बालमित्रांनो, आपण मागच्या वेळी झाडांकडे असणाऱ्या संरक्षक आयुधांची माहिती घेतली. त्या वेळी आपण काही झाडांची उदाहरणेदेखील पाहिली होती. अर्थात, आपणही काही निरीक्षणे केली असतील तर ती जास्त महत्त्वाची आहेत. परंतु केवळ झाडांमधून मिळणारा िडख हे एवढेच आयुध आहे असे नव्हे बरं का? काही bal05झाडांकडे अगदी संरक्षणाची म्हणण्यापेक्षा आक्रमण करण्याचीही आयुधे असतात. फक्त ती आपल्याला सहज दिसून येत नाहीत. काही झाडे एवढय़ा मोठय़ा झुंडीने वाढतात की बघता बघता त्या भागातील बाकीच्या वनस्पती ह्या हळूहळू कमी होण्यास सुरुवात होते.
उदाहरणादाखल आपल्याकडच्या गाजरगवत या झाडाकडे पाहू या. आपल्यापकी बहुतेकांना माहीत असेल की रस्त्यांच्या कडेला ही वनस्पती सहजगत्या आढळून येते. विशेषत: ग्रामीण भागांमध्ये सर्व शेतांच्या आजूबाजूला याचे प्रमाण फारच मोठे आहे.
अर्थात, दहा वर्षांपूर्वी हे प्रमाण अधिक होते व सध्या या वनस्पतींचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून येत आहे. हे झाड खरे तर मूळचे आपल्याकडचे नाही. परंतु जेव्हा भारताने परदेशातून १९७०च्या दशकात गहू विकत घेतला तेव्हा त्याबरोबर या झाडाचा प्रवेश भारतात झाला व अक्षरश: सगळीकडे अत्यंत वेगाने पसरले गेले. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे या झाडामध्ये असलेली विशिष्ट प्रकारची रसायने होत. या वैशिष्टय़ामुळे सुरुवातीच्या काळात त्याच्या आजूबाजूला येणारी झाडे एकाएकी कमी होऊ लागली व केवळ या गाजरगवत झाडाचेच साम्राज्य सर्वत्र पसरले. अर्थात, हे केवळ त्या झाडाकडे असणाऱ्या या ताकदवर रसायनांमुळे. यामुळेच ही झाडे जनावरे खाऊ शकत नाहीत. याला अत्यंत उग्र असा वास असतो. परंतु अनेक वर्षांनंतर गेल्या दशकापासून या छोटय़ा झाडांची संख्या कमी होताना दिसत आहे. यासारखी आणखीही काही झाडे अशा आयुधांनी युक्त आहेत, ज्यामुळे ती वेगाने पसरत जातात व ती झाडे आपल्या आजूबाजूस अन्य कोणत्याही झाडास येऊ देत नाहीत. तुम्ही उंदीरमार या झाडाबद्दल ऐकले आहे का? इंग्रजीमध्ये यास ग्लिरिसीडिया असे संबोधले जाते. खरे तर हे झाड झपाटय़ाने वाढते व उन्हाळ्याच्या सुमारास त्याला पांढरी किंवा गुलाबी फुले येतात. याच्या मुळांमध्ये विषारी द्रव्य असल्याने ही झाडे उंदरांना मारक असतात. परंतु ही झाडे वाढत असताना त्याच्या जवळपास इतर कोणतीही झाडे येत नाहीत. याच प्रकारे आपल्याला चांगल्यापकी माहीत असलेले एरंडाचे झाड आहे. याचे वैशिष्टय़ म्हणजे या झाडाच्या लागवडीमुळे शेतात उंदीर-घुशींचे प्रमाण कमी होण्यास फार मदत होते. याच्या मुळांमध्ये असलेल्या रासायनिक द्रव्यांमुळे हे सहज घडून येते. फक्त ही झाडे अन्य झाडांच्या वाढीस प्रतिबंध करीत नाहीत. आहे की नाही मजेशीर माहिती!
याशिवाय आपण कीटकभक्षी वनस्पतीबद्दलही ऐकले असेलच. अगदी महाराष्ट्राच्या बाबतीत विचार करावयाचा झाला तर आपल्याकडे Drosera indica ही अगदी छोटी वनस्पती आढळून येते. जेमतेम ३-१० सें.मी. उंची असणारी व गुलाबी रंगाची फुले येणारी ही वनस्पती अगदी छोटे कीटक सहजगत्या पकडून खाऊ शकते. यासाठी त्यांच्याकडे विशेष प्रकारची रसायने व अवयव असतात, ज्यामुळे छोटे कीटक त्यांना धरून ठेवता येतात.
खरे तर आपल्या आजूबाजूस अशा अनेक वनस्पती किंवा प्राणी असतात ज्यांमध्ये अशी वैशिष्टय़े आढळून येतात. परंतु आपणास ती कधी जाणवतच नाहीत. यासाठी आपणास सहजगत्या करता येणारा प्रयोग म्हणजे, आपल्या भागामध्ये फार मोठय़ा प्रमाणात कोणती झाडे किंवा वृक्ष आहेत याची माहिती घ्या व त्याच्याभोवती अन्य वनस्पती आहेत का, हेही जाणून घेण्याचा प्रयत्न करा. यातूनच तुम्हाला नवीन माहिती मिळू शकेल. सध्या पावसाळा आहे. प्रथम पावसानंतर अशा अनेक वैशिष्टय़पूर्ण गोष्टी आपणास निसर्गात पाहावयास मिळणार आहेत. तेव्हा आपण अधिक सजगपणे याकडे पाहण्याचा विचार करू या. पुढच्या लेखात अशाच पावसाळ्याच्या सुरुवातीस येणाऱ्या वनस्पतींमधल्या गमतशीर गोष्टींची माहिती घेऊ या.
डॉ. राहुल मुंगीकर – rahumungi@gmail.com

Story img Loader