अदिती देवधर
‘‘तुमचं वय काय, असं तुम्हाला विचारलं तर सांगता येईल?’’ सरांनी विचारलं.
‘‘अर्थात!’’ संपदा आणि यश म्हणाले.
‘‘आपल्या नदीचं वय काय असेल?’’ सरांचा दुसरा प्रश्न.
शाळेला जाताना ते रोज नदी ओलांडतात, पण पुलावरून जाताना खालून वाहणाऱ्या नदीकडे लक्षही जात नाही.
नदी स्वच्छ करायला चौघे गेले तेव्हा पहिल्यांदा नदीच्या एवढे जवळ गेले. नदीत आणि नदीपात्रात पडलेला कचरा बघून त्यांना त्रास झाला होता, तो कमी कसा करता येईल याबद्दल ते विचार आणि कृतीही करत होते. त्यापलीकडे नदीचा विचार त्यांनी विशेष केला नव्हता. त्या दिवशी नदीवर जाईपर्यंत त्यांना नदीचं नावही नक्की माहीत नव्हतं.
‘‘शंभर वर्षे?’’ संपदानं उत्तर ठोकलं.
‘‘साडेतीनशे ते चारशे वर्षे?’’ यश म्हणाला.
सरांनी नकारार्थी मान हलवली.
‘‘पाच हजार.’’ यशनं मुद्दाम मोठी संख्या सांगितली. तरीही सरांनी नकारार्थी मान हलवल्यावर संपदा म्हणाली, ‘‘दहा हजार!!’’
सरांनी खडू घेतला आणि फळय़ावर एक हा आकडा लिहिला आणि पुढे शून्य काढायला सुरुवात केली. एकेक शून्य वाढत गेले तसं संपदा आणि यशचे डोळे मोठे होऊ लागले. एकदाचे सर थांबले तेव्हा दोघांनी शून्य मोजले – सात!!!
‘‘एक लाख?’’ यश म्हणाला.
‘‘नाही रे, एकावर सात शून्य म्हणजे एक कोटी.’’ संपदा म्हणाली.
‘‘हो. तेसुद्धा कमीत कमी एक कोटी!!’’ सर म्हणाले.
‘‘टेकडीवरचा किंवा नदीपात्रातला खडक, सह्याद्री हे नदीपेक्षाही प्राचीन आहेत.’’ सर म्हणाले.
‘‘आपले पूर्वज दोन-तीन लाख वर्षांपूवी आफ्रिकेत विकसित झाले असं मानतात आणि साधारण साठ हजार वर्षांपूर्वी सगळीकडे पसरले.’’ यश म्हणाला.
‘‘म्हणजे आपण पृथ्वीवर विकसित व्हायच्या आधीपासून ही नदी इथे आहे.’’ संपदा म्हणाली.
‘‘आपले पूर्वज शेती करायला लागले तेव्हा एका जागी वस्ती करू लागले. वस्ती वाढत गेली आणि आज बघतो ते शहर निर्माण झालं.’’ सरांचं बोलणं मुलं आ वासून ऐकत होती.
‘‘आपण म्हणतो, मुळा-मुठा नद्या शहरातून वाहतात. तसं नाहीये. नदी होती म्हणून शहर वसलं.’’ यश म्हणाला.
‘‘नदी आपल्या शहरातून वाहत नाही तर आपले शहर नदीच्या काठावर आहे.’’ संपदा म्हणाली.
‘‘अगदी बरोब्बर!!’’ सरांनी दुजोरा दिला.
‘‘आम्ही असा विचार केलाच नव्हता.’’ संपदा म्हणाली.
‘‘आम्ही नदीचाच कधी विचार केला नव्हता.’’ यशनं प्रांजळपणे कबूल केलं.
सर हसले, ‘‘आपण काही शेकडा/ हजार वर्षांपूर्वीच्या गोष्टीला वारसा म्हणतो. तो जसा सांस्कृतिक वारसा आहे तसा हा आपला नैसर्गिक वारसा आहे- natural heritage.ll
‘‘वारसास्थळे म्हणतो तेव्हा नदी किंवा पर्वत आपल्या डोळय़ासमोर येत नाही.’’ संपदा म्हणाली.
‘‘आपल्या नद्या सह्याद्रीत उगम पावतात. सह्याद्री आहे म्हणून आपण आहोत. या वारशाचे संवर्धन म्हणजे आपलंच संवर्धन आहे.’’ सर म्हणाले.
‘‘आम्ही हाच प्रकल्प करणार. सर, तुम्ही आम्हाला मार्गदर्शन कराल?’’ संपदा आणि यशनं विचारलं.
‘‘जरूर!!’’ सर दोघांकडे कौतुकानं बघत म्हणाले. प्रकल्पाची काय भानगड आहे आणि सर कोण आहेत? पुढच्या भागात बघू.
aditideodhar2017@gmail.com