बालमित्रांनो, तुम्हाला समुद्राच्या विविध पैलूंच्या शोधसफरीवर घेऊन जाणारं सदर.

हॅलो मित्रांनो. आजपासून मी तुमच्यासोबत आपल्या ग्रहाच्या- पृथ्वीच्या निळ्या रंगाविषयी बोलणार आहे. तुम्हाला हे ठाऊक आहे का, की आपला ग्रह अवकाशामधून निळाशार दिसतो? अथांग पसरलेल्या महासागरांमुळे आपला ग्रह निळा दिसतो. आपल्या ग्रहावर तब्बल ७१ टक्के जागा महासागरांनी व्यापलेली आहे. महासागर म्हणजे केवळ खाऱ्या पाण्याचा निरुपयोगी साठा असंच तुम्हाला वाटलं असेल. मात्र दोस्तांनो, ती आपल्या जगण्याची एक मूलभूत गरज आहे बरं का! महासागरांचा हा साठा आपल्याला अन्न, प्राणवायू पुरवतोच; शिवाय तुम्ही पुस्तकांत शिकलेलं पर्जन्यचक्र चालू राहून आपल्याला पाऊस मिळतो. समुद्र आनंद देतो; सौंदर्यात भर घालतो.

माझ्या छोटय़ा दोस्तांनो, आजपासून समुद्राच्या विविध पैलूंच्या शोधसफरीवर निघण्याकरता सज्ज व्हा.

महासागराच्या भूगोलापासूनच सुरुवात करू या. पूथ्वीवरील महासागर पाच प्रादेशिक महासागरांमध्ये विभागलेले आहेत – भारतीय, अटलांटिक, पॅसिफिक आक्र्टिक, आणि दक्षिण महासागर. या महासागरांच्या छोटय़ा भागांना समुद्रदेखील म्हणतात, जसा आपला अरबी समुद्र. जपानच्या किनाऱ्याजवळील मारिआना खंदक ही पृथ्वीवरील महासागरांतली सर्वात खोल जागा आहे. किती खोल आहे ठाऊक आहे? तब्बल ११ किलोमीटर खोल. शिवाय, महासागराच्या पोटामध्ये उंचच उंच पर्वतदेखील दडलेले आहे. पृथ्वीवरील सर्वात उंच, माउंट एव्हरेस्ट शिखरापेक्षाही उंच असं मौना की हे पर्वतशिखर तब्बल १०.२ किलोमीटर उंच आहे.

ऋषिकेश चव्हाण rushikeshc@gmail.com

शब्दांकन : श्रीपाद