सुचित्रा साठे
गणपतीबाप्पाचं आगमन झाल्यापासून घरातलं वातावरण उत्साहाने भरून गेलं होतं. अपूर्व, रमा, आराध्य, ओंकार यांची तर मजाच होती. त्यात सोहम आणि स्वरा यांची भर पडली. परदेशात वास्तव्य असल्यामुळे दोघांनाही या गोष्टीचं अप्रूप होतं. सगळ्यांनी आजीच्या आग्रहास्तव ‘सुखकर्ता दु:खहर्ता..’ आरती पाठ केली होती. अपूर्व तसा लहान होता; पण अधूनमधून ‘सुखकर्ता दु:खहर्ता..’ त्यालाही गुणगुणावंसं वाटत होतं. म्हणायचं आणि मग हळूच आजूबाजूला असणाऱ्यांकडे बघायचं- असा चाळा त्याला लागला होता. झांजा वाजवत आरती दणक्यात होत होती. प्रसादाची वाटावाटी करण्यासाठी थोडं युद्ध व्हायचं; पण प्रसादावर डोळा असल्यामुळे आपापसात लवकर समेटही व्हायचा.
ऋषीपंचमीला आजीने केलेली पौष्टिक भाजी ‘हे का?’ म्हणत आईवर डोळे मोठे करत संपवावी लागली. पण त्याबद्दल पाकातली पुरी मिळाली आणि सगळ्या बालगोपाळांचे गाल पुरीसारखे फुगले.
हेही वाचा >>> बालमैफल : भाव तैसा देव
आजीला आता गौरीचे वेध लागले होते. तिच्या तोंडून दोन-तीनदा गौरीचा उल्लेख झाल्यावर स्वराला गंमत वाटली. तिने उत्सुकतेने विचारले, ‘‘आजी कुठे आहेत गौरी? आजीने तिला छान समजावून सांगितले.
‘‘अगं, आपल्याकडे खडय़ांच्या गौरी असतात. सात खडे आणि एक सुपारी याची आपण पूजा करतो.’’ – इति आजी.
‘‘आम्ही तुला छान गुळगुळीत खडे शोधून आणून देतो की नाही आजी?’’ रमाने खूप मोठे काम केल्याच्या आविर्भावात सांगितले. अपूर्व आणि आराध्यच्याही माना हलल्या.
‘‘कॅलेंडरमध्ये मुहूर्त सांगितलेला असतो. त्या मुहूर्तानंतर लगेच आणायच्या. म्हणजे कॅलेंडरमध्ये ‘दहा वाजल्यानंतर’ असं लिहिलं असेल तर मुद्दाम दुपारी चापर्यंत थांबायचं नाही. ती माहेरवाशिण पाहुणी आहे की नाही आपली! मग तिला आपल्याकडे जास्त वेळ राहायला मिळावं असं आपल्यालाही वाटतं आणि तिलाही वाटतं. तुम्हा सर्वाना जास्त दिवस आमच्याकडे राहा, असा आग्रह असतो ना आमचा? तसंच.’’ आजीचं म्हणणं मनापासून पटल्यामुळे सगळे चेहरे खुलले.
हेही वाचा >>> बालमैफल : मी.. : तिरंगा!
‘‘या खडय़ांचं काय करायचं असतं गं आजी?’’ स्वराला नीट समजून घ्यायचं होतं.
‘‘अगं, गौरी आणायच्या असतील त्या दिवशी रांगोळीने गौरीची पावलं काढायची. दोन-दोन पावलांची जोडी काढायची. मुख्य दरवाजाच्या बाहेर एक जोडी काढायची.. म्हणजे जास्त जोडय़ा काढल्या तरी चालतात. पण एक तरी काढायचीच. मग आत आल्यावर प्रत्येक खोलीत शिरताना, उंबरा असला तर त्यावर कडेला, आतल्या दिशेने- म्हणजे आत येत आहेत अशी काढायची. त्यामुळे मग त्यावर आपला पायही पडत नाही, पुसली जात नाहीत आणि रांगोळीची कचकचही घरभर होत नाही. पावलांवर हळद-कुंकू घालायचं.’’
‘‘आजी, आपण अंगणातल्या पाण्याच्या टाकीजवळून आणतो ना गं गौरी? मी आणि अपूर्व असतोच तुझ्याबरोबर.’’ रमाला सांगितल्याशिवाय राहवेना.
‘‘पूजेचं साहित्य आणि चांदीच्या वाटीत खडे घेऊन आपण टाकीजवळ जातो, कारण गौरी पाणवठय़ावरून आणाव्यात असं म्हणतात. तिथे गंध, फूल, हळद-कुंकू, उदबत्ती, साखर फुटाण्याचा नैवेद्य, आरती करून गौरी घेऊन घरी येतो. वाटेत अपूर्व घंटा वाजवतो. त्यामुळै गौरी यायला लागल्या आहेत हे घरातल्यांना कळते. तुम्ही विमानतळावर उतरलात आणि रेंज मिळाली की लगेच फोन करता, तसंच. मुख्य दारापाशी आल्यावर रमाची आई, जिने गौरी आणलेल्या असतात तिच्या पायावर दूधपाणी घालून औक्षण करते. मग गौरीला प्रत्येक खोलीत नेलं जातं. सगळं घर दाखवलं जातं. अगदी सेफमधील दागदागिनेसुद्धा. म्हणून कपाटं आधीच उघडून ठेवली जातात. गौरीचं माहेर म्हणून ती मोकळेपणी घरभर फिरते आणि मग देवापाशी छान आसनावर तिला ठेवतो. तोपर्यंत इतर गप्पा वर्ज्य.. म्हणून बोलायचं नाही. सगळं नीट लक्ष देऊन करायचं.’’
हेही वाचा >>> बालमैफल : उदकाचा महिमा
‘‘नैवेद्याला काही स्पेशल असतं का? सोहमला त्याच्यात रस होता.
‘‘अरे हो, आलेल्या दिवशी तिला पालेभाजी आणि भाकरीचा नैवेद्य दाखवतो. काल खाल्लीत ना भाकरी, भाजी, लोणी, दही, तशीच दुसऱ्या दिवशी सकाळी पंचामृती पूजा. देवीसाठी चाफ्यासारखी सुवासिक फुलं आणायची. पुरणाच्या दिव्यांनी आरती करायची. मग पुरणपोळीचा नैवेद्य. प्रार्थना करायची. नैवेद्याचं पान तू वाढायचं बरं का स्वरा यावेळी. प्रत्येक पदार्थाची जागा ठरलेली असते. इतकं छान दिसतं ते.’’
‘‘आजी, मला केळीचं पान हवं जेवायला.’’ झाडात रमणाऱ्या अपूर्वला एकदम आठवण झाली.
‘‘हो तर..! ओंकारदादा आणेल केळीची पानं कापून.’’
‘‘मी पण जाणार हं.’’ अपूर्वने जाहीर केलं आणि लगेच सुरी आणायला धावला.
‘‘संध्याकाळी काय करायचं असतं गं, आजी?’’ स्वराने विचारलं.
‘‘थोडय़ा बायकांना हळदी-कुंकूला बोलवायचे. रमा, स्वराला घेऊन जा हं यावेळी बोलावणी करायला. दुसऱ्या दिवशी गणपती- बाप्पाबरोबर गौरीचं विसर्जन करायचं. पुन्हा पावलं काढायची.. ती घराबाहेर जात आहेत अशी काढायची. सगळ्या गोष्टी प्रतीकात्मक रीतीने व्यक्त करण्याची आपली संस्कृती आहे. निरोप देताना गणपती आणि गौरींना दहीपोहे किंवा तळलेल्या करंजी- मोदकाचा शिधा द्यायचा बरं का! विसरायचं नाही.’’
‘‘शेजारच्या काकूंच्या गौरी वेगळ्या आहेत ना आजी?’’ आराध्यने विचारले.
‘‘हो. प्रत्येकाच्या घरातील परंपरेप्रमाणे असतात. कोणाकडे तर गौरीसाठी सोळा भाज्या करतात नैवेद्याला.’’ हे आजीने सांगताच सगळ्यांचे डोळे विस्फारले.
‘‘अरे, बोलत काय बसलो आहोत आपण? आई स्वयंपाक करते आहे.. तिला मदत करू या. पुरणपोळी आणि घोसाळ्याची भाजी यावर ताव मारणार ना सगळे? चला तर मग पाटपाणी करू या.. रांगोळी काढू या.’’
नाकाने भाज्यांचा वास घेत सगळे स्वयंपाकघराकडे धावले. suchitrasathe52@gmail.com