छोटय़ा दोस्तांनो, सुप्रभात! आज रविवार सकाळ, म्हणजे शाळेत जायची घाई नाही! पण नुस्तं लोळत पडण्यात काही मजा नाही, बरं का. आपल्या आसपास काही अशी ठिकाणं असतात जिथे सकाळ निसर्गाच्या सान्निध्यात अनुभवता येते, अगदी शहरातसुद्धा! अशी हिरवी बेटं आपल्याला नेहेमीच खुणावत असतात. माझ्या घराजवळ असंच एक ठिकाण आहे जिथे बठी कौलारू घरं आहेत व सभोवती आंबा, उंबर, सुरमाड, असुपालव, जांभुळ, सोनमोहर व नारळासारखी खूप झाडं आहेत. सकाळच्या वेळी या घरांजवळ चूल पेटवलेली असते. त्यातून येणारा थोडासा धूर आणि झाडांच्या पानांमधून डोकावणारी सूर्याची कोवळी तिरपी किरणं असं खूप छान दृश्य दिसतं- एखाद्या चित्रकाराने काढल्यासारखं. शहरात आता फारसा न दिसणारा कोंबडा आपला लालचुटुक तुरा मिरवत थोडय़ा थोडय़ा वेळाने आरवत असतो.
त्या ठिकाणी गेलं की पहिली गोष्ट लक्षात येते ती म्हणजे, आसपास खूप पक्षी आपल्या मंजुळ स्वरात सकाळचं स्वागत करत असतात. कावळे, चिमण्या आणि साळुंक्या नेहेमीप्रमाणे असतातच, पण त्यांच्यासोबत ‘‘टोवीट टोवीट’’ अशी मोठय़ाने शिळ घालणारा चिमणीपेक्षा लहान िशपी आपलं लक्ष सर्वप्रथम वेधून घेतो. जवळच एखाद्या निष्पर्ण फांदीवर काळा चकचकीत कोतवाल चिरक्या आवाजात ओरडत असतो. बहुतेक नाश्त्याकरता एखादा चविष्ट किडा मिळाल्याचा आनंद व्यक्त करत असावा. सहसा न दिसणारा, पण आपल्या ‘‘पुक पुक’’ अशा लयबद्ध आवाजाने लगेच ओळखू येणारा हिरवागार तांबट, सकाळचं शांत वातावरण आणखीनच प्रसन्न करतो.
मधेच ५-६ पोपटांचा एखादा थवा ‘‘चीर चीर’’ करत उडत जातो. मधुर आवाजात बुलबुल साद देत असतात. झाडांवर नवीन आलेल्या पालवीच्या दाटीत काळपट तपकिरी देहाचा व उडताना सोनेरी दिसणाऱ्या पंखांचा भारद्वाज आपल्या धीरगंभीर आवाजाने वातावरण थोडं गूढ बनवतो. इथल्या शाळेत रविवारी सकाळी ध्यानाचे वर्ग भरतात व ओम्काराचा सुखद नाद ऐकला की मन एकदम खूश होतं. नवीन दिवस सुरू झाल्याचा आनंद वाटतो आणि नकळत आपल्या चेहऱ्यावर हास्य उमलतं. अतिशय गोड आवाजात गाणारा पिटुकला नाचण पक्षी पाहिला की मन आनंदून जातं. एव्हाना पोटात कावळे ओरडायला लागलेले असतात. अशा निसर्गरम्य ताज्या आठवणींसोबत घरी जाऊन कोिथबीर पेरलेले खमंग कांदेपोहे खायला जास्तच मजा येते. चला तर मग, तुमच्या घराजवळ अशी एखादी जागा शोधून काढा व आई-बाबांना तिथे घेऊन चला!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा