फार फार वर्षांपूर्वी बिचाऱ्या वासुकी नागाला पर्वतावर गुंडाळून घुसळल्याने १४ रत्ने तयार झाली असे म्हणतात. आत्ता असे कोणी केले तर प्राणिमित्र त्याच्यावर खटला भरतील. पण सापाला, नागाला पाहून आपली जामच टरकते. आणि जगभरात सर्वाचीच टरकते. कारण त्याचे विषारी असणे! सगळेच साप विषारी नसतात हे माहीत असले तरी आपली टरकते. आणि हा वारसा आपल्या पालकांकडून आपल्याला येतो. पण आपला चित्रवारसा मात्र असा नाही. साप-नाग विषारी असले तरी सुंदर असतात. टॅटू करून घेणाऱ्या सर्वाचा तो आवडता आहे.
जिवा सोमा मशे या वारली चित्रकाराने जमिनीच्या आतून (बिळातून) डोकावणारा साप काढलाय. त्याच्याच जवळ असणारी मिथिला शैली. त्यात सर्पकुटुंब दाखवलंय. पण पाहताना ते झाडाचे खोडदेखील वाटते. आणि सापदेखील दिसतात. साधारण दिसायला सारखे अशा ऑस्ट्रेलियन अबोरिजनल (आदिवासी) कलेत असलेला हा अजगर. त्यावरचे ठिपके ही या शैलीची खासियत.
भारतात अनेक लघुचित्र कालियामर्दन आणि कृष्णाची आहेत. दक्षिण भारतातील गावात, खेडय़ात चौकाचौकांत साप/ नाग/ पंचमुखी नागाची फूट-तीन फूट उंच शिल्पे आहेत.
जपानी चित्रांत झाडाच्या फांदीवर असलेला सफेद साप असो की मोठाल्या सापाशी लढणारा जपानी कृष्णावतार! या सर्व चित्रांत साप हा महत्त्वाचा विषय होता. चिनी चित्रकलेतील कात टाकून नवे आयुष्य सुरू केलेला हा साप फारच वेगळ्या स्थितीतील ठरलाय. अशा प्रकारचे हे बहुदा एकमेव चित्र असावे.
छोटय़ा दोस्तांनो, आपण या सदरात खूप वेगवेगळे प्राणी वेगवेगळ्या चित्रांत/ रूपात पाहिले. काही छोटय़ा दोस्तांनी ते करूनही पाहिले. या वर्षांतला आणि जीवचित्र या सदरातील हा शेवटचा लेख. चित्रांशी संवाद करायला तुम्ही सुरुवात केली असेलच.
वर्ष संपले तरी पुढे हा संवाद असाच चालू राहील. फार तर सापासारखी केवळ विषयाची कातच टाकायची आहे. नवा विषय घेऊन नव्याने चित्रकलेकडे पाहायचे आहे.
shreeniwas@chitrapatang.in
(समाप्त)