दिमाखदार कडय़ांनी सुरेख दिसणारा ग्रह म्हणजे शनी. (इतर काही ग्रहांना कडी असली तरी ती इतकी विलोभनीय नाहीत.) १६१० मध्ये गॅलिलिओने शनीचे निरीक्षण दुर्बणितून केले. ह्युजेन्स नामक खगोलविदाने १६५५ मध्ये शनीचे निरीक्षण करून शनी ग्रह सुंदर कडय़ांनी वेढलेला आहे हे प्रथम सांगितले. साधारण ३७८ दिवसांच्या अंतराने पृथ्वीच्या एका बाजूस शनी तर विरुद्ध बाजूस सूर्य अशी स्थिती येते. या स्थितीला प्रतियुती म्हणतात. प्रतियुतीच्या दरम्यान शनी ग्रह एरवीपेक्षा पृथ्वीच्या जवळ असतो. त्यामुळे तेजस्वी दिसतो. शनीच्या कडय़ांची पृथ्वीसापेक्ष स्थिती अनुकूल असेल तर तेजस्वितेत अधिक भर पडते.
गेल्याच महिन्यात शनी-सूर्य प्रतियुती होऊन गेली, त्यामुळे मे अखेरीस वा जूनच्या सुरुवातीसही शनी ग्रह पाहता येईल. संध्याकाळपासून पहाटे ३ ते ४ वाजेपर्यंत शनी दक्षिण आकाशात दिसेल. मे महिन्याच्या शेवटच्या दिवशी रात्री साडेदहाच्या सुमारास आकाशमध्याजवळ थेट दक्षिणेला तो सुमारे ६० अंश उंचीवर दिसेल. शनी ग्रह अनेक बाबतींत वैशिष्टय़पूर्ण आहे. नुसत्या डोळ्यांनी दिसणारा तो सर्वात दूरचा ग्रह आहे. सूर्य-पृथ्वी अंतराच्या साधारण साडेनऊ पट अंतरावर असल्याने त्याचे िबब खूप लहान म्हणजे १६ ते १७ विकलांचे असले तरी डोळ्यांनी शनी दिसायला काहीच अडचण नाही. सूर्यापासून दूर असल्यामुळे सूर्याभोवती तो अतिशय कमी वेगाने प्रदक्षिणा घालतो. तरीही त्याचा परिभ्रमणाचा वेग सेकंदाला ९ ते १० कि.मी.च्या आसपास आहे.
शनी ग्रहाच्या विषुववृत्तावर साधारण ९ पृथ्वीगोल एकापुढे एक बसतील, पण उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवापर्यंतच्या अक्षावर आठच पृथ्वीगोल मावतील. याचाच अर्थ असा की शनी ग्रह चेंडूसारखा संपूर्ण गोलाकार नाही.
विषुववृत्तावर शनीचा चेंडू फुगीर आणि ध्रुवांकडे चपटा आहे. सर्व ग्रहांत शनी ग्रह जास्त चपटा आहे. शनीचे वस्तुमान पृथ्वीच्या ९५ पट असले तरी शनी ग्रहाची घनता कमी आहे. शनी ग्रहाची घनता पाण्याच्या घनतेपेक्षाही कमी असल्यामुळे शनी ग्रह एखाद्या हौदातील पाण्यात तरंगत राहील. ज्याच्या उपग्रहावर वातावरण आहे, असा शनी हा एकमेव ग्रह आहे. शनीच्या टायटन या उपग्रहावर वातावरण आहे. २००४ मध्ये ह्युजेन्स हे मानवनिर्मित यान टायटनवर उतरले. म्हणजे पृथ्वीच्या उपग्रहाखेरीज अन्य ग्रहाच्या उपग्रहावर यान उतरण्याचा मानही शनीनेच पटकाविला. शनीची कडी २००९ च्या दरम्यान दिसेनाशी झाली होती. पण आता हळू हळू शनीच्या कडय़ांची उत्तर बाजू पृथ्वीवरून दिसू लागेल. २०१७ पर्यंत अशा तऱ्हेने शनीच्या कडय़ांचे विलोभनीय दर्शन दिवसेंदिवस अनुकूल होत जाईल. तेव्हा शनीने वृश्चिक राशीपर्यंत मजल मारलेली असेल. अर्थात् शनी आणि त्याची कडी यांचे विलोभनीय दर्शन दुर्बणिीशिवाय घेता येणार नाही, तेव्हा निरीक्षणासाठी दुर्बीण (telescope) हवीच.
नभांगणाचे वैभव : शनीची कडी
दिमाखदार कडय़ांनी सुरेख दिसणारा ग्रह म्हणजे शनी. (इतर काही ग्रहांना कडी असली तरी ती इतकी विलोभनीय नाहीत.) १६१० मध्ये गॅलिलिओने शनीचे निरीक्षण दुर्बणितून केले. ह्युजेन्स नामक खगोलविदाने १६५५ मध्ये शनीचे निरीक्षण करून शनी ग्रह सुंदर कडय़ांनी वेढलेला आहे हे प्रथम सांगितले. साधारण ३७८ दिवसांच्या अंतराने पृथ्वीच्या एका बाजूस शनी तर विरुद्ध बाजूस सूर्य अशी स्थिती येते.
First published on: 26-05-2013 at 12:13 IST
मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saturn