मिथिला नरेश जनकाकडे एक प्रचंड अवजड असे धनुष्य होते. ते धनुष्य शिवधनुष्य म्हणून ओळखले जात असे. ते पेलणे म्हणजे उचलून घेणे ही तर कर्मकठीण गोष्ट होती. कारण ते तसूभर हलविणेही अशक्यप्राय मानले जात होते. ते धनुष्य वाहण्यासाठी आठ चाके असलेली अति प्रचंड संदूक (पेटी) लागत असे. ती संदूक ओढण्यासाठी शंभर तगडे जवान लागत. यावरून लक्षात येते की, हे शिवधनुष्य पेलणे हे कोणा सोम्यागोम्याचे काम नव्हते.
अशा या शिवधनुष्याशी जनक राजाची कन्या जानकी लहानपणी खेळत असे. ही जानकी जेव्हा लग्नाच्या योग्य वयाची झाली तेव्हा राजा जनकाने तिच्या स्वयंवरासाठी एक पण केला; जो कोणी वीर या शिवधनुष्याला दोरी लावील आणि त्याची प्रत्यंचा खेचील त्याच्याच गळ्यात जनक कन्या जानकी म्हणजेच सीता माळ घालील.
सारी मिथिलानगरी स्वयंवरासाठी सज्ज झाली. गावोगावी आमंत्रणे पोचली. अनेक राजे-रजवाडे, शूर वीर, योद्धे स्वयंवरासाठी मंडपात येऊन पोहोचले. हे सारे रथी-महारथी स्वयंवर जिंकण्यासाठी उत्सुक होते. त्यांना आपण शिवधनुष्य लीलया पेलू असे वाटत होते, पण अनेकांना ते उचलताच काय तर तसूभर हलवताही आले नाही. काही जणांच्या ते पोटावरच पडले. काही जणांना त्याला दोरी लावणे जमलेच नाही. काही तर असे गडगडले की, त्यांना उचलून उभे करणे हे जनकाला एक कामच झाले. भल्याभल्यांची अशा प्रकारे झालेली गाळण बघून सारा मंडप अवाक् झाला. सर्वजण थक्क होऊन आता काय, असा विचार करू लागले.
एवढय़ात महर्षी विश्वमित्रांनी डोळ्यानेच पोरसवदा अशा श्रीरामाला इशारा केला. राम क्षणभर शहारलाच, पण लगेचच सारा आत्मविश्वास एकवटून दमदार पावले टाकत शिवधनुष्याकडे पोहोचला. त्याचा आवेश पाहून सारा मंडप स्तब्ध झाला. उपस्थित असलेला प्रत्येक जण पापणी न लववता त्या पोरगेल्या श्रीरामाकडे पाहू लागला. धनुष्यापाशी पोहोचल्यावर रामाने डोळे मिटून दीर्घ श्वास घेतला आणि क्षणार्धात शिवधनुष्य पेलले. अगदी सहजगत्या पेलले आणि शिवधनुष्य मोडले. श्रीराम जानकीसाठी योग्य वर ठरले. सलज्ज सीता वरमाला घेऊन श्रीरामाच्या दिशेने पुढे सरकली. जानकी व श्रीरामाचा विवाह थाटामाटात संपन्न झाला.
तेव्हापासून भल्याभल्यांना अवघड वाटणारी किंवा भल्याभल्यांची गाळण उडवणारी गोष्ट एखाद्या अननुभवी व्यक्तीने आत्मविश्वासाने पूर्ण केली तर त्याला शिवधनुष्य पेलले म्हणण्याचा प्रघात पडला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा