उन्हाळ्याचे दिवस आहेत व खूप तहान लागते आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दुष्काळ पडलाय आणि माणसांना व जनावरांना प्यायला आणि शेतीला पाणी नाही. आपली शहरं बेसुमार वाढू दिली आहेत, पाण्याचा अपव्यय केला जातोय व काही पिकांची अशाश्वत पद्धतीने शेती केली जातेय. पण तुम्ही म्हणाल की शाळेत जाणारी मुलं या बाबतीत काय करू शकतात? पण मित्रांनो, आपल्या हातात खूप काही आहे!
पाण्याची बचत व योग्य वापर आपण रोजच्या आयुष्यात करू शकतो. शॉवर किंवा टबमध्ये आंघोळ करण्यापेक्षा बादलीभर पाण्यात करावी. घरी, शाळेत किंवा रेस्टॉरंटमध्ये हवं असेल तितकंच पाणी आपल्या पेल्यात घ्यावं. बाहेरून आल्यावर बाटलीतलं उरलेलं पाणी झाडांना किंवा घासायच्या भांडय़ांवर टाकावं. शौचालयात गरज असेल तेव्हाच फ्लश ओढावा. अन्य वेळेला बादलीने पाणी ओतावं. रिसॉर्टवर जाऊन रेनडान्समध्ये किंवा वॉटर पार्कमध्येसुद्धा पाण्याची नासाडी टाळली पाहिजे.
बाहेर जाताना प्रत्येकाने घरातून एक बाटली पाणी सोबत घेतलं तर मिनरल वॉटरची बाटली घ्यावी लागणार नाही. ग्रामीण भागात अशा बाटल्या भरण्याच्या कारखान्यांत जमिनीतील पाणी प्रचंड प्रमाणात कूपनलिकेतून काढून घेतलं जातं. त्यामुळे विहिरी, तळी, नद्या व शेतांत पाण्याची पातळी घटते. अशाच प्रकारे बाहेरील बाटलीबंद शीतपेये जमिनीतून खूप पाणी उपसून बनवली जातात. त्यापेक्षा आपलं नारळपाणी किंवा कोकम, आवळा, करवंद, कैरी व वाळा अशी सरबतं तब्येतीला आणि पर्यावरणाला लाभदायक असतात.
पावसाळ्यात गच्चीवर व छपरावर पडणारं पाणी आपण साठवू शकलो तर अनेक घरगुती कामांकरता त्याचा वापर होऊ शकतो. तसंच जमिनीवर पडणारं पाणी आत मुरणं आवश्यक आहे. त्यामुळे विहिरी, तळी व नद्यांत पाणी जमा होतं. त्याकरता शहरांतसुद्धा मातीची जमीन राखणं गरजेचं आहे. त्यावर सगळीकडे सिमेंट, डांबर किंवा पेव्हर ब्लॉक लावू नयेत, असं आपल्या आई-बाबांना सांगा.
पाण्याची बचत करण्याबरोबरच पाण्याच्या स्र्रोतांचं रक्षण करणं आवश्यक आहे. आपण घरी वापरात असलेला डिर्टजट सांडपाण्यासोबत नद्या, तळी व जमिनीखालील पाण्यात मिसळून ते प्रदूषित करतो. त्याऐवजी रिठय़ाची पूड आपले कपडे तितकेच पांढरेशुभ्र करू शकते! निर्माल्य नदीत सोडताना सोबत प्लास्टिक पिशवी टाकू नये. सर्वात उत्तम म्हणजे निर्माल्य मातीत गाडून खत करावं. प्रवास करताना नद्या व तळ्यांत कोणताही कचरा टाकू नये.
आपण आत्तापासूनच पाण्याचं संवर्धन केलं तरच भविष्यात तहान लागेल तेव्हा आपल्याला पाणी मिळेल.