‘तुझा आवडता प्राणी कुठला? आणि आवडता पक्षी?’
मला माहित्येय की तुला अशा प्रश्नांची सवय आहे. त्यावर उत्तरंही ठरलेली असणार. पृथ्वीवर इतका अथांग महासागर असताना आपल्याला कुणीच विचारत नाही की ‘तुझा आवडता मासा कुठला?’
पोटलीबाबाला विचारशील तर पोटात येणारे सर्वच मासे मला आवडतात. हे मासे आकाराने छोटे असतात. पण मित्रा, महासागराच्या पोटात असणारे मासे खूपच मोठे असतात. सर्वात मोठा मासा कुठला? येस्स, तुझं उत्तर बरोबर आहे. माशात मासा देवमासा.. म्हणजेच व्हेल.. आणि आजच्या ‘वेलू महासागर में’ पुस्तकातला ‘वेलू.’ एक पिल्लू व्हेल मासा.
मूळ स्वीडनच्या ओपल प्रकाशनाची ही हिंदी आवृत्ती भारतीय ए अँड ए बुक्सद्वारे प्रकाशित झाली. लेखक, चित्रकार लेनार्ट एंग. हा माझा चुलत मित्राचा लांबचा मावस दोस्त असल्यामुळे याच्याबद्दल फार विचारू नकोस.
या पुस्तकात एकाच कथेच्या दोन गोष्टी येतात. एकात वेलू नावाचा एक सज्जन खेळकर व्हेल असतो. हा वेलू उथळ समुद्रामध्ये, खोल महासागरात, खोल खोल महासागरात, थंड महासागरात लाटांवर, लाटांखाली जात असतो. तिथं काय काय करतो, कुणाकुणाला भेटतो त्याची शब्दातून येणारी ही गोष्ट. यात फार काही धम्मालबिमाल घडत नाहीये. पण दुसरी गोष्ट एकदम आकर्षित करते, जी चित्रातून येते.
तू खराखुरा व्हेल पाहिला आहेस? मी पाहिलाय. (पण टीव्हीत). माझ्या अंदाजाने तो एकापुढे एक उभ्या असणाऱ्या ४ बसेस इतका मोठा असू शकतो. मी मोजायला गेलो नाही, पण त्याला ४००० दात असतात म्हणे!
एक तर असा अवाढव्य व्हेल छोटय़ाशा पुस्तकात बसवलाय. त्यात तो राहतो विशाल महासागरात. हा महासागर, लहान मासे आणि मोठा वेलू बोलताना एकत्र एकाच पानावर एकत्र दाखवणं मला तरी जाम कठीण वाटतं.
सोबतच्या चित्रात त्याच्या रचना पाहा.
पूर्ण पुस्तक पारदर्शक जलरंगात रंगवलं आहे. असेही जलरंगात खूप पाणी वापरलं जातं. पाण्याने वेढलेलं पानन्पान ९८% निळय़ा रंगाने रंगवलेलं आहे. पुस्तकात रंगाच्या अनेक शेड्स (छटा) आपल्याला पाहताना भर उन्हाळय़ात डोळे पोहायला लागतात.
महासागराच्या अनेक अवस्था, खोली, उंची दाखवण्यासाठी या शेड्स मदतीला येतात.
वेलू समुद्राच्या लाटांशी खेळतो त्याचे चित्रण तर लाजवाब झालेले आहे. चित्रकाराने यासाठी किमान एक महिना समुद्रकिनारी जाऊन त्याचे निरीक्षण केले असणार. ‘मित्रा, तूही इतका वेळ निरीक्षण करशील, तर इतकंच चांगलं रंगवशील,’ असा पोटलीबाबाचा खास कानमंत्र आहे.
असो. वेलू माशाची शांतता शरीरातून तर वेलूचा आनंदी आणि सज्जनपणा त्याच्या डोळय़ातून दाखवला आहे.
रंगाने संपूर्ण काळा, टोकदार दातांची माळ असणारा, एकूण बेढब आणि अगडबंब असा वेलू आपल्याला कुठेच भीतीदायक वाटत नाही. असं वाटतं, समुद्रात असतो तर वेलू आपला दोस्त बनला असता. ही कमाल चित्रकाराची!
चित्रात एखादी मोठी गोष्ट कशापेक्षा तरी छोटी आणि छोटी गोष्ट कशापेक्षा तरी मोठी काढण्यासाठी कागदावरच्या स्पेसचा विचार करावा लागतो. स्पेसमुळे आपल्याला आकार कळतो. हे आकार कळवणारीच ही दुसरी चित्रगोष्ट!
आता एक मोठा आणि एक छोटा प्राणी यांना एकत्र करून काही चित्र काढून पाहशील का? मित्रा, उचल पेन्सिल आणि रंग. एक मोठा खेकडा अन् छोटी कोळंबी ही जोडी कशी वाटते? खाऊन बघ.. सॉरी काढून बघ!