‘‘कच्ची पपई, पक्की पपई, कच्ची पपई, पक्की पपई..’’ असं पटपट दादाशी बोलतबोलत वरुणने घराची बेल वाजवली.
‘‘वरुण, मस्त! जमतंय, जमतंय!’’ दादा आनंदाने म्हणाला.
‘‘चुकलं नं पण दोन-तीन वेळा!’’ वरुण चक् करत म्हणाला.
‘‘ए! एवढं कुणाचंही चुकतं हं!’’ दादा वरुणला प्रोत्साहन देत म्हणाला. एव्हाना आईने दार उघडलं होतं.
‘‘काय चाललंय दोघांचं?’’ तिने वरुणला आणि दादाला विचारलं.
‘‘आई, वरुण ‘कच्ची पपई, पक्की पपई’ एकदम व्यवस्थित म्हणत होता.’’ दादाने सांगितलं. वरुणचाही चेहरा खुलला.
‘‘आई, हे बघ, आम्ही साखरेच्या गाठय़ा आणल्या.’’ वरुण हातातला कागदाचा पुडा आईला दाखवत म्हणाला.
‘‘कुठल्या रंगाच्या मिळाल्या रे?’’ आईनेही उत्साहानं विचारलं.
‘‘पिवळ्या आणि पांढऱ्या.’’ वरुण सावकाश म्हणाला.
‘‘त्या कोपऱ्यावरच्या दुकानांतल्या वाण्याने इतक्या छान मांडून ठेवल्या आहेत गाठय़ा, की मोहच आवरला नाही. म्हणून आणल्या आम्ही!’’ दादाने स्पष्टीकरण दिलं.
‘‘मस्त!’’ असं म्हणत आई तो पुडा ठेवायला स्वयंपाकघरात गेली. आजी तिथे सांजवात लावत होती. वरुण आणि दादा हातपाय धुऊन आले. त्यांनी देवाला आणि त्यानंतर आजीला आणि आईला नमस्कार केला. मग दोन्ही नातवंडं आजीबरोबर हॉलमध्ये येऊन बसली. आईचा स्वयंपाक सुरू होता. बाबा अजून ऑफिसमधून यायचे होते आणि आजोबा सोसायटीमध्ये वॉक घ्यायला नुकतेच गेले होते. त्यामुळे त्यांनाही यायला अजून अवकाश होता. ओघाने तिघांच्या गप्पा सुरू झाल्या..
‘‘वरुण, कशाकरिता आणल्यास रे साखरेच्या गाठय़ा?’’ आजीने विषय छेडून विचारलं.
‘‘हे काय आजी! आता थोडय़ाच दिवसांत गुढीपाडवा येतोय नं? विसरलीस?’’ वरुण आश्चर्यानं म्हणाला.
‘‘अरे हो! खरंच की!’’ आजीही जरा आश्चर्य झाल्यासारखं दाखवत म्हणाली.
‘‘पण काय रे मुलांनो? साखरेच्या गाठय़ा तेवढय़ा हव्यात नं खायला गुढीपाडव्याला, त्या दिवशी कडुनिंबाची पानं दिली खायला, की नाकं कशी मुरडता दोघे?’’ आजी वरुणच्या डोक्यावर टपली मारत म्हणाली.
‘‘आज्जी, कसलं कडू असतं ते कडुनिंब, याक्! मला मुळीच नाही आवडत.’’ वरुण चेहरा वाकडा करत म्हणाला. आजीला एकदम हसूच आलं.
‘‘अरे, पण खावं ते! रक्त शुद्ध होतं त्याने. बरं वरुण, मला सांग, गुढीपाडवा का रे साजरा करतात?’’ आजीचा लगेच पुढचा प्रश्न. वरुणच्या लक्षात आलं की, आजी आता शिकवणीच्या मूडमध्ये शिरली होती. शेवटी काय, शाळेची शिक्षिका ती! वरुण मनात हसला. आजीच्या प्रश्नाचा विचार करता-करता त्याला तंद्री लागली.
‘‘काय रे! विसरलास इतक्यात? अरे, आजीने सांगितलं होतं की गेल्या वर्षी. ही रिव्हिजन आहे फक्त.’’ दादाचा आवाज ऐकताच वरुणची लागलेली तंद्री मोडली. दादाची नुकतीच दहावीची परीक्षा संपली होती. त्यामुळे तो अगदी निवांत होता.
‘‘थांब रे! सांगेल तो. बोल बाळा.’’ आजी दादाला थोपवत म्हणाली.
‘‘आजी, गुढीपाडवा म्हणजे आपल्या नवीन वर्षांचा पहिला दिवस. चैत्र शुद्ध प्रतिपदा. ब्रह्मदेवाने याच दिवशी विश्वाची निर्मिती केली अशी आख्यायिका आहे.’’ वरुण एक-एक शब्दावर थांबत म्हणाला. तो ‘आख्यायिका’ या शब्दावर जरा जास्तच रेंगाळला, पण हा अवघड शब्द व्यवस्थित जमल्यामुळे तो स्वत:वरच खूश झाला.
‘‘शाब्बास! पुढे?’’ इति आजी. आता वरुणला एकदम हुरूप आला.
‘‘गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी आपण उगवत्या सूर्याच्या दिशेने गुढी ठेवतो.’’ वरुण सांगत होता.
‘‘अहं, ठेवतो नाही, उभारतो म्हणायचं.’’ आजीने दुरुस्ती केली.
‘‘हा! गुढी उभारतो.’’ वरुण म्हणाला.
‘‘आणि त्या गुढीला आपण काय-काय बांधतो रे वरुण?’’ आईने स्वयंपाकघरातून विचारलं. तिचं अर्ध लक्ष तर यांच्या गप्पांकडेच लागलेलं होतं.
‘‘ती गुढी म्हणजे एखादी बांबूची लांब काठी असते. तिला आपण एक जरीचं कापड पक्कं बांधतो. त्यावर साखरेच्या गाठय़ा, कडुनिंबाची डहाळी, आंब्याची पानं, फुलांचा हार वगैरे बांधतो आणि मग त्या काठीवर एक तांब्या उपडा ठेवतो. हा, त्या तांब्यावर कुंकवाने स्वस्तिकही काढतो..’’ वरुण प्रत्येक शब्दाला न्याय देत व्यवस्थित सांगत होता.
‘‘छान! या गुढीपाडव्याचं आणखीही एक महत्त्व आहे.’’ आजी म्हणाली. त्यावर वरुण विचार करू लागला.
‘‘मला माहिती आहे.’’ दादा वरुणला चिडवत म्हणाला.
‘‘अरेच्चा! विसरलास? प्रभू रामचंद्र.’’ – आजी वरुणला ‘क्लू’ देत म्हणाली.
‘‘हा! आठवलं. याच दिवशी प्रभू रामचंद्र रावणाला हरवून आणि त्यांचा चौदा वर्षांचा वनवास संपवून अयोध्येत परत आले. तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी घराघरांतून गुढय़ा-तोरणे उभारली होती.’’ वरुण शांतपणे सांगत होता.
‘‘बरोब्बर. गुढीपाडवा हा विजयाचा सण म्हणून आपण साजरा करतो. जसं दसऱ्याला देवी दुर्गेने महिषासुराचा वध केला म्हणून ‘विजयादशमी’ असंही म्हणतात, तसंच या गुढीला ‘विजयपताका’ असंही म्हणतात. ते विजयाचं तोरण आहे.’’ आजीने माहिती सांगितली.
‘‘म्हणून आपण या दिवशी गुढय़ा उभारतो, दारात झेंडूच्या फुलांचं आणि आंब्याच्या पानांचं तोरण बांधतो, रांगोळ्या काढतो, घरांत गोडधोड करून हा सण साजरा करतो. आपली ही परंपरा अनेक र्वष अशीच सुरू आहे.’’ आई तिचं काम संपवून बाहेर येत म्हणाली.
‘‘आजी, पण आजच्या काळाशी या सणांचा संदर्भ कसा लावायचा?’’ दादाने विचारलं.
‘‘हे बघ, काही नवीन सुरुवात करण्यासाठी एक शुभ मुहूर्त म्हणून आपण आज या सणांकडे पाहतो. आता रोजच्या संदर्भात पाहिलं तर, समजा तुला दहावीत जर चांगलं यश मिळालं, तर ते यश तुझ्यासाठी फार महत्त्वाचं असेल. तुझ्यासाठी एक मैलाचा दगड ठरेल. मग हा क्षण म्हणजे तुझ्या मनातली विजयाची गुढी ठरू शकते. किंवा तू तुझ्या एखाद्या मित्राला मदत केलीस, तर तुला खूप छान वाटतं. ती तुझ्यासाठी समाधानाची गुढी असू शकते. आणि अशा अनेक गुढय़ा आपण जर आपल्या मनात साठवल्या नं, तर एखाद्या अवघड प्रसंगाला सामोरं जाण्याचं मनाला आपोआप बळ मिळतं.’’ आजी समजावत म्हणाली.
‘‘हम्म!’’ दादाने विचार करत मान डोलावली.
‘‘आता आपल्या वरुणचंच उदाहरण घेऊ की आपण. जो मुलगा गेल्या वर्षांपर्यंत त्याच्या तोतरेपणामुळे संपूर्ण वाक्य नीट म्हणूही शकत नव्हता, त्याने या वर्षी त्याच्या चौथीच्या सेंड-ऑफच्या कार्यक्रमात सगळ्यांसमोर धीटपणे उभं राहून न अडखळता, संपूर्ण पाच मिनिटं भाषण केलं. ही सोपी गोष्ट मुळीच नाहीये.’’ आजी कळकळीने म्हणाली.
‘‘आणि वर्गशिक्षिकांनी मला त्यासाठी तो कॉफी-मगसुद्धा गिफ्ट दिला होता.’’ वरुण शोकेसमध्ये ठेवलेल्या कॉफी-मगकडे बोट दाखवत म्हणाला. त्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर झळकत होता.
‘‘त्याचा हा आनंद, ही त्याच्या मनातली आनंदाची गुढी. त्याच्या आयुष्यातल्या या अवघड प्रसंगावर त्याने केलेली मात. समजलं?’’ आजी म्हणाली.
‘‘आजी, आणि समजा कधी अपयश आलं तर?’’ दादाने पुढे विचारलं.
‘‘अरे, तीसुद्धा एक गुढीच, आत्मपरीक्षणाची, आपल्या मनाच्या कोपऱ्यात ठेवण्यासाठी. म्हणजे नेहमी तिची आठवण ठेवून पुढच्या आयुष्यात आपण चांगली कामगिरी करू शकतो.’’ आजीने समजावलं.
‘‘आपल्या आजीने वरुणवर एवढी मेहनत घेतली, म्हणूनच आज तो इतक्या आत्मविश्वासाने सगळ्यांशी बोलू शकतोय. श्वसनाचे व्यायाम करणे, जीभ वळण्यासाठी दररोज न चुकता स्तोत्रं म्हणणे, धडे मोठय़ाने वाचणे, जोडाक्षरं बोलण्याचा सराव, त्याला म्हणता येत नव्हती त्या अक्षरांची सारखी उजळणी, मराठी-इंग्लिशचे वेगवेगळे सराव.. कित्ती मेहनत घेतली आपल्या आजीने वरुणवर! तेव्हा कुठे आज आपल्याला हा आत्मविश्वासाने बोलणारा वरुण पाहायला मिळतोय! नाही तर किती कोषात गेला असता तो.’’ आई पूर्वीच्या गोष्टी आठवत म्हणाली.
‘‘मी खास काही नाही गं केलं. खरं तर याचं सगळं श्रेय पूर्णपणे वरुणचंच आहे, कारण त्याच्या या तोतरेपणावर मात करण्याची जर त्याची इच्छाशक्ती नसती, तर मला यातलं काहीच जमलं नसतं.’’ आजी वरुणच्या पाठीवर हात फिरवत म्हणाली.
‘‘आजी, वरुणची ही निश्चयाची गुढी नं?’’ दादा मधेच म्हणाला. आजीने होकारार्थी मान डोलावली.
‘‘आपण सगळे तर घरातलेच होतो, पण वरुणचे शिक्षक, शाळेतले-सोसायटीतले मित्र-मैत्रिणी.. त्यांनीही कधी म्हणून जाणवू दिलं नाही वरुणला, त्याच्या तोतरेपणाच्या प्रॉब्लेमबद्दल. सगळ्यांनी नेहमीच समजून घेतलं.’’ आई पुढे आजीला म्हणाली.
‘‘हो, खरंय! शिक्षिका असताना असा प्रॉब्लेम असलेल्या तीन-चार मुलांना शिकवण्याचा अनुभव गाठीशी होता. जेव्हा आपल्या घरी तसाच प्रसंग आला, तेव्हा तो अनुभव मला उपयोगी पडला, इतकंच. पण फार कठीण असतं अशा वेळेस या मुलांचा आत्मविश्वास गमावून न देणं!’’ आजी म्हणाली.
‘‘आजी, म्हणजे तुझ्यासाठी ती तुझी समाधानाची गुढी नं? त्या मुलांना मदत करण्याची?’’ दादा म्हणाला. आजी हलकं हसली.
‘‘खरी समाधानाची गुढी तर वरुण शाळेत न घाबरता आणि न अडखळता बोलला नं तेव्हाची होती. जेव्हा त्याच्या वर्गशिक्षिकांनी स्वत:हून त्याला सेंड-ऑफच्या दिवशी भाषण करण्याची संधी दिली, तेव्हा या सगळ्या प्रयत्नाचं चीज झाल्यासारखं वाटलं.’’ आजी वरुणचे गाल ओढत म्हणाली.
‘‘आजी, ती मुलंपण व्यवस्थित बोलू लागली का गं नंतर?’’ वरुणने कुतूहलाने विचारलं.
‘‘हो, बाळा. त्यांच्यापैकी एक जण तर आज नाटकांमधून छान-छान कामं करतोय, रंगभूमी गाजवतोय! ती ‘त्याची’ विजयाची गुढी.’’ आजी म्हणाली.
‘‘पूर्वी तर माझं नावपण मला नीट म्हणता येत नव्हतं. ‘व’, ‘र’ हे शब्द किती अडखळत म्हणायचो मी! आता ते जमतंय, पण अजूनही तसं खूप फास्ट नाही बोलता येत मला. शांतपणे बोललं तरच नीट जमतं.’’ वरुण हसत म्हणाला.
‘‘बाळा, हळूहळू तेही जमेल. आत्तासुद्धा किती व्यवस्थित सांगितलीस तू गुढीपाडव्याबद्दल माहिती, कुठेही न अडखळता! मी मुद्दामच तुला ते सांगायला लावलं होतं..’’ इति आजी.
‘‘पण मलाही ते लक्षात आलं होतं, आज्जी.’’ वरुण लाडात म्हणाला.
‘‘वरुण, आज तुझ्या तोतरेपणावर मात करत तू इथवर पोहोचलास, हे खूप महत्त्वाचं आहे! मात्र असाच सराव आपण पुढेही करत राहायचाय, बरं का! अरे, तुला तर कार्टून्स पाहायला कित्ती आवडतात. तुला वेगवेगळे आवाज काढता येतात, नकलाही कित्ती छान करतोस. कुणास ठाऊक, मोठा झालास की तुझ्या आवडत्या कार्टून्सना तू तुझा आवाजही देशील, त्यांचे संवाद म्हणशील..’’ आजी कौतुकाने म्हणाली.
‘‘आजी, म्हणजे ही स्वप्नांची गुढी नं?’’ वरुण टाळी वाजवत म्हणाला. यावर आजी मनापासून हसली..
mokashiprachi@gmail.com