तीन दिवसांवर येऊन ठेपलेल्या आषाढी एकादशीनिमित्त, शाळेपासून जवळच्या विठ्ठल मंदिरापर्यंत दरवर्षीप्रमाणे पाचवीच्या वर्गासाठी शाळेने ‘दिंडी’चा कार्यक्रम आयोजित केला होता. ग्राउंडवर तिन्ही तुकडय़ांमधील विद्यार्थी जमले होते. बरोबर त्यांच्या वर्गशिक्षिकाही होत्या. मुलांच्या उत्साहाला उधाण आलं होतं. कुणी विठोबा बनलं होतं, कुणी ज्ञानोबा-तुकोबा तर कुणी रुक्मिणी-मुक्ताई. काही मुली नऊवारी साडी नेसून, डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन होत्या. मुलं सदरा-धोतर-उपरणं घालून, खांद्यावर पताका घेऊन, झांजा वाजवत ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ असा जयघोष करीत होती. शाळेचे दोन शिपाई संत ज्ञानेश्वरांची मूर्ती असलेली पालखी त्यांच्या खांद्यांवर घेऊन तयार होते.
सकाळी नऊच्या सुमारास दिंडी मंदिराच्या दिशेने मार्गस्थ झाली आणि अध्र्या तासातच तिथे पोहोचली. मंदिर शंभरएक वर्ष जुनं होतं. आषाढीनिमित्त तिथे जय्यत तयारी सुरू होती. शिक्षकांच्या सूचनांप्रमाणे विद्यार्थ्यांनी विठ्ठलाचं दर्शन घेतलं आणि या अनोख्या ‘बालदिंडी’ला मंदिरातील पुजारी काकांनी सभामंडपात बसायला सांगितलं.
‘‘दिंडी म्हणजे काय? ‘वारकरी’ म्हणजे कोण? कुणी सांगू शकेल?’’ सगळे स्थिरस्थावर झाल्यावर एका शिक्षिकेनं विचारलं. सुरुवातीला कुणीच उत्तर देईना.
‘‘आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातल्या, म्हणजेच पहिल्या एकादशीला येते ती आषाढी एकादशी. त्याच्या काही दिवस आधी टाळ-चिपळ्यांच्या नादात, विठुरायाच्या गजरात, महाराष्ट्रातल्या गावागावांतून भक्तांचे अनेक गट विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेने पायी चालत निघतात. यांना ‘दिंडी’ असं म्हणतात. या दिंडय़ांबरोबर ज्ञानेश्वर, तुकाराम, गोरोबा, चोखोबा, मुक्ताबाई, कान्होपात्रा अशा अनेक संतांच्या पालख्यादेखील निघतात. या सगळ्या दिंडय़ा आणि पालख्यांचं पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाण्याला ‘वारी’ असं म्हणतात. जे यात सहभागी होतात ते ‘वारकरी’!’’ त्या शिक्षिका म्हणाल्या.
एवढय़ात सगळ्यांसाठी प्रसाद घेऊन पुजारी गाभाऱ्यातून बाहेर आले आणि म्हणाले, ‘‘अरे व्वा! वारीसारखे शिस्तीत बसलात की सगळे! या वारीची परंपरा खूप जुनी आहे. संत ज्ञानेश्वरांच्याही आधीपासून, म्हणजे साधारण ८०० वर्षांपूर्वी या वारीची सुरुवात झाली असं म्हणतात.’’ हे ऐकून मुलांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव उमटले.
‘‘मला सांगा, विठ्ठल म्हणजे कोण? विठ्ठला, तूच सांग बरं!’’ विठ्ठल बनलेल्या मुलाला पुजारींनी विचारलं.
‘‘देव!’’ तो सहज म्हणाला. त्याच्या भाबडेपणावर पुजारी मनापासून हसले.
‘‘‘विठ्ठल’ या शब्दाचे दोन भाग आहेत. ‘विट’ म्हणजे वीट आणि ‘ठल’ म्हणजे स्थळ किंवा जागा. अर्थात जो ‘विटेवर उभा’ आहे तो ‘विठ्ठल’. मी तुम्हांला एक गोष्ट सांगतो. पुंडलिक नावाचा विठ्ठलाचा एक भक्त होता. एक दिवस तो आपल्या आई-वडिलांची सेवा करत असताना त्याची परीक्षा घेण्यासाठी विठ्ठल तिथे प्रकट झाले. आपल्या सेवेत खंड पडू नये म्हणून पुंडलिकाने चक्क विठ्ठलालाच उभं राहण्यासाठी एक वीट पुढे केली. पुंडलिकाचा हा सेवाभाव पाहून विठ्ठल प्रसन्न झाले आणि दोन्ही हात कमरेवर ठेवून ते त्या विटेवर उभे राहिले. हे आई-वडिलांच्या सेवेचं महत्त्व!’’ पुजारींनी समजावलं.
‘‘मला माहितीये ही गोष्ट, आजीने सांगितलीये मला!’’ विठ्ठल बनलेला मुलगा उभा राहून, कमरेवर हात ठेवत म्हणाला.
‘‘गेली २८ युगे हा विठ्ठल भक्तांची वाट बघत विटेवर उभा आहे असं मानतात. म्हणूनच आपण ‘युगे अठ्ठावीस विटेवरी उभा..’ ही आरती म्हणतो.’’
‘‘मला अख्खी येते आरती! म्हणू?’’ तो विठ्ठल उत्साहाने म्हणाला. ‘नंतर म्हण’ अशी खूण करत पुजारींनी हसून त्याला खाली बसायला सांगितलं.
‘‘काका, वारीचं महत्त्व इतक्या लहान मुलांना कसं सांगावं?’’ दुसऱ्या वर्गशिक्षिकांनी विचारलं.
‘‘वारी म्हणजे भक्तिभाव! त्याचबरोबर सर्व जाती-धर्मामधील माणसांना एकत्र आणण्याची मोठी शिकवण देते वारी!’’ मुलांना हे समजायला अवघड गेलं. पुजाऱ्यांच्या ते बरोब्बर लक्षात आलं.
‘‘संत ज्ञानेश्वरांच्या काळापासून देवाधर्माच्या नावाखाली काही लोक गोरगरीब, मोलमजुरी करणाऱ्या लोकांवर खूप अन्याय करत होते. जातीभेद होता. हा ब्राह्मण, तो क्षत्रिय, हा कुंभार, तो माळी, हा वरच्या जातीचा, तो खालच्या जातीचा.. अशी माणसांची ओळख असायची.’’
‘‘किती वाईट!’’ पहिल्या रांगेत बसलेली मुक्ताबाई हळहळली.
‘‘वारकरी संप्रदायातील संतांनी त्यांच्या विचारांतून हे बदलण्याचा प्रयत्न केला. जी कामे हलक्या दर्जाची समजली जायची, तिथेच विठ्ठलाचा वास आहे, हे त्यांनी समजावलं. हा विठ्ठल गोरा कुंभाराची मडकी घडवतो, सावता माळ्याच्या मळ्यांत राबतो, जनाबाईला पीठ दळायला, केर काढायला मदत करतो.. असे अनेक विचार त्यांनी पुढे आणले. कुठलंही काम कमीपणाचं नसतं ही मोठी शिकवण त्यांनी दिली.’’ पुजारींनी सोपं करण्याचा प्रयत्न केला.
‘‘संत चोखामेळा मोलमजुरी करायचे. त्यांना विठ्ठलाच्या दर्शनाची इच्छा होती. जातीच्या भेदभावामुळे त्यांना देवळात प्रवेश नव्हता. पण माणसांनी घातलेली बंधनं देव थोडीच मानतो? असं म्हणतात की विठ्ठलानेच स्वत:ची देवळातील जागा सोडून चोखोबांना दर्शन दिलं. आज पंढरपूरच्या मंदिराच्या महाद्वारात नामदेवांच्या पायरीच्या बाजूला चोखोबांची समाधीही पाहायला मिळते. हा खऱ्या भक्ताचा मान!’’
‘‘त्यासाठी त्यांनी देवाची खूप पूजा-अर्चा केली असेल नं?’’ एका मुलीचा निरागस प्रश्न.
‘‘देवाला मनापासून केलेला नुसता नमस्कारही पुरतो बाळ. विठ्ठलभक्त संत सावतामाळी कधीच पंढरपूरला गेले नाहीत. आपलं काम म्हणजेच देव असं ते मानीत. ते म्हणायचे- ‘कांदा, मुळा, भाजी, अवघी विठाई माझी.’ प्रत्येकानं आपापली कामं व्यवस्थित केली तर देवाची वेगळी पूजा-अर्चा करावीच लागत नाही. देवाला मोठाले हार घालण्याची, दागिन्यांनी मढवण्याची काहीच गरज नसते.’’
‘‘त्या काळात स्त्रियांवरही खूप अत्याचार व्हायचे. पण संतांच्या पुरोगामी विचारांमुळे उपेक्षित स्त्रियाही वारीमध्ये मोठय़ा प्रमाणात सहभागी होऊ लागल्या. त्यांना मानाचं स्थान मिळालं.’’ – ‘क’ तुकडीच्या वर्गशिक्षिका म्हणाल्या.
‘‘संत कान्होपात्रेला समाजात दर्जा नव्हता. आज तिची समाधी पंढरपुरमध्ये विठ्ठलाच्या मंदिरात आहे. हा फार मोठा सामाजिक बदल होता. आपण विठ्ठलाला ‘विठूमाऊली’ म्हणतो. यातच खरं तर स्त्रीची थोरवी दिसून येते. ’’ पुजारी म्हणाले. इतक्यात पोपटांच्या थव्याचा ओरडत जातानाचा आवाज ऐकू आला. मंदिराच्या भोवती बरीच झाडी होती.
‘‘हल्ली वृक्षं, जंगलं वाचवण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले जातात. पण तुकोबारायांनी ४०० वर्षांपूर्वीच त्यांच्या अभंगांत म्हटलंय- ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे..’ त्याकाळीही त्यांचे विचार विज्ञानवादी होते. चुकीच्या रूढी-परंपरांवर त्यांनी कडाडून हल्ला केला. समाज सुधारण्यासाठी त्यांना बराच संघर्ष करावा लागला.’’ पुजारी म्हणाले.
‘‘काका, वारीचा अनुभव एकदा तरी नक्की घ्यावा असं म्हणतात.’’ पालखी घेऊन आलेल्यापैकी एका शिपायाने विचारलं.
‘‘अवश्य! मीही दोनदा केलीये वारी, पण खरं सांगू? हे देऊळ आणि माझं काम हीच माझी पंढरी. मुलांनो, आजही वारी अनेक संदेश देते. ‘मुलगी वाचवा, मुलगी जगवा’,
‘सुंदर गाव, स्वच्छ गाव’ असे बरेच उपक्रमही वारीमधून राबवले जातात. इथे लहान-थोर, श्रीमंत-गरीब, सुशिक्षित-अशिक्षित असा कुठलाच भेद नाही. ‘आपण सारी देवाची लेकरे’ हाच भाव, तर बोला: ‘पुंडलिक वरदे हरि विठ्ठल! श्रीज्ञानदेव तुकाराम!’ असं म्हणत पुजारी काकांनी हात जोडले. मुलांनीही दुजोरा दिला. सगळ्यांनी मिळून ‘युगे अठ्ठावीस..’ ही आरती म्हटली.
शिक्षिकांनी पुजारीकाकांचे आभार मानले आणि विद्यार्थ्यांची नव्या विचारांनी समृद्ध झालेली ही ‘दिंडी’ पुन्हा शाळेकडे परतली..
प्राची मोकाशी mokashiprachi@gmail.com