नक्षत्राला मोठी झाल्यावर लेखिका व्हायचंय. तिला वाचनाचीही खूप आवड आहे. आपल्या ‘बालमैफल’मध्ये श्रीपाददादाने सांगितलेली ‘एक होता काव्‍‌र्हर’ आणि ‘द बुक ऑफ इंडियन बर्ड्स’ ही पुस्तकंसुद्धा तिने लगेच वाचून काढली. मराठी, इंग्लिश, हिंदी अशा तिन्ही भाषांमधली पुस्तकं वाचताना तिला नेहमी वाटतं, की ही सगळी लेखक मंडळी किती सुंदर शब्दांत एखादी गोष्टीमांडतात. एकाच शब्दाचे किती वेगवेगळे पर्याय त्यांना माहीत असतात. ‘चांगलं लिहायचं असेल, चांगलं बोलायचं असेल तर आपला शब्दसंग्रह उत्तम हवा,’ असं तिची आजी तिला नेहमी सांगते. तसा नक्षत्राचा शब्दसंग्रह चांगला आहे. शाळेतली शब्दकोडय़ाची स्पर्धाही तिने या वर्षी जिंकली. पण तिला वाटतंय की, आपला शब्दसंग्रह आणखी वाढायला हवा. त्यासाठी अजून काय करता येईल अशा विचारात ती असतानाच शब्दकोडय़ाची स्पर्धा जिंकल्याचं बक्षीस म्हणून तिच्या मावशीने तिला ‘स्क्रॅबल’ हा खेळ आणून दिला.
नक्षत्राने तिचं गिफ्ट उघडून बघितलं. त्यात उभे-आडवे चौकोन असलेला एक बोर्ड होता. लाकडाचे छोटे छोटे चौकोनी ठोकळे होते. त्यांच्यावर एकेक कॅपिटल लेटर होतं आणि बाजूला उजव्या कोपऱ्यात एकेक अंकही होता. नक्षत्राच्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह बघून मावशीने सांगायला सुरुवात केली, ‘स्क्रॅबल खेळायला दोन किंवा चार जण लागतात. हे छोटे छोटे चौकोनी ठोकळे आहेत ना ते लाकडाचे किंवा प्लास्टिकचेही असतात. त्यांना टाइल्स म्हणतात. अशा शंभर टाइल्स असतात. आता या टाइल्सवर जी कॅपिटल लेटर्स लिहिली आहेत ती वापरून आपण वेगवेगळे शब्द स्क्रॅबल बोर्डवर तयार करायचे. शब्दकोडं असतं तसाच स्क्रॅबल आपण खेळू शकतो. म्हणजे, मी जर एखादा शब्द तयार केला तर त्यातलंच एखादं अक्षर वापरलं जाईल अशा पद्धतीने तू तुझा शब्द तयार करायचा. या टाइल्सवर बाजूला अगदी छोटय़ा आकारात जे आकडे लिहिलेले आहेत ना, ते त्या लेटर्सचे पॉइंट्स आहेत. बरोबर आलेल्या शब्दासाठी त्या त्या अक्षराचे पॉइंट्स कॅलक्युलेट करायचे. साधारणपणे ‘Q’,‘Z’ या अक्षरांसाठी जास्त पॉइंट्स असतात. नक्षत्राला हळूहळू स्क्रॅबलची बेसिक माहिती समजत होती. मावशी पुढे म्हणाली, ‘‘स्क्रॅबल खेळताना या टाइल्स पिशवीत भरून ठेवायच्या आणि न बघता सात टाइल्स काढायच्या. त्या प्रत्येकाने आपल्यासमोर ठेवायच्या आणि खेळाला सुरुवात करायची. त्या बाहेर काढलेल्या टाइल्स वापरूनच शब्द तयार करायचे. गरज वाटली तर आपल्या काही टाइल्स आपण बदलून घेऊ शकतो, पण त्याचेही काही नियम असतात. स्क्रॅबल खेळताना नेहमी बोर्डच्या मध्यभागी असलेल्या चौकोनापासून सुरुवात करायची.’’
‘‘बापरे! फारच कठीण नियम आहेत की! खरं सांगू मावशी, मला तर काही काही गोष्टी जरा बाउन्सरच गेल्या!’’ नक्षत्रा म्हणाली. मावशीच्याही ते लक्षात आलं होतं. ती म्हणाली, ‘‘डोंट वरी. एकदा हा खेळ खेळायला लागलीस की समजेल तुला हळूहळू. अगं खरं तर स्क्रॅबलचे नियम बरेच कडक असतात. स्क्रॅबल खेळण्यासाठी एक खास डिक्शनरीसुद्धा असते. तुम्ही तयार केलेला शब्द त्या डिक्शनरीत असेल तरच तो ग्रा मानला जातो, असं बरंच काय काय असतं. पण आपण आपल्या सोयीनुसार थोडाफार बदल करूनही खेळू शकतो. तुला अगदीच जाणून घ्यायचं असेल तर इंटरनेटवर ‘ ‘how to play scrabble’ असं टाइप कर आणि सर्च कर.’’ नक्षत्राने मान डोलावली आणि म्हणाली, ‘‘ज्याने या खेळाचा शोध लावला त्याचं डोकं काय अफाट असेल ना!’’
मावशी म्हणाली, ‘‘अगदी खरंय! आल्फ्रेड बट नावाच्या एका आर्किटेक्टने १९३०च्या दशकात वेगवेगळ्या खेळांची निर्मिती केली. १९२९ मध्ये अमेरिकेतल्या ग्रेट डिप्रेशनमुळे लोक निराश, बेकार झाले होते. तेव्हा त्यांना उभारी देण्यासाठी जे खेळ त्याने बनवले त्यात हा शब्दखेळही होता. सुरुवातीला लेक्सिको, क्रिसक्रॉसवर्डस अशा स्वरूपात खेळला जाणारा शब्दखेळ नंतरच्या काळात व्यवस्थितपणे आणखी अभ्यासपूर्ण पद्धतीने डिझाइन करून स्क्रॅबल म्हणून लोकांपुढे सादर झाला. तू म्हणालीस त्याप्रमाणे आल्फ्रेड बटची बुद्धिमत्ता नक्कीच अफाट आहे. कारण हा खेळ पहिल्यांदा तयार केल्यापासून ते आजतागायत त्यात फारसे बदल करावे लागले नाहीत. पण का कोण जाणे, सुरुवातीच्या काळात स्क्रॅबलला फारशी लोकप्रियता मिळाली नव्हती. पुढे पन्नासच्या दशकात मेसीज् कंपनीच्या अध्यक्षांनी हा खेळ सुट्टीत खेळला. त्यांना तो इतका आवडला की आपल्या दुकानासाठी त्यांनी स्क्रॅबलची मोठी ऑर्डर नोंदवली. त्यानंतर मात्र तो खूपच लोकप्रिय झाला; इतका की नंतरच्या काळात स्क्रॅबलच्या टुर्नामेंट्ससुद्धा भरवल्या जायला लागल्या! फक्त इंग्लिशच नाही तर इतर २९ भाषांमध्येही स्क्रॅबल मिळतो आणि आता तर स्क्रॅबलची डिजिटल व्हर्जन्ससुद्धा उपलब्ध आहेत.’’
मावशीचं बोलणं ऐकून नक्षत्रा चांगलीच इम्प्रेस झाली. आता ती वेळात वेळ काढून स्क्रॅबल खेळणार आहे आणि आपली शब्दसंपदा वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्हीही जरूर करा!
अंजली कुलकर्णी-शेवडे – anjalicoolkarni@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा