|| डॉ. नंदा हरम
‘‘आई, तिकडे बघ ना! किती छान हिरवळ आहे. जाऊ या ना तिकडे खेळायला.’’
‘‘अरे, आभास! तिकडे हिरवळ नाही, पाणी आहे.’’
‘‘काहीतरीच तुझं ’’
‘‘बाळा, विश्वास नाही का माझ्यावर.’’
‘‘तुला कंटाळा आला म्हणून तू असं म्हणत्येस, खरं ना?’’
‘‘बरं चल. हातच्या काकणाला आरसा कशाला?’’
‘‘म्हणजे काय गं आई?’’
‘‘आभास, तिथे गेल्यावर तुझी खात्री होईल. तू स्वत:च बघ म्हणजे पटेल तुला. मी पटवून देण्याची गरज नाही.’’
‘‘ संध्या जाऊन येतो गं आम्ही..’’
‘‘आभास, ये बघ. काय आहे तिथे?’’
‘‘आई, फुलं असलेली झाडं आहेत. त्याची पानं बघ कशी जाड आहेत. आणि हो, ही सारी पाण्यात उगवली आहेत. म्हणजे हे तळं आहे. पण या पानांनी पूर्ण झाकून टाकलंय.’’
‘‘पटलं ना आता.’’
‘‘ हो आई, सॉरी हं! तुझी म्हणही पटली. याचं नाव काय गं?’’
‘‘याला जलपर्णी म्हणतात. हे झाड मूळ दक्षिण अमेरिकेतील आहे. याची वाढ झपाटय़ाने होते. दोन आठवडय़ांत त्यांची संख्या दुप्पट होते.’’
‘‘मग चांगलंच आहे ना!’’
‘‘नाही, आभास! ही झाडं दुसऱ्या देशातली असल्यामुळे इथे त्यांना संसर्ग होत नाही. आपली झाडं त्यामुळे नीट वाढत नाहीत.’’
‘‘पण आई, ही फुलं किती छान दिसतात.’’
‘‘ते खरं, पण याचा त्रासच खूप आहे. या जलपर्णीच्या मुळांचं जाळं तयार झालं की पाण्याच्या प्रवाहात अडथळे निर्माण होतात. सूर्यप्रकाश खोलवर न पोचल्यामुळे इतर पाणवनस्पतींची वाढ होत नाही. पाण्यातील ऑक्सिजन कमी झाल्यामुळे मासे मरतात. मुख्य म्हणजे डासांची उत्पत्ती खूप होते.’’
‘‘बाप रे! म्हणजे आई, त्रासच खूप आहे.’’
‘‘हो, पण त्यावर उपाय शोधलाय. तळी स्वच्छ करण्याकरिता जलपर्णी काढावीच लागते. त्याचा खर्चही खूप येतो. म्हणून त्यावर संशोधन करून त्याचे उपयोग शोधून काढलेत.’’
‘‘ते कोणते?’’
‘‘त्याच्या खोडापासून तंतू तयार करून बॅग्ज, टोप्या, फुलदाण्या अशा शोभेच्या वस्तू बनवता येतात. झाडाचे खोड, पानं वापरून चांगलं सेंद्रिय खत तयार होतं. त्याच्या लगद्यापासून वापरून फेकायच्या प्लेटस् करता येतात.’’
‘‘व्वा! मस्तच! पण आई, वरून दहाव्या मजल्यावरून बघताना चांगलंच फसायला झालं. बरं झालं आपण खाली आलो. तुझ्या म्हणीचा अर्थ मला शंभर टक्के कळला.’’
nandaharam2012@gmail.com