ओम आता नुकताच चालायला लागला होता. एक पाऊल पुढे ठेवलं की पाठोपाठ दुसरं पाऊल उचललं जाई. आणि बघता बघता एका आठवडय़ात ते बाळ दोन्ही पायांना चाकं लावल्यासारखं दुडुदुडु पळू लागलं. कधी धडपडायचंसुद्धा.. पण त्यातही त्याला खूप मज्जा यायची. घराचा असा एकही कोपरा उरला नव्हता जिथे हे पाय पोहोचले नसतील. घरासमोरच्या अंगणातही रोज सायंकाळी त्याची आई त्याला घेऊन जात असे. घरापेक्षा बाहेरची मज्जा त्याला जास्त आवडे, त्यामुळे दिवसासुद्धा त्याचे पाय अंगणाकडे वळायचे.

एकदा अशाच एका भर दुपारी त्याने बाहेर जाण्याचा हट्टच धरला.

‘‘आई, बाहेर बाहेर..’’ करत त्यानं बाहेरचा रस्ता धरला.

‘‘अरे, असं इतक्या दुपारी बाहेर नाही ना जायचं. ये, आत ये बघू.’’ त्याची आई पळतच त्याच्या मागे आली.  पण ओमनं आता चांगलंच भोकाड पसरलं आणि मग आईचा नाईलाज झाला. आईनं त्याचे इवलेइवलेसे नवे बूट त्या नाजूक पायांत चढवले आणि डोक्यावर एक छानशी टोपी घातली.

‘‘व्वा! कित्ती छान बूट आहेत हे! आणि ही टोपी तर मस्तच. आता मी उन्हात खेळणार. खूप मज्जा येणार. उद्यापण येणार. आणि नंतर पण रोज येणार.’’ ओम मनातल्या मनात कल्पनांचे मनोरे रचत होता.

बऱ्याच तयारीनंतर ओम आता अंगणात आला आणि इकडे-तिकडे पळू लागला. एकटाच असला तरी त्यातही त्याला खूप गंमत वाटत होती, पण ओम फार काळ एकटा राहिला नाही. खेळता खेळता अचानक त्याला जाणवलं की, कोणीतरी त्याच्या पाठी मघापासून पळत होता आणि आता त्याच्याच पाठी लपला आहे. मागे वळून पाहिलं आणि तो चांगलाच दचकला.

‘‘अरे, हा कोण आहे काळा काळा प्राणी? थोडा थोडा माझ्यासारखाच दिसतो आहे हा तर. पण थोडा मोठा आहे. आणि हे काय, तो असा जमिनीवर कसा बरं उभा?’’

ओम घाबरून जीव मुठीत घेऊन सरळ पुढे पळत गेला. आता तो काळा प्राणी नक्कीच गेला असेल असं समजून पुन्हा मागे वळून पाहिलं तरी तो राक्षसासारखा वाटणारा प्राणी त्याच्या पाठीच होता. पण आता तो पूर्वीपेक्षाही जास्त लांब दिसत होता. ओम आता पुरता घाबरला होता. सैरावैरा पळू लागला. कधी मधेच थांबून पुन्हा धिटाईनं मागे वळून पाहायचा आणि पुन्हा घाबरून पळत सुटायचा. एका ठिकाणी असाच पुन्हा एकदा थांबला. थोडं धाडस करून मागे वळून पाहिलं आणि काय आश्चर्य, तो प्राणी गायबच झाला. ओम फारच खूश झाला. आता मात्र तो पळून पळून फार थकला होता. त्याची गाडीच्या वेगानं चालणारी पावलं आता संथ झाली होती. पावलं समोरच्या दिशेनं पडत असली तरी नजर मात्र मागेच रेंगाळत होती.. चुकून तो प्राणी परत आला तर?

असंच बेसावध चालत असताना त्याचा पाय अडखळला आणि ओम जमिनीवर चांगलाच आपटला. थोडं फार लागलं खरं, पण ओम आता रडायला लागला ते त्याच्या अंगाखाली असलेल्या त्याच मघाशी दिसत असलेल्या प्राण्याला पाहून. सारं बळ एकवटून तो पुन्हा उभा राहिला, तर समोर पुन्हा एकदा तो अवाढव्य प्राणी उभा! तो पुन्हा पळू लागला. कोण आहे हा? आणि का माझ्याच मागे लागला आहे, हे त्या चिमुरडय़ाला समजेच ना. त्यानं पायानेच त्याला दोनचार फटके मारले. पण तो प्राणी जागचा हलला नाही. पण ओम जरा जरी हलला की तो लगेच त्याच्यासोबत डोलायचा. पळू लागला की पळायचा. ओम थांबला की तोही एका ठिकाणी स्थिर व्हायचा. ओमने मारायला हात उगारला तर त्या प्राण्यानंही त्याचा भला मोठा हात वर उचलला. तो पाहून पूर्णपणे घाबरलेला ओम आता जोरजोरात रडायला लागला. आपल्या बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकताच त्याची आई बाहेर आली. तिला पाहताच ओम तिच्यापाशी धावला. आईनेही पुढे येत त्याला वर उचलून घेतलं.

‘‘आई, हा बघ बुवा मला त्रास देतो आहे. तू मार ना त्याला.’’ असं आपल्या बोबडय़ा न कळणाऱ्या भाषेत ओम आपल्या आईला त्या प्राण्याच्या दिशेला बोट दाखवून खुणावत होता.

मघापासून आपल्या मुलाचा सुरू असलेला हा खेळ पाहणारी आई त्या निरागस चेहऱ्याकडे पाहत हसत होती.

‘‘कोण आहे रे तिकडे? कोण माझ्या बाळाला त्रास देतंय? बघू जरा.. कुठे आहे तो?’’

आईच्या या प्रश्नांचं उत्तर म्हणून ओमने खाली पाहिले तर काय, तिथे आता दोन प्राणी होते तसेच काळे काळे. एक नवीनच मोठा प्राणी आणि त्याने उचलून घेतलेला तोच जुना छोटा राक्षस. ते दोघे अगदी त्याच्या आईसारखे आणि त्याच्यासारखेच दिसत होते. ते पाहून ओमचा चेहरा क्षणात रडवेला झाला. त्याला आता काय बोलावे तेच सुचेना. ते पाहून पुन्हा आई खुद्कन हसत म्हणाली, ‘‘अरे, हे होय. याला घाबरलास तू? अरे ही तर सावली आहे. ती एक माझी आणि ती एक तुझी. असा एका दिशेला प्रकाशाचा स्रोत असेल तर तो प्रकाश आपल्यामुळे अडला जातो आणि प्रकाशकिरणे जमिनीपर्यंत पोहोचत नाहीत. मग त्या तेवढय़ा भागात असतो तो फक्त अंधार आणि मग तयार होते सावली. ती जिथे जिथे प्रकाश असेल तिथे तिथे आपल्या आसपास कुठेतरी असते. रात्री प्रकाश नसतो म्हणून ती सावलीही नसते. पण सूर्याच्या प्रकाशात मात्र ती सर्वाच्या सोबत असते. पण तिला घाबरायचे मुळीच नाही. उलट तिच्या सोबत खेळायचे.’’

‘‘खेळायचे? हा नवा प्राणी माझ्यासोबत खेळेल?’’

ओम लगेच खेळाचे नाव ऐकताच आनंदाला. ‘‘हो हो, का नाही? बघ आपण खेळूया त्याच्या संगे,’’ असं म्हणत आईनं ओमला खाली उतरवलं आणि आपल्या हाताच्या बोटांच्या विशिष्ट रचना करत कधी हरीण तर कधी मासा तयार केला. आणि मग बघता बघता ओमच्या कल्पनेतले सारे प्राणी आणि पक्षी तिथे एकापाठोपाठ एक येत गेले. आणि हळूहळू त्याच्या मनातली भीती कुठच्या कुठे पळून गेली आणि त्याजागी आता तिथे होती फक्त मज्जाच मज्जा!

– रूपाली ठोंबरे

rupali.d21@gmail.com