समुद्रात खोलवर निळ्याशार पाण्यात छोटी जलपरी आपल्या आईवडिलांबरोबर राहत असे. ती दिसायला अतिशय सुरेख होती. निळे डोळे, गुलाबाच्या पाकळ्यांसारखे गुलाबी गाल आणि लांबसडक सोनेरी केस. तिच्या शेपटीवरचे खवले तर एखाद्या रत्नजडित दागिन्यासारखे दिसत. तिची आई तिला रोज वेगवेगळ्या गोष्टी सांगे, पण तिला मात्र समुद्राबाहेरच्या जगातल्या गोष्टी ऐकायला आवडत. आई तिला म्हणायची,‘‘पंधरा वर्षांची झालीस की एकटी समुद्रावरती जा आणि आपल्या स्वत:च्या डोळ्यांनी ते सारं जग बघ.’’ ते ऐकून कधी एकदा ते सगळं बघायला मिळतं असं तिला झालं होतं. ज्या पंधराव्या वाढदिवसाची ती अगदी मनापासून वाट बघत होती तो दिवस उजाडला. आईनं तिला समुद्रावर जायची परवानगी दिली; पण जाताना बजावलं की ‘‘कितीही प्रलोभनं असली तरी जमिनीवर जाऊ नकोस. आपण समुद्राच्या मुली आहोत आणि समुद्र हेच आपलं जग आहे.’’
आईनं सांगितलेलं लक्षात ठेवून छोटी जलपरी अगदी खुशीत आपली चमचमणारी शेपटी हलवत समुद्रावरती येऊन पोहोचली. प्रथम तिला आजूबाजूला पाणी सोडून काहीच दिसले नाही, पण मग दूरवर हिरवी झाडं, जमीन आणि काही जहाजं दिसली. ती सपासप पोहत जमिनीकडे निघाली व समुद्राकाठच्या पाण्यात एका दगडाशेजारी जाऊन बसली. आजूबाजूला दिसणारं सगळं इतकं सुंदर होतं की तिला काय बघू आणि काय नको असं झालं.
आकाशात सूर्य तळपत होता. त्याची सोनेरी किरणं पाण्यावर पडली होती आणि ती लाटांबरोबर हलत होती. लहान मुलं वाळूत खेळत होती, पक्षी आकाशात इकडून तिकडे उडत होते, वारा सुटला होता आणि त्याच्या तालावर नारळाची झाडं डोलत होती. समुद्राची गाज, पक्ष्यांची किलबिल, वाऱ्याचा आवाज, माणसांचं बोलणं असे कधी न ऐकलेले आवाज तिच्या कानावर पडत होते. छोटी जलपरी हे सगळं आश्चर्यानं बघतच राहिली.
असा बराच वेळ गेला. सूर्य पश्चिमेकडे झुकू लागला, निळं आकाश काळसर व्हायला लागलं, सूर्य दिसेनासा झाला आणि आकाशात चंद्राचं राज्य सुरू झालं. चंद्र जलपरीचं सौंदर्य बघतच राहिला.
लुकलुकणाऱ्या असंख्य चांदण्या इकडून तिकडे पळत होत्या. त्यासुद्धा जलपरीचं रूप आणि तिची चमचमणारी शेपटी बघून आश्चर्यचकित झाल्या. चांदण्या तिच्याकडे बघून हसल्या आणि तिला आपल्याशी खेळायला आकाशात बोलावू लागल्या. जलपरीला त्या चांदण्यांशी खेळावंसं वाटू लागलं; पण त्याच वेळी तिला आपल्या आईचे शब्द आठवले. तिच्या लक्षात आलं की, आपण जशा समुद्राच्या मुली आहोत आणि आपलं जसं समुद्र हेच घर आहे तसंच या चांदण्या आकाशाच्या मुली आहेत. ते आकाशच त्यांचं घर आहे. आपण जसे आकाशात जाऊ शकत नाही तसंच त्या समुद्रात येऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्याशी खेळता येणार नाही, पण त्यांच्याकडून आकाशातल्या गमतीजमती नक्कीच ऐकायला मिळतील.
जलपरीनं आनंदानं हात हलवून चंद्राचा व चांदण्यांचा निरोप घेतला व पोहत पोहत समुद्राच्या तळाशी आपल्या घरी गेली. ती दिवसभर इतकी दमली होती की आईला सगळं सांगता सांगताच गाढ झोपून गेली.
त्या रात्री तिच्या स्वप्नातदेखील सूर्य, चंद्र आणि चांदण्याच आल्या.
(डॅनिश कथेवर आधारित)
छोटी जलपरी
समुद्रात खोलवर निळ्याशार पाण्यात छोटी जलपरी आपल्या आईवडिलांबरोबर राहत असे. ती दिसायला अतिशय सुरेख होती. निळे डोळे, गुलाबाच्या पाकळ्यांसारखे गुलाबी गाल आणि लांबसडक सोनेरी केस.
आणखी वाचा
First published on: 18-11-2012 at 05:04 IST
मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Small mermaid