मित्रांनो, सध्या भारतभरात गाय ही खूपच फेमस असली, तरी आपल्या जीवनात गाय फक्त एकदाच येते. तेही निबंध आला तरच! बाकी आपल्याकडे दूधही म्हशीचं येत असल्याने गायीचा संबंध तसा कमीच! मात्र, काही मंदिरांच्या बाहेर तुम्ही गाय प्रत्यक्ष पाहिली असेल. बऱ्याचदा या चॉकलेटी किंवा काळ्या रंगाच्या असतात. गायीमध्ये ३३ कोटी ( कोटी = प्रकारचे) देव असतात, अशी हिंदू धर्मीयांची मान्यता आहे. पण तरीही शेणात हात घालायला बऱ्याच मुलांना, मोठय़ांना आवडत नसतं. पण इंग्रजांच्या काळात या शेणाचा उपयोग इंग्रजांच्या गोऱ्या बायका फेसपॅक म्हणून करायचे हे कोणाला माहीत नसेल. आपल्याकडे गावाकडे आजही अख्खं घर शेणाने सारवतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तर अशा बहुगुणी, आखुडशिंगी गायीचं महत्त्व माणसाला फार आधीच कळलं म्हणून गाय पुजली गेली. बिचाऱ्या बैलाला मात्र नंदी बनून रागीट व भोळ्या शंकराच्या दिमतीला रहावं लागलं आणि इथे शेतात व शर्यतीत घाम गाळावा लागला.

दक्षिण भारतातील तंजोर, तंजावर भागातही एक चित्रप्रकार अस्तित्वात आला. म्हणजे चित्र पाहतोय की मंदिर हेच आपल्याला कळणार नाही. आपण कसं आपल्या मेमरी ड्रॉईंग मध्ये दागिने, मुकुट वगैरे करताना सोनेरी रंग किंवा ग्लिटर, स्पार्कल किंवा पिवळा रंग वापरतो आणि काम चालवून नेतो.

पण तंजावर येथील या चित्रात मात्र दागिन्यांच्या ठिकाणी खरोखर दागिने असतात. सोन्याच्या पापुद्य्राने त्यांना आकार काढतात व त्यावर मौल्यवान रत्ने-खडे चिकटवतात. त्यामुळे ही चित्रं पाहिल्याक्षणीच ओळखली जातात. ही कला फारच महागडी असल्याने केवळ श्रीमंत लोकांनी/मंदिरांनी यात रस घेतला. इथे आपला रंग संपला तरी पालक नवा रंग देतील की नाही ही भीती आणि तंजोरचे चित्रकार सोने-रत्ने घेऊन चित्र काढायचे. केवढा अन्याय आहे आपल्यावर!

नायक, मराठा, युरोपियन कलेचा प्रभाव या चित्रांवर होता. त्यामुळे थोडासा त्रिमितीय आकाराचा भास यात दिसतो. पण काहीसे लघुचित्रांजवळ जाणारे!

या चित्रात कृष्ण, गणेश, सरस्वती वगैरे होत्याच, सरस्वती आली की मोर पण आला.. पण कृष्णाची आवडती लोणी-साय देणारी गाय व हिंदूची धार्मिक आई असल्याने बऱ्याच चित्रांत दिसते. प्रत्यक्षात भारतीय गाय विविध रंगांची असली तरी चित्रात ती शुभ्र पांढऱ्या व हलक्या गुलाबी छटा या रंगाचीच दिसते. हेच सावळ्या कृष्णाचंही! तो चित्रात गोराच होतो. या चित्रात बहुतेक पात्रे गोरीगोमटी असतात व त्यावर सोनेरी दागिने असतात. लग्नसमारंभात काही माणसांना अंगावर खूप सारे दागिने घालून मिरवताना पाहिलं की जसं वाटतं तसंच काही वेळा ही चित्रं बटबटीत प्रकारात मोडतात.

यासोबतच्या चित्रांत दिसतंच आहे. तुम्ही तामिळनाडूत गेलात की तिथल्या संग्रहालयाला भेट देऊन ही जुनी चित्रं पाहू शकता. स्थानिक दुकानात चित्रं विकतही मिळतील. परवडली तर नक्की घ्या. पण नाही परवडली तर मात्र यूटय़ूबवर जाऊन ही चित्रं कशी तयार करतात हे पाहा.

आजचा सराव : या तंजोरच्या चित्रकारांनी बैल, हत्ती, घोडे, गायी, मोर सर्व काढलं, सोन्याने मढविलं.. पण आपला मामा-म्हणजे गणपतीचा उंदीरमामा राहून गेला. त्यामुळे तुम्ही उंदीर काढून त्यावर दागिन्यांची नक्षी काढा. पुढे-मागे सोन्याचे भाव रुपये १ प्रति ग्रॅम झाले की सोनेरी रंगात हे चित्र पूर्ण करा! सध्या सोनेरी रंग वापरू शकता.

श्रीनिवास आगवणे shreeniwas@chitrapatang.in

मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: South indian paintings paintings in south india