आराध्य जून महिन्यापासून पाळणाघरात जायला लागलाय. त्याच्या पाळणाघरातल्या आत्तू खूपच प्रेमळ आणि हौशी आहेत. अगदी छोटय़ा मुलांपासून ते मोठय़ा दादा-ताईंनासुद्धा खेळता येतील असे छान छान खेळ त्यांच्याकडे आहेत. रोज त्या मुलांना आवडेल असा खाऊही करतात. दिवाळीत आत्तूनी सगळ्यांसाठी दिवाळीचा फराळ आणि बटाटेवडय़ाची पार्टी केली होती. शिवाय सुट्टीत एका बालनाटय़ालासुद्धा त्या सगळ्या मुलांना घेऊन गेल्या होत्या. त्यामुळे पाळणाघरात जाताना आराध्य अगदी खूश असतो.
आज आराध्यच्या पाळणाघरात ख्रिसमस पार्टी होती. सॅन्टाक्लॉजसारखे लाल कपडे घालून सगळ्यांना बोलावलं होतं. आराध्य पहिल्यांदाच अशा पार्टीला चालला होता. त्यामुळे त्याला पार्टीत नक्की काय असेल याची खूपच उत्सुकता होती. आत्तूकडे गेल्यावर त्याने बघितलं तर प्रत्येक कोपऱ्यात सोनेरी-चंदेरी चमचमणाऱ्या चांदण्या लावल्या होत्या आणि एक खरंखुरं ख्रिसमस ट्री समोरच ठेवलं होतं. त्यालाही छोटय़ा छोटय़ा चांदण्या आणि चमकणारे बॉल्स लटकवले होते. भिंतींवरून चकचकीत कागदाच्या माळा सोडल्या होत्या. कार्डबोर्डवर कापूस चिकटवून ते कटआऊट्स खाली जमिनीलगत ठेवले होते, त्यामुळे पांढराशुभ्र बर्फ सगळीकडे पडलाय असं वाटत होतं. तिथे सोहम, प्रियांका आणि राजसी आधीच आले होते. हळूहळू बाकीचे सगळेही जमले. सगळ्यांनीच लाल लाल कपडे घातले होते. त्यामुळे जिकडे बघावं तिकडे लालचुटुक रंगाची फुलं फुलल्यासारखं वाटत होतं!
सगळे जण जमल्यावर आत्तूनी प्रत्येकाला सॅन्टासारखी टोपी दिली. टोपी डोक्यावर घालून फोटोबिटो काढून झाल्यावर आत्तू म्हणाल्या, ‘‘खेळण्यांशी तर आपण नेहमीच खेळतो. चला आता जरा वेगळा खेळ खेळू या. काल रात्री इथे सॅन्टाक्लॉज आला होता; पण त्याने प्रत्येकासाठी आणलेलं गिफ्ट माझ्याकडे न देता इथेच कुठे कुठे लपवून ठेवलंय आणि ती गिफ्ट्स कुठे लपवलीत ते शोधण्यासाठी ‘क्लूज’ लिहिलेल्या चिठ्ठय़ा माझ्याकडे देऊन ठेवल्यात. तुम्ही त्या चिठ्ठय़ांवरून शोधाल तुमची गिफ्ट्स?’’ आत्तूनी असं विचारल्यावर ‘हो’ असं सगळे जण एका सुरात ओरडले. आराध्यला तर या सगळ्याचीच खूप गंमत वाटत होती. मग आत्तूनी चिठ्ठय़ा ठेवलेला तो मोठा लाल बाऊल हातात घेतला. त्यातल्या चिठ्ठय़ा पुन्हा मिक्स केल्या आणि ‘‘पहिल्यांदा गिफ्ट शोधायला पुढे कोण येणार,’’ असं विचारलं. सोहम एकदम उत्साही असल्यामुळे ‘‘मी, मी’’ म्हणत तो पुढे गेला. बाऊलमध्ये हात घालून त्याने एक चिठ्ठी काढली. आत्तूनी ती उघडून मोठय़ाने वाचली तर तिच्यात लिहिलं होतं ‘टिक टिक टिक टिक’. सोहम आणि बाकी सगळेच विचारात पडले की हे टिक टिक टिक टिक म्हणजे काय असेल बरं! तेवढय़ात सोहमची टय़ूब पेटली. ‘‘घडय़ाळ!’’ असं मोठय़ाने ओरडत तो घडय़ाळाकडे धावला. भिंतीवर लावलेलं घराच्या आकाराचं घडय़ाळ आत्तूनी त्याला खाली काढून दिलं. एका सोनेरी कापडी पिशवीत सॅन्टाने त्याच्यासाठी रंगीबेरंगी मॅग्नेट्स ठेवली होती. ते बघितल्यावर राजसीला राहवलं नाही. ‘‘आता माझा नंबर,’’ असं म्हणत ती आत्तूजवळ पोहोचलीसुद्धा. तिने काढलेल्या चिठ्ठीवर लिहिलं होतं ‘चम चम चम चम’. ‘‘म्हणजे तुझं गिफ्ट चांदणीजवळ असणार,’’ स्मित पटकन म्हणाला; पण आत्तूनी तर सजावटीसाठी इतक्या चांदण्या लावल्या होत्या की, गिफ्ट नेमकं कुठल्या चांदणीजवळ आहे ते शोधता शोधता राजसीची दमछाक झाली! पण अगदी मागच्या चांदणीजवळ सॅन्टाने ठेवलेली ‘डोरा’ची कंपॉसबॉक्स मिळाल्यावर मात्र राजसीचा दम कुठल्या कुठे पळून गेला. मग प्रियांका, आर्या, रोहन, मितेश वगैरे सगळ्यांची टर्न झाली आणि शेवटी आराध्यच उरला. त्या शेवटच्या चिठ्ठीवर लिहिलं होतं ‘हू हू हू हू हू’! आता हे काय असेल याचा सगळेच विचार करायला लागले. पंखा, एसी, फ्रिज इथे शोधूनही झालं.. तरी आराध्यचं गिफ्टच मिळेना. आराध्य अगदी हिरमुसून जमिनीवर बसला आणि समोरच्या बर्फाच्या कटआऊटकडे बघायला लागला. तेवढय़ात त्याला क्लिक झालं की, अरे बर्फात गेल्यावरपण हू हू हू हू हू होतंच ना! तो पटकन उठला आणि त्याने बर्फाच्या कटआऊटच्या मागे बघितलं तर त्याला तिथे एक गिफ्ट पॅक दिसलं. आनंदाने त्याने ते आत्तूजवळ आणलं आणि उघडून बघितलं तर त्यात त्याला आवडणारे रंगीबेरंगी क्रेयॉन्स होते!
आपापली गिफ्ट्स बघून सगळेच अगदी खूश झाले होते. आपली आवडनिवड सॅन्टाला इतकी अचूक कशी कळली याचं सगळ्यांनाच मनातल्या मनात आश्चर्य वाटत होतं. तेवढय़ात आत्तूनी आणखी एक खेळ खेळायला सगळ्यांनी बागेत चला म्हणून सांगितलं. आज पाळणाघराच्या बागेत वेगवेगळ्या दिशांचे बाण दाखवणारे बोर्डस लावलेले होते. ते फॉलो करत करत सॅन्टाने मुलांसाठी लपवून ठेवलेला खजिना शोधायचा असा तो खेळ होता. सोहम एकदम टोपी आणि गॉगल लावून डिटेक्टिव्हसारखा पुढे आणि बाकी सगळे त्याच्या मागे मागे असं करत अर्धा तास बागेत उलटसुलट फिरत शेवटी एकदाचा तो खजिना सापडला! बागेतल्या घसरगुंडीखाली सॅन्टाने खूप चॉकलेट्स असलेला बॉक्स ठेवला होता, तो मिळाल्यावर सगळ्यांनाच खूप आनंद झाला. आता मात्र इतका वेळ खेळून खूपच भूक लागली होती. प्लमकेक आणि पावभाजी पोटभर खाऊन खूश होऊन बच्चे कंपनी आत्तूना ‘बाय बाय.. उद्या भेटू’ म्हणत घरी जायला निघाली. सगळ्या पालकांनी मात्र इतकी मजेदार पार्टी अरेंज करणाऱ्या, आपल्या मुलांना मायेने आणि आपुलकीने सांभाळणाऱ्या त्यांच्या ‘सॅन्टा’ला म्हणजेच आत्तूंना मनापासून ‘थँक यू’ म्हटलं!
(समाप्त)
अंजली कुलकर्णी-शेवडे anjalicoolkarni@gmail.com