे दाखवू.’’ यश म्हणाला.
‘‘नैसर्गिक वारसा फेरी!’’ संपदा टाळी वाजवत म्हणाली, ‘‘या रविवारी सकाळी शाळेतले लोक पुढच्या रविवारी आपल्या सोसायटीतले लोक, मग नातेवाईकांना फेरीला घेऊन जाऊ.’’
‘‘नदीचा प्रकल्प नदीवरच जाऊन करू.’’
aditideodhar2017@gmail.com