अदिती देवधर
सरपंचांनी मुलांना ‘लोकजैवविविधता नोंदवही’ बद्दल सांगितलं. गावातल्या जैवविविधतेची नोंद व्हावी, पारंपरिक ज्ञान, औषधी यांची नीट नोंद व्हावी यासाठी एक नोंदवही गावातल्या लोकांनी करायची असते.
‘‘आपला प्रकल्प तुमच्या मदतीनं आपण यशस्वीपणे करू.’’ सरपंच मुलांकडे कौतुकानं बघत म्हणाले.
‘‘भारी!’’ यश म्हणाला.
शैलेशनं त्यांच्या कामाचा आराखडा सांगितला. मीनानं त्यांच्या टीमबद्दल आणि कामाच्या विभागणीबद्दल सांगितलं.
‘‘ऑल द बेस्ट!’’ नेहा म्हणाली.
गणेश आणि गँगबरोबर आठवडय़ातून एकदा मीटिंग व्हायची. संपदा घरी आली. तिची चाहूल लागताच आईनं सांगितलं, ‘‘संपदा, कढीलिंबांची दोन पानं आण.’’
‘‘आत्ताच आले ना मी, दादाला सांग की!’’ संपदानं कुरकुर केली.
‘‘मगासपासून मीच सगळी कामं करतोय.’’ दादा म्हणाला.
‘‘एवढा भाव खायला नकोय,’’ म्हणत कात्री घेऊन संपदा बाल्कनीत गेली.
बाल्कनीत कोपऱ्यात कढीलिंबाचं रोप होतं. बऱ्याच पानांच्या फक्त काडय़ा उरल्या होत्या. पानं गायब.
‘‘असं कसं झालं?’’ संपदानं जवळ जाऊन बघितलं तर दोन हिरव्या अळय़ा होत्या. ‘‘अच्छा यांचं काम आहे हे,’’ म्हणत तिनं गूगल लेन्सच्या मदतीनं कोणत्या अळय़ा आहेत हे शोधलं. त्या लाईम बटरफ्लाय फुलपाखराच्या अळय़ा आहेत असं तिला कळलं. फुलपाखरू पानाच्या मागे अंडी घालतं. अंडय़ातून अळय़ा बाहेर येतात. पुढे त्या आपल्याभोवती कोश म्हणजे ककून करतात. नंतर कोशातून फुलपाखरू बाहेर पडतं. इंटरनेटवर बरीच माहिती मिळाली. प्रत्येक फुलपाखराच्या प्रजातीची काही ठरावीक झाडं/ झुडपं ठरलेली असतात. त्यांना ‘होस्ट प्लॅन्ट’ म्हणतात. लाईम बटरफ्लायची होस्ट प्लॅन्ट म्हणजे लिंबू, संत्रं, मोसंबं, कढीलिंब.
‘‘एक काम सांगितलं तर..’’ असं म्हणत आई बाल्कनीत आली, ‘‘अगं बाई, कीड पडली कढीलिंबावर. काढून टाक त्या अळय़ा.’’
‘‘कीड नाहीये. फुलपाखराच्या अळय़ा आहेत.’’ संपदा म्हणाली.
‘‘रोपाची पानं खात आहेत त्या. पोहे-उपीट, भाजीवर घालायला हवी ना पानं!’’ आई म्हणाली.
‘‘आई, आपण एखाद्या दिवशी कढीलिंब वापरला नाही तर काही फरक पडत नाही. फुलपाखरू काय करेल?’’ संपदा कमरेवर हात ठेवत म्हणाली.
‘‘बरोबर! आपल्याकडे पर्याय आहे. फुलापाखरांकडे नाही.’’ दादा चर्चेत सहभागी होत म्हणाला.
‘‘जैवविविधता आपण जपली पाहिजे ना!’’ संपदाचा समजावणीचा सूर. दोन्ही वारसाफेरी सुरू झाल्यापासून जैवविविधता हा विषय मुलांच्या चर्चेत आला होता. सुरुवातीला जैवविविधता हा शब्द उच्चारणंसुद्धा अवघड वाटत होतं.
‘‘हो का!’’ संपदाकडे कौतुकानं बघत आई म्हणाली, ‘‘तुमचा मुद्दा मला पटला. संत्रं-मोसंबं नाही, पण त्या रिकाम्या कुंडीत लिंबाचं किंवा आणखी एक कढीलिंबाचं रोप आपल्याला लावता येईल.’’
‘‘खरंच आई, छान होईल.’’ संपदाचा चेहरा आनंदाने फुलला.
‘‘शहरात जंगलाचे काही भाग आहेत, पण त्यांना जोडणारं काही नाही. मधे फक्त काँक्रीट जंगल आहे. फुलापाखरांसाठी असे हिरवे कॉरिडॉर केले पाहिजेत.’’ दादा म्हणाला.
‘‘आपल्या आणि नेहा-यतीनच्या सोसायटीपासून सुरुवात करू. आलेच,’’ म्हणत संपदा पळाली.
aditideodhar2017@gmail.com